बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश चतुर्थी 2022
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (14:08 IST)

तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगावच्या समुद्रात विसर्जन

lalbagh cha raja
लालबागच्या राजाची मिरवणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंडपातून निघाली होती. तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगावच्या समुद्रात विसर्जन करण्यात आले. सकाळी ९.१४ मिनिटांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं.
 
गिरगावच्या समुद्रात कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. तराफाच्या सहाय्याने 'लालबागचा राजा'ला खोल समुद्रात नेण्यात आले. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला तेव्हा भक्तांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला.
 
गणेशोत्सव काळात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाचा थाटच न्यारा असेच म्हणावे लागेल. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी १० दिवसांत लाखो गणेशभक्त लालबागला हजेरी लावतात. दर्शनासाठी याठिकाणी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा असतात. २४ तास भाविकांची अलोट गर्दी लोटल्याचं दिसून येते. गणेश विसर्जनाच्या वेळीही मुंबईच्या रस्त्यांवर तुडुंब गर्दी असते. यंदा निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा होत असल्याने लालबागच्या राजाचं दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. रस्त्यालगतच्या इमारती, टेरेस, उड्डाणपूल येथे भाविकांनी लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती.
 
लालबागच्या राजासह अनेक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भाविकांची गर्दी पाहता चोरांचा सुळसुळाट झाला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल ५० मोबाईल, सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचा फटका गणेशभक्तांना बसला. गणेश मिरवणुकीत मोबाईल चोरी, पाकीट चोरीच्या, सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. याबाबत पोलीस तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारदारांची रांग लागली होती.