गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

श्री भक्तविजय अध्याय ४१

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥    
जयजयाजी पंढरीशा ॥ लीलानाटकी जगन्निवासा ॥ विश्वरूपा हृषीकेशा ॥ अभंगा परेशा पांडुरंगा ॥१॥
जयजयाजी कमलापति ॥ विश्वात्मा तूं अंतर्ज्योति ॥ तुझी वर्णितां स्वरूपस्थिति ॥ कुंठित श्रुति जाहल्या कीं ॥२॥
जयजयाजी हरिहरेश्वरा ॥ अपरिमिता परम उदारा ॥ निजभक्तांच्या हृदयमंदिरा ॥ जगदुद्धारा वससी तूं ॥३॥
जयजय सगुणस्वरूपा मेघश्यामा ॥ गुणनिधाना आत्मारामा ॥ देवाधिदेवा पुरुषोत्तमा ॥ भजनीं प्रेमा असों दे ॥४॥
आतां प्रकट बैसोनि वैखरीवरी ॥ भक्तचरित्रें वदवीं बरीं ॥ जेणें श्रोतयांचें अंतरीं ॥ प्रेमलहरी कोंदाटे ॥५॥
मागिले अध्यायीं काथा अद्भुत ॥ दामाजीपंत प्रेमळ भक्त ॥ त्याचे संकटीं रुक्मिणीकांत ॥ निजांगें त्वरित पावले ॥६॥
आतां बेदरीं बादशाहा होते जाण ॥ शांतब्राह्मणी नामाभिधान ॥ तो राज्य करितां बहुत दिन ॥ वैराग्यज्ञान त्या जाहलें ॥७॥
तें म्हणाल जरी कोणे रीतीं ॥ तरीं तें चरित्र परिसा निगुतीं ॥ कांता घेऊनि उपरीवरती ॥ संवाद तिजप्रति करीतसे ॥८॥
नानापरींचीं सुमनचंदनें ॥ दिव्य वस्त्रें अलंकारभूषणें ॥ विलास करिती दोघें जणें ॥ निर्भयमनें असोनि ॥९॥
भोंवते भृत्य ठेविले रक्षण ॥ मग झरोक्यांत उभयतां बैसोन ॥ उत्तम शर्करा केळी आणवून ॥ प्रीतींकरून भक्षिती ॥१०॥
साली काढून झरोक्यांतून ॥ मार्गांखालीं देती टाकून ॥ तों भणंग वेडें दुर्बळ येऊन ॥ चोखीत बैसलें त्या ठायीं ॥११॥
राणी देखोनि तयाचें ॥ स्वामीसी दाखवी दुरूनि हस्तें ॥ म्हणे अटक असतां येथें ॥ कैसा आला कळेना ॥१२॥
ऐकोनि कांतेचें वचन ॥ शांतब्राह्मणी क्रोधायमान ॥ द्वारपाळांसी बोलावून ॥ तयांसी वचन पुसतसे ॥१३॥
तुम्हांस यास्तव बैसविलें द्वारीं ॥ कीं कोणास येऊं न द्यावें मंदिरीं ॥ आणि वेडे भणंग कैशापरी ॥ आलें भीतरी मज सांगा ॥१४॥
ऐसें बोलोनियां वचन ॥ द्वारपाळांसी केलें ताडन ॥ ते अवघेच भणंगापासीं येऊन ॥ लत्ताप्रहारें मारिती ॥१५॥
त्याचें दुःख न मानूनि कांहीं ॥ तें हांसों लागलें तये ठायीं ॥ शांतब्राह्मणी देखोनि पाहीं ॥ आश्चर्य करी मनांत ॥१६॥
दूतांसी सांगें तये क्षणीं ॥ तयासी मारूं नका कोणी ॥ त्याचिया दुःखें सद्गदित होउनी ॥ शांतब्राह्मणी रडतसे ॥१७॥
मग पुसता जाहला भणंगाप्रती ॥ द्वारपाळ तुजला ताडण करिती ॥ आणि हांसें आलें कैशा रीतीं ॥ सांग मजप्रति लावलाहें ॥१८॥
ऐसें रायें पुसिलें त्वरित ॥ मग भणंग तयासी उत्तर देत ॥ मी हांसलों निजकर्माप्रत ॥ दृष्टींस विपरीत देखोनि ॥१९॥
साल चोखोनि पाहिली किंचित ॥ तंव इतकीं शिक्षा पावली येथ ॥ पुढें तुझी कैसी होईल गत ॥ आश्चर्य चित्तांत वाटलें ॥२०॥
मंदिरप्रदेशीं येतां जाण ॥ तंव इतकें मज जाहलें ताडण ॥ तूं भीतरीं करितोसी नित्य शयन ॥ चिंता दारुण मज वाटे ॥२१॥
चोखिली साल जिव्हेसी लावितां ॥ तों निजकर्में इतुक्या बैसल्या लाता ॥ तुम्हीं आंतील मगज खातां ॥ पुढें दंड कोणता कळेना ॥२२॥
निर्जीव पिठाची उंडी जाण ॥ गिळितांचि मीन पावला मरण ॥ मग जीव मारूनि करिती उदरपोषण ॥ तरी गति कोण तयांची ॥२३॥
हें तुझें दुःख आठवलें चित्तीं ॥ म्हणोनि हांसें आलें मजप्रती ॥ ऐकोनि भणंगाची वचनोक्ती ॥ पालटली वृत्ती तत्काळ ॥२४॥
अनुताप धरूनियां चित्तीं टाकिली सर्व राज्यसंपत्ती ॥ वृत्तांत न कळतां कोणाप्रती ॥ महारण्यांत गेला पै ॥२५॥
एकांतीं बैसोनि शांतब्राह्मणी ॥ अति उद्विग्न जाहला मनीं ॥ म्हणे सत्समागमावांचोनी ॥ निढळवाणी मी एकला ॥२६॥
कैसें करावें ईश्वरभजन ॥ कैसें करावें योगसाधन ॥ कोणतें करावें देहासी दंडण ॥ हें कांहींचि मीं नेणें सर्वथा ॥२७॥
कैशा असती वैराग्यगोष्टी ॥ कैसा अनुताप धरावा पोटीं ॥ कैसी श्रीहरिकृपादृष्टी ॥ करील संकटीं मजलागीं ॥२८॥
कैसी करावी मानसपूजा ॥ कैसें अर्चावें गरुडध्वजा ॥ कैसा सफळ जन्म माझा ॥ होऊनि येईल कळेना ॥२९॥
जनीं रहावें कवणें स्थितीं ॥ कधीं भेटती संतमूर्ती ॥ शांतब्राह्मणी ऐशा रीतीं ॥ संकल्प चित्तीं आणीतसे ॥३०॥
तों आषाढमासीं पंढरपुरीं ॥ यात्रा चालिली अति गजरीं ॥ दृष्टीसी देखोनि ते अवसरीं ॥ हर्ष अंतरीं वाटला ॥३१॥
टाळ मृदंग विणे वाजविती ॥ वैष्णव आनंदें गाती नाचती ॥ एकमेकांसी नमन करिती ॥ आलिंगन देती सप्रेम ॥३२॥
दिव्य पताका सोडिल्या अनेक ॥ त्यांपुढें मिरविती गरुडटक ॥ माहेमोर्तब लावूनि देख ॥ वैष्णव अनेक चालिले ॥३३॥
ऐसा समारंभ दृष्टीसी देखोनी ॥ शांतब्राह्मणी हर्षला मनीं ॥ प्रीतीनें चलैला लोटांगणीं ॥ वैष्णवांलागोनि तेधवां ॥३४॥
म्हणे धन्य सुदिन आजिचा ॥ समागम जोडला संतांचा ॥ पूर्वजन्मींच्या सुकृताचा ॥ उदय साचा जाहला कीं ॥३५॥
जें इच्छित होतें मनांत ॥ तेंचि तत्काल जाहलें प्राप्त ॥ ऐसें समाधान मानूनि चित्तांत ॥ चालिला त्वरित त्यांसवें ॥३६॥
पंढरीक्षेस्त्रासी येऊन ॥ चंद्रभागेचें केलें स्नान ॥ करूनि पुंडलिकाचें पूजन ॥ संतसज्जन नमियेले ॥३७॥
क्षेत्रप्रदक्षिणा करूनी ॥ महाद्वारासी आला शांतब्राह्मणी ॥ कीर्तनगजर दृष्टीं देखोनी ॥ संतोष निजमनीं वाटला ॥३८॥
उदंड तीर्थें आणि दैवत ॥ देखिलीं आणि ऐकिलीं असंख्यात ॥ परी पंढरीऐसें क्षेत्र अद्भुत ॥ नाहीं दिसत त्रिभुवनीं ॥३९॥
उपमा द्यावया पाहतां सकळ ॥ तों एकही ऐसें न दिसे स्थळ ॥ कैसाही दुर्बुद्धि असला खळ ॥ तो होय प्रेमळ पंढरीसी ॥४०॥
आणि तीर्थाचें करितां स्नान ॥ तरी तत्काळ येतो अभिमान ॥ चंद्रभागेचें होतां दर्शन ॥ घालिती लोटांगण एकमेकां ॥४१॥
ऐसें क्षेत्र देखोनि नयनीं ॥ शांतब्राह्मणी आनंदला मनीं ॥ मग गरुडपारीं लोटांगणीं ॥ प्रेमेंकरूनि जातसे ॥४२॥
सकळ वैष्णवांसी करूनि नमन ॥ दिधलें प्रीतीनें आलिंगन ॥ मग घ्यावया देवदर्शन ॥ शेजारमंडपीं आला पै ॥४३॥
तों परब्रह्म उभें विटेवरी ॥ दृष्टीं देखिलें ते अवसरीं ॥ सद्भावें आलिंगन देऊनि उरीं ॥ मग चरण नमस्कारी तेधवां ॥४४॥
म्हणे जयजयाजी पुराणपुरुषा ॥ सगुणस्वरूपा हृषीकेशा ॥ लीलानाटकी सर्वेशा ॥ पंढरीशा श्रीविठ्ठला ॥४५॥
तुझी कीर्ति ऐकूनि कानीं ॥ शरण आलों चक्रपाणी ॥ परी तुझें स्वरूप जाणावया मनीं ॥ सद्गुरु कोणी भेटेना ॥४६॥
तरी माझे मनोरथ करीं पूर्ण ॥ म्हणोनि द्वारी बैसला घालोनि धरणं ॥ नेघे फल मूल अथवा जीवन ॥ वर्जिलें अन्न अनुतापें ॥४७॥
त्रिरात्र लोटतां त्वरित ॥ प्रसन्न जाहला रुक्मिणीकांत ॥ विवेकसिंधूचें पुस्तक साक्षात ॥ दिधलें स्वप्नांत आणूनि ॥४८॥
सहजानंदस्वामी कल्याणांत ॥ तयाचा उपदेश घेईं त्वरित ॥ स्वप्नीं सांगतां पंढरीनाथ ॥ मग जाहला जागृत ते काळीं ॥४९॥
तों पुस्तकमात्र असे तेथ ॥ दृष्टीसी न दिसे पंढरीनाथ ॥ आश्चर्य करीतसे मनांत ॥ चमत्कार बहुत देखोनि ॥५०॥
म्हणे जगद्गुरुनें दिधलें दर्शन ॥ तेणें जाहलो मी पुण्यपावन ॥ मग विवेकसिंधुपुस्तक वाचोन ॥ करीत मनन एकांतीं ॥५१॥
सहजानंद गुरु करण ॥ हे स्वप्नींची झाली आठवण ॥ मग देवासी आज्ञा मागोन ॥ केलें गमन सत्वर ॥५२॥
कल्याणास आला लवलाहीं ॥ तंव सद्गुरु नाहीं तया ठायीं ॥ मागुती कार्तिक मासीं पाहीं ॥ पांडुरंगक्षेत्रासी पावला ॥५३॥
तों सहजानंदस्वामी अकस्मात ॥ तेही यात्रेस आले तेथ ॥ शांतब्राह्मणी भेटोनि त्वरित ॥ स्वप्नींचा वृत्तांत सांगितला ॥५४॥
मग त्यासी उपदेश देऊनि पाहें ॥ नाम ठेविलें मृत्युंजये ॥ नारायणपुरासी वास्तव्ये ॥ जाऊनि लवलाहें पैं केलें ॥५५॥
सद्गुरुमुखें श्रवण मनन ॥ करितां लागलें निदिध्यासन ॥ मग साक्षात्कारासी येऊन ॥ विज्ञानस्थिती पावला ॥५६॥
भवराया जंगम तये स्थानीं ॥ परम भाविक होतां ज्ञानी ॥ तो मृत्युंजयासी शरण येऊनी ॥ उपदेश घेतला प्रीतीनें ॥५७॥
दुसरा समुच्चय जंगम तेथ ॥ श्रेष्ठ म्हणवी सर्वांत ॥ तो भवरायाची निंदा करित ॥ घातलें वाळीत तयासी ॥५८॥
म्हणे मृत्युंजय जातीचा यवन ॥ तयासी किंचित जाहलें ज्ञान ॥ त्याचा उपदेश भवरायान ॥ नेणतां कैसा घेतला ॥५९॥
शूद्रगृहींचें पक्वान्न ॥ देखोनि काय सेविती ब्राह्मण ॥ मद्यपात्रांत गंगाजीवन ॥ आलिया प्राशन करूं नये ॥६०॥
नूतन पादुका असल्या तरी ॥ त्या बांधूं नये मस्तकावरी ॥ महाद्वाराची पायरी ॥ ते काय देव्हारीं पूजावी ॥६१॥
पायींचा पोल्हारा सुवर्णमये ॥ तो सर्वथा नाकीं घालूं नये ॥ महावृक्षाची सरी पाहें ॥ एरंड काये करील ॥६२॥
पितळ सोज्ज्वळ उटिलें जरी ॥ परी त्यासी कनकाची नये सरी ॥ वृंदावन जरी घोळिलें शर्करीं ॥ परी तें अंतरीं कडवट ॥६३॥
राजाची वेश्या सुंदर गुणी ॥ परी काय बसेल पुण्याहवाचनीं ॥ तेवीं यवनयाति सद्गुरुस्थानीं ॥ मानूं नयेचि सर्वथा ॥६४॥
यापरी विकल्प धरूनि अंतरीं ॥ समुच्चय त्याची निंदा करी ॥ भवराया ऐकोनि ते अवसरीं ॥ सखेद अंतरीं जाहला ॥६५॥
मग मृत्युंजयाजवळी त्याणें ॥ जाऊनि सांगितलें गार्‍हाणें ॥ ऐकतां सद्गुरु त्याकारणें ॥ आश्वासन देताती ॥६६॥
म्हणती आपुला विश्वास करूनि जतन ॥ निवांत करी ईश्वरभजन ॥ विकल्पद्वेषियाचें वचन ॥ ऐकूं नये सर्वथा ॥६७॥
तंव तेथें एक होता भूपती ॥ त्याचें नांव काशीपती ॥ तो परम उदार सज्ञानमूर्ती ॥ शिवभक्तीसी अति तत्पर ॥६८॥
तो नित्य दहा सहस्र जंगम जाण ॥ आपुलें मंदिरीं बोलावून ॥ त्यांची षोडशोपचारीं पूजा करून ॥ मिष्टान्नभोजन देतसे ॥६९॥
तों एके दिवशीं काशीपती ॥ जंगम बैसवूनि भोजनपंक्तीं ॥ पूजा करूनि निजप्रीतीं ॥ अन्न पात्रीं वाढिलें ॥७०॥
घृत शर्करा धराधीश ॥ निजकरें वाढीत सकळांस ॥ मग आज्ञा दिधली तयांस ॥ नैवेद्य शंकरास दाखवावया ॥७१॥
रुमाल सोडोनि जंव पाहात ॥ तों अवघेचि लिंगाविरहित ॥ म्हणती हें जाहलें विपरीत ॥ म्हणोनि लज्जित मानसीं ॥७२॥
जैसा षट्शास्त्री ब्राह्मण ॥ त्याचें यज्ञोपवीत गेलें गळोन ॥ पाहतां होय लज्जित मन ॥ तैसेंचि जाहलें तयांसी ॥७३॥
कैंचें पूजन कैंचें भोजन ॥ देहान्तप्रायश्चित्त ओढवलें गहन ॥ शिव हरोनि गेलिया जाण ॥ जीवरक्षण न करावें ॥७४॥
लिंगधारण जेव्हां ते करिती ॥ तेव्हां कुळगुरु ऐसेंचि सांगती ॥ कीं लिंग टाकूं नये देहांतीं ॥ प्रतिज्ञा घालिती जीवित्वा ॥७५॥
वाळीत घालावें कवणाप्रती ॥ सकळांची जाहली एक गती ॥ बैसल्या दहा सहस्र मूर्ती ॥ परी पडिली भ्रांती सकळांसी ॥७६॥
एक म्हणती द्यावे प्राण ॥ एक म्हणती कासया जिणें ॥ एक म्हणती कैंचें भोजन ॥ विघ्न अवचित ओढवलें ॥७७॥
एक म्हणति भक्षिलें राजाचें अन्न ॥ तें आपुले पदरीं पडिलें दूषण ॥ म्हणोनि शंकरें सकळांकारण ॥ दिधलें टाकून दिसताहे ॥७८॥
एक म्हणती अन्नासी काय बाध ॥ आपुलाचि भाव नाहीं शुद्ध ॥ शिव टाकूनि गेला प्रसिद्ध ॥ लीला अगाध दाविली ॥७९॥
ऐसें एकमेकांसी बोलती ॥ परी उपाय न सुचे कोणाप्रती ॥ कुंठित जाहल्या सकळांच्या मती ॥ खालीं पाहती सकळिक ॥८०॥
यावरी काशीपति कल्याणी ॥ जंगमांसी पुसतसे तये क्षणीं ॥ साधुपुरुषांची छळणा कोणी ॥ आला करूनि दिसताहे ॥८१॥
यालागीं तुम्हां सकळांवर ॥ क्षोभोनि पळाला विश्वेश्वर ॥ ऐकोनि रायाचें उत्तर ॥ पुसती साचार एकमेकां ॥८२॥
तंव समुच्चय जंगम आपुलें मनीं ॥ म्हणे अन्याय घडला मजकडोनी ॥ अविंधाचा शिष्य म्हणोनी ॥ भवरायासी निंदिलें ॥८३॥
हा दोष घडला मज दारुण ॥ साक्ष देतसे माझें मन ॥ यासी उपाय करावा कवण ॥ आम्हांकारण कळेना ॥८४॥
यावरी राजा बोले वचन ॥ मृत्युंजयासी प्रार्था अवघे जण ॥ तरीचि संकटनिवारण ॥ होईल जाण निश्चयेंसीं ॥८५॥
ऐसी राजाची वचनोक्ती ॥ मानली सकळांचिये चित्तीं ॥ मग उठोनियां सकळ पंक्ती ॥ सत्वरगती चालिले ॥८६॥
मृत्युंजयाचे मठांत येऊन ॥ सकल घालिती लोटांगण ॥ तयासी वृत्तांत निवेदन करून ॥ कर जोडून ठाकले ॥८७॥
म्हणती भवरायातें साचार ॥ आम्ही बोलिलों दुरुत्तर ॥ तेणेंकरूनि श्रीशंकर ॥ गुप्त झाला न दिसेचि ॥८८॥
ऐकोनियां ऐसें वचन ॥ बैसविलें तयांलागून ॥ मग मृत्युंजय बोले गर्जोन ॥ सकळांप्रति तेधवां ॥८९॥
म्हणे वेदांत सिद्धांत दोघे जण ॥ आमुचें घरीं आहेचि श्वान ॥ त्यांणीं तुमचीं लिंगें हिरून ॥ नेलीं असतील वाटतें ॥९०॥
मग वेदांत म्हणूनि हांक मारितां ॥ तों श्वान प्रगटलें अवचितां ॥ म्हणे जंगमांचीं लिंगें कासया वृथा ॥ चोरूनियां आणिलीं ॥९१॥
तीं सत्वर देईं टाकून ॥ ऐकोनि मृत्युंजयाचें वचन ॥ पांच सहस्र लिंग ओकून ॥ टाकी श्वान तेधवां ॥९२॥
मग सिद्धांत म्हणोनि हांक मारितां जाण ॥ तेथें प्रगटलें दुसरें श्वान ॥ तयानें पांच सहस्र लिंगें वमून ॥ दिधलीं टाकून ते ठायीं ॥९३॥
ऐसें कौतुक देखोन ॥ आश्चर्य करिती सकळ जन ॥ म्हणती विष्णुभक्तांचें महिमान ॥ कोणाकारणें न कळेचि ॥९४॥
परी आपुलालीं ओळखूनि घ्यावयासी ॥ सामर्थ्य नव्हे कवणासी ॥ मागुती नमस्कार मृत्युंजयासी ॥ निजभावेंसीं घालिती ॥९५॥
जैसें श्रियाळासी पार्वतीनाथें ॥ चिलये दाविले अष्टोत्तरशतें ॥ परी त्याचा त्यास न कळे निश्चितें ॥ तैसें आम्हांसी जाहलें कीं ॥९६॥
मग प्रसन्न होऊनि कैलासवासी ॥ त्याचाच पुत्र दिधला त्यासी ॥ तैसेंच करावें आम्हांसी ॥ म्हणूनि चरणांसी लागले ॥९७॥
ऐकूनि त्यांचें करुणाउत्तर ॥ त्यांपाशीं गेलीं सत्वर ॥ सकळ करिती जयजयकार ॥ वाचेसी हरहर बोलती ॥९८॥
ज्ञानसागर अय्या म्हणवूनी ॥ नाम ठेविलें सकळांनीं ॥ मग राजमंदिरासी जाऊनी ॥ सकळ भोजनीं बैसले ॥९९॥
ऐशा रीतीं वैष्णव भक्त ॥ चरित्रें दाविती अघटित ॥ महीपति तयांचा शरणागत ॥ गुण वर्णित निजप्रेमें ॥१००॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकचत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥१०१॥
अध्याय ॥४१॥    ॥ ओंव्या ॥१०१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ 
॥ श्रीभक्तविजय एकचत्वारिंशाध्याय समाप्त ॥