रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (16:15 IST)

कोरडी विहीर पाण्याने भरली

गजानन महाराजांची कीर्ती एकूण शेगावला अनेक लोक त्यांचा दर्शनासाठी येत असे. शेगावात खूप गर्दी व्हायची. त्या गर्दीला टाळण्यासाठी जवळच्या गावात महाराज निघून जायचे. अरण्यात फिरत असे. 
 
असेच एकदा महाराज शेगाव सोडून आडगावाकडे निघाले असताना महाराजांना तहान लागली. आजूबाजूस कुठेही पाणी दिसते का ? ते बघू लागले. जवळच्या शेतात एक शेतकरी काम करत असे. त्याच्याकडे पाण्याची लहानशी घागर असे. 
 
महाराज म्हणाले, ''मला थोडे पाणी प्यायला दे.'' तेव्हा शेतकरी महाराजांना बघून म्हणू लागला की मी लांबून स्वत:साठी पाणी घेऊन आलो आहे त्यामुळे हे पाणी तुला दिल्यास मला पुरणार नाही. आपल्याला पाणी कमी पडेल म्हणून शेतकऱ्याने पाणी द्यायचे नाकारले. तेथून जवळच एक कोरडी विहीर होती. महाराज विहीरीकडे निघाले. तेव्हा शेतकरी म्हणाला की विहीर पूर्णपणे कोरडी आहे.
 
त्यावर महाराज म्हणाले, ''असू दे. प्रयत्न करून बघतो; अकोल्यातील लोकांचे पाण्याचे हाल दूर करता येते का ?''
 
मग महाराज विहिरीजवळ आले. विहिरीच्या काठावर पद्मासन घालून परमेश्वराचे ध्यान करू लागले आणि काय आश्चर्य ! थोड्याच वेळात विहिरीतील झऱ्यांना पाणी आले. झरे वाहू लागले. क्षणात विहीर पाण्याने तुडुंब भरुन गेली. 
 
शेतकऱ्याला फारच आश्चर्य वाटले. त्याने महाराजांचे पाय धरले. महाराजांचे सामर्थ्य शेतकऱ्याला समजले. त्याने सर्व लोकांना ही हकीकत सांगितली.