रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: गुरूवार, 1 सप्टेंबर 2022 (17:14 IST)

दीड दिवसांचा गणपती का? जाणून घ्या ची रंजक इतिहास

nirop aarti lyrics
गणेश चतुर्थीला गणपतीचा जल्लोषात आगमन होतं आणि अनेकांकडे गणपती बाप्पा दीड दिवसानंतर आपल्या घरी निघतात. अनेक भाविक दीड दिवस बाप्पाचे पूजन करुन विसर्जन करतात. 
 
यामागील कारण असेही असू शकतं की 11 दिवसांसाठी गणपतीचे घरी स्थापना करुन योग्यरीत्या पूजा आराधना करणे शक्य होत नसते. आपल्याला सगळ्यांना असेच काही माहीत असेल परंतु यामागची मूळ संकल्पना वेगळीच आहे.
 
प्रसिद्ध अभ्यासक असे सांगतात की आपल्या भारत या कृषीप्रधान देशात भाद्रपद महिन्यात धान्याच्या लोंब्या डोलू लागताना चतुर्थीला धरणीमातेचे आभार म्हणून पूर्वी बांधावर मातीची मूर्ती तयार करून पूजन केले जात असे. आणि त्याच दिवशी मूर्तीचं नदीत विसर्जन केले जात असे. 
 
नंतर परंपरेत बदल होऊ लागला आणि अनेकजण सुबक मातीची मूर्ती तयार करून घरात तिची प्राण- प्रतिष्ठापना करू लागले. नंतर त्या मूर्तीचं विसर्जन करू लागले आणि अशाप्रकारे हळूहळू दीड दिवस गणपती पूजनाची परंपरा पडली.
 
मूळ संकल्पना अशी देखील आहे की भाविकाने स्वत:च्या हाताने मातीपासून गणेश मूर्ती तयार करुन पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करावी आणि दुसऱ्या दिवशी पुनरागमन म्हणून विसर्जन करावे. मात्र कालांतराने मोठे बदल होत गेले आणि कुठे दीड दिवस, तर कुठे पाच दिवस तर कोणी अकरा दिवस बाप्पाची स्थापना करून पूजा-आराधना करु लागले. 
 
यामागील एक मूळ कारण हे देखील सांगितले जाते की श्री व्यास यांनी जेव्हा महाभारत लिहायला सुरुवात केली तेव्हा स्वतः श्री गणेश त्यांचे लेखनिक होते. तेव्हा महाभारत लिहीत असताना गणेशाचं अंगातलं पाणी कमी झालं आणि त्वचा कोरडी पडू लागली. गणरायाच्या अंगाची प्रचंड आग होऊ लागली हे महर्षी व्यास यांच्या लक्षात येताच त्यांनी ताबडतोब गणेशाच्या शरीरावर ओल्या मातीचा चिखलाचा लेप लावला. यानंतर गणेशाच्या अंगावर गार पाण्याचा शिडकावा केला. परिणाम स्वरुप गणराचा ताप उतरला. ही घटना भाद्रपदातील चतुर्थीच्या दिवशी घडली असल्याचे समजते. चतुर्थीच्या दिवशी हा लेप लावण्यात आला आणि दुसऱ्या दिवशी पंचमीला गणेशाचा ताप उतरला तेव्हा व्यासांनी गणपतीच्या शरीरावरील चिखलाचा लेप काढून पाण्यात विसर्जित केला. यामुळे चतुर्थीला पार्थिव गणपतीचे पूजन आणि पंचमीला विसर्जन अशी प्रथा रूढ झाली.