सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Updated : मंगळवार, 9 एप्रिल 2024 (06:47 IST)

Gudi Padwa Essay In Marathi गुढीपाडवा मराठी निबंध

gudi padwa
Gudi Padwa Essay :आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. महाराष्ट्रात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवीन वर्षाची सुरुवात करण्याची परंपरा आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो. 
 
पाडवा म्हणजे प्रतिपदा आणि या दिवशी गुढी किंवा ब्रह्मध्वज उभारणे हे आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र या राज्यासोबतच आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतीय लोकही गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा करतात.
 
या प्रकारे गुढी उभारली जाते
गुढी ही उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर तांबा किंवा चांदीचं भांडं बसविला जातं. गुढी नंतर पाटावर तांदूळ ठेवून उभी केली जाते. पाटाभोवती रांगोळी काढली जाते. या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होते.
 
गुढी म्हणजे विजय चिन्ह. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो. 
 
महत्तव
* चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते. असे म्हटले जाते की गुढीपाडव्याचा दिवस निश्चित करण्यापूर्वी, प्राचीन भारतीय गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ भास्कराचार्य यांनी त्यांच्या संशोधनानुसार, भारतीय पंचाग रचले. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे दिवस, महिने आणि वर्षांची गणना केली आणि त्यानुसार चैत्र महिना प्रतिपदेचा गुढी पाडवा आहे.
 
* हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हे साडेतीन मुहूर्त म्हणजे गुढी पाडवा, अक्षय्य तृतीया आणि दिवाळी पाडवा आणि दसरा हा अर्धा मुहूर्त मानला जातो.
 
* असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी श्री रामजींनी वानरराज बळीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकावला होता.
 
* असे मानले जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींनी विश्वाची निर्मिती केली.
 
* शालिवाहन शकाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी झाली असे मानले जाते. 
 
चविष्ट पदार्थ
महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशीचे आरोग्यासाठीही फायदेशीर असे पदार्थ नैवेद्य म्हणून तयार केले जातात. पुरणपोळी, श्रीखंड, पुरी, तसेच इतर पदार्थांचा बेत केला जातो.
 
कडुलिंबाचे महत्त्व
या दिवशी कडुलिंबाचे खास महत्त्व असल्याचे सांगितलं जातं. या दिवशी गुढीला कडुनिंबांच्या कोवळ्या पानांची डहाळी बांधली जाते. या दिवशी गोड पक्वान्नांसोबत कडुलिंबाची पाने खाण्याचीही परंपरा आहे. कडुलिंब आरोग्याला चांगले असते. तसेच या महिन्यात भरपूर उकाडा असतो. कडुलिंब सेवन केल्याने शरीरातील उष्णता कमी होते.
 
चैत्र नवरात्र
या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. यादिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात, अंगणात रांगोळी घालतात. गुढीपाडवा नवीन कपडे परिधान करतात. 
 
असा हा गुढीपाडवा सण आनंदाने साजरा केला जातो. आणि लोक एकमेकांना येणार्‍या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात
 
या दिवशी काय करावे- 
 
अभ्यंगस्नान 
गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम अभ्यंगस्नान करावे. शरीराला तेल लावून नंतर ऊनपाण्याने स्नान करावे.
 
तोरण
आम्रपल्लवांची तोरणे तयार करून प्रत्येक दाराशी लाल फुलांसहित बांधावी.
 
पूजा
सर्वप्रथम नित्यकर्म देवपूजा करावी. तसेच वर्षप्रतिपदेला ब्रह्मदेवाची पूजा करुन महाशांति करायची असते. नंतर होमहवन आणि ब्राह्मणसंतर्पण करावे. तसेच विष्णूंची पूजा करुन ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. या प्रकारे शांती केल्याने सर्व पापांचा नाश होतो, आयुष्य वाढतं आणि समृद्धी येत. ज्या वारी गुढी पाडवा येत असेल त्या वाराच्या देवाची पूजाही करावी.
 
गुढी उभारावी
आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारावी.
 
पंचागश्रवण
ज्योतिषाचे पूजन करून त्याच्याकडून किंवा उपाध्याकडून नूतन वर्षाचे पंचांग अर्थात् वर्षफल श्रवण करावे. पंचांग श्रवण केल्याचे फल म्हणजे लक्ष्मी लाभते, आयुष्य वाढतं, पाप नाश होतो, निरोगी राहतात, चिंतिले कार्य साधले जातात.
 
कडुलिंबाचा प्रसाद
पंचाग श्रवणानंतर कडुनिंबाचा प्रसादाचे महत्तव आहे. लिंबाची फुले, कोवळी पाने, चण्याची भिजलेली डाळ, मध, जिरे आणि थोडासा हिंग घालून त्या केलेला प्रसाद ग्रहण करावा.
 
जमीन नांगरणे
या दिवशी जमिनीत नांगर धरावा. या दिवशी नांगरण्यामुळे जमिनीची क्षमता अनेक पटींनी वाढते. या दिवशी शेतीची अवजारे आणि बैल यांवर अक्षता टाकाव्या. शेतात काम करणार्‍यांना नवीन वस्त्र द्यावे. या दिवशी शेतात काम करणार्‍या आणि बैल यांच्या भोजनात पिकलेला भोपळा, मुगाची डाळ, तांदुळ, पुरण, इतर पदार्थ असावे.
 
दान 
या दिवशी गरुजू लोकांना दान दिल्याने पितर संतुष्ट होतात.
तसेच हा दिवस सुख-समाधानाने, आंनदी वातावरणात, मंगल गीते, वाद्ये, कथा ऐकत घालवावा.

Edited By - Priya Dixit