शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

मंगल कलशामागील विज्ञान

हिंदू धर्मातील अनेक प्रथा, परंपरा, समजुतीचा विज्ञानाशी फार जवळचा संबंध आहे. त्याच्याकडे केवळ धर्म म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही. किंवा बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून या परंपरा पाळणे हेही तितकेच अयोग्य आहे. उदाहरण घरात मंगलप्रसंगी ठेवल्या जाणार्‍या कलशाचे घेऊ. घरातील पूजेत मंगल कलश अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. अनेकदा यज्ञ-याग किंवा अनुष्ठानावेळी महिला डोक्यावर कलश घेऊन मिरवणुकीत सामील होतात. यामागचे कारण काय असेल हे आपण कधी जाणून घेतलेय का? महिलांनी डोक्यावर कलश घेणे याचा अर्थ सृजन व मातृत्व यांची पूजा एकावेळी होते. त्याचे हे प्रतीक आहे.

समुद्र मंथनाची कथा प्रसिद्ध आहे. देव आणि दानवांनी समुद्रातील चौदा रत्ने आणि चौसष्ट कला प्राप्त करण्यासाठी समुद्रालाच मंदार पर्वताची रवी आणि वासुकीची दोरी करून घुसळले. यातून निघालेला अमृत देवांनी घेतली आणि दानवांनी विष घेणे पसंत केले. या कथेकडे पौराणिक म्हणून पाहिल्यास त्यात आपल्याला भाकडकथा जाणवेल. कारण पुराणात अशा अनेक कथा आहेत. पण या कथेच्या अंतरंगात नीट डोकावले तर त्यातले मर्म कळेल. जीवनात अमृत मिळविण्यासाठी आपल्याला विषाची कुपी दूर ठेवावी लागेल. काय निवडायचे याची सारासार विचार करण्याची बुद्धी आपल्याकडे असावी याचे ही कथा म्हणजे एक उत्तम उदाहरण आहे.

मंगल कलशाचेही असेच आहे. कलश पाण्याने भरलेला असतो. त्यात आंब्याची पाने, नागवेलीची पाने असतात. पाणी हे जीवनाचे आणि ही पाने हे चैतन्याचे प्रतीक आहेत. कलशावर ठेवलेला नारळ हा मंदार पर्वत आहे. आणि कलशाच्या गळ्याभोवती गुंडाळलेली दोरी ही वासुकी नागाचे प्रतीक आहे. यजमान आणि पुरोहित दोघेही याचे मंथन करतात. पूजेच्या वेळी म्हटला जाणारा मंत्रसुद्धा हेच सांगतो,

'कलशस्य मुखे विष्णू कंठे रुद्र समाश्रिताः मूलेतस्य स्थितो ब्रह्मा मध्ये मात्र गणा स्मृताः। कुक्षौतु सागरा सर्वे सप्तद्विपा वसुंधरा, ऋग्वेदो यजुर्वेदो सामगानां अथर्वणाः अङेश्च सहितासर्वे कलशन्तु समाश्रिताः।'

या साऱ्याचा वैज्ञानिक अर्थ आता समजावून घेऊ. सृष्टी ज्यांच्या बळावर चालते, ते ब्रह्म, विष्णू आणि महेश ही त्रिगुणात्मक शक्ती आहे. हे सारे ब्रह्मांड या कलशात असते. थोडक्यात सर्व समुद्र, बेटे, पृथ्वी, चारही वेद हे सारे या कलशात आहे. हा कलश म्हणजे एक घट आहे आणि यजमानाचे शरीरही एक घट आहे. या दोन घटांचे तादात्म्य होते. तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून विद्युत चुंबकीय ऊर्जा वाहून नेली जाते. नारळ हे ब्रह्मांडातील ऊर्जा स्वीकारते. आणि मग ती दुसऱ्या कलशाकडे पाठविते. कलश तांब्याचा असल्याने आपल्या मूलभूत तत्त्वाला जागत ही ऊर्जा यजमानाकडे पाठवितो. थोडक्यात ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्याला मिळते. कलशाभोवती बांधलेला दोरा ही ऊर्जा हळूहळू आपल्या सभोवताली पसरवतो. पण हा दोरा विद्युत रोधक असल्याने या ऊर्जेचा अपव्यय रोखतो.

आपण नेहमी करत असलेल्या पूजेमागील खरा शास्त्रार्थ हा आहे. त्यामुळे नेहमीच्या पारंपरिक कृतींकडे विज्ञानाचा डोळा लावून पाहिल्यास त्यातील विज्ञान कळून येईल.