रविवार, 10 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 8 मे 2024 (13:35 IST)

श्री परशुराम माहत्म्य अध्याय ६

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीभरताग्रजाय नमः ॥
जय जया पुरुषोत्तमा भक्तप्रिया भार्गवरामा ब्रह्मवर्चसी मेघःशामा गजा सुरसूदना नमोस्तुते ॥१॥
पुढें काय कथा वर्तली ॥ सांगा आपणासी सकळी जेणें न स्पर्शेल कली हरिकथामृत ऐकतां ॥२॥
रामकथामृत मर्त्यलोकीं पीत ते वैकुंठीं सतत नांदतील ॥३॥
सूत ह्मणे श्रोते शिरोमणी हे भार्गवराम मुनी गो विप्र रक्षणा कारणीं संचार करिती ॥४॥
परशुराम ब्रह्मवर्चस्वी आले तेव्हां श्रीकैलासीं विष्णुपदीं वाहे जळासी शंकर जटेंतुनी ॥५॥
अवलोकूनी गंगेसी करावें ह्मणे स्नानासी संध्या वंदन होमासी नित्यनेम पैं केले ॥६॥
निघाले ते शोभा पाहत स्फटिकमय पर्वत तेथें शिखरें रजत कल्पतरु शोभती ॥७॥
वनें उपवनें सुरस कदली वृक्ष बहुवस अंब्रादिक काय फणस शब्द करिती शुक कोकिला ॥८॥
तेथें शतवलूशना मेंवट कल्पतरु तो अद्भुत शंभर योजनें विस्तृत निरुपद्रव निर्जंतु ॥९॥
सर्व ऋतूचे सर्व भोग सर्व सिद्धी विद्या पारग रम्यरुपें दिसती नाग वायू तेथें सेवक ॥१०॥
स्फटिक रजत भूमिका सुरमणी भूतनायका पार्वती घेवोनि अंका ब्रह्मानंदें बैसले ॥११॥
जटाजूटीं विष्णुपदी हस्तीं धरिली अक्षपदी तर्क मुद्रे निवेदबोधी स्पष्ट करोनी ॥१२॥
नाना प्रकारचे वेदांत योग्यता नुसारें सांगत रामचरित्रविस्तारित नारदादीसंतांप्रती ॥१३॥
बहुत गण द्वारपाळ त्यांचा पती एक अमल गणांचा पती उमाबाल मलोद्भव तोचि पैं ॥१४॥
तो प्रमथ गणांच्या सह द्वारीं बैसोनि पैं आह ॥ कोणी विचित्र आले इह सर्वांनीं पहावें ॥१५॥
तो बोलतां जवळी आले विनायकानें अद्भुत देखिलें ह्मणे कोणी आलासे विचित्र बळें परी युद्धार्थी दिसतो ॥१६॥
विघ्न करील शिव पार्वतीसीं भंग होईल क्रीडेसी तरी युद्ध करोनी त्‍द्यावी रासी परतऊनी दवडूं ॥१७॥
येवोनि बोलती राम वाट द्यावी आह्मां काम धनुर्वेद शिकणें जाण अह्मीं जातों लवकरी ॥१८॥
ऐसें ऐकतां क्रोधायमान बोले दिसता बाळ निर्गुण तुह्मीं आहात मुमुर्षू पूर्ण जाणतों मी सर्वदा ॥१९॥
तें ऐकोन धनुष्यास बाण लावोनि क्रोधें परशुराम शिर तात्काळ छेदोन समुद्रजळीं पाडिलें ॥२०॥
प्रमथगणांनी जावोन सांगीतलें तें वर्तमान पार्वती भयाभीत मन द्वारीं पातली ॥२१॥
येवोनि बोले हाय हाय बोल बोल माझे माय शिरावांचूनी तुझें काय कोणी करीयेलें ॥२२॥
मला प्रीय एक तूं सूत बाकीचे अतिरौद्र असंख्यात बाळा तूं का न बोलत विचित्र करी शोक ऐसा ॥२३॥
शोक ऐकतां ते राम ह्मणती म्यां वाईट केलें काम तरी करावें अभयदान अपराध क्षमा करावा ॥२४॥
धरोनी सतीचे चरण तूंचि अंबा होय जाण आतां ह्मणसील तें करीन अपराधी मी असें ॥२५॥
भ्रुगुवंशज भूदेव जमदग्नी तयाचें नाव तेथून माझा प्रादुर्भाव ह्मणती रामनाम मजतें ॥२६॥
धनुर्वेद शिकावया येथ आलों तुझीये कैलासाप्रत तव प्रमथपती युद्धाप्रत गर्वीष्ठपणें आलासे ॥२७॥
ह्मणोनी यथार्थ वधिला आतां गर्वापासोनि निघाला पुनः देईन जीविताला ॥ सत्य सत्य बोलतों ॥२८॥
अभय देतां बोले सती शिर लावोनी जीवंती त्वां करावें तूर्णमिती ॥ तेव्हां पुत्र दुःख जाईल ॥२९॥
बहूचीया पुत्रासाठीं ईश्‍वर प्रसादिला हीमतटीं तेणें सत्पुत्र एकपोटीं होय माझिये ॥३०॥
ऐसें ऐकतां पार्वतीतें ह्मणे समुद्रीं टाकिलें शिरातें तरी आतां गज शिरातें लावोनि जीवंत करितो ॥३१॥
एवं बोलतां तत्क्षणीं जीवंत केले सुधापाणी अगाध कृत्य ईशमणी मनुष्यत्वें खेळतो ॥३२॥
मोहन करी दुष्टासी साधी आपुले भक्त कार्यासी येवोनि वंदी गिरीशासी उभे ठेले समोर ॥३३॥
तंव देखोनि तें रुप ह्मणे पूर्ण माझें आजी तप ॥ ज्याचे मस्तकीं धरीलें आप तो हा प्रत्यक्ष देखिला ॥३४॥
इतुकें जाणतो शंकर बोले पुनः परशुधर शिकवा धनुर्वेद सत्वर गुरुवांचूनि कळे ह्मणोनी ॥३५॥
शंकर बोलती हांसोन सूर्यासी काय खद्योत गुण तेवीं माझियापासून घ्याव्या विद्या ॥३६॥
सकल विद्या आणि कळा अर्पिल्या आदरें रामाला घेऊनि कृतकृत्य पितृगृहाला निघते जाले ॥३७॥
ते कैलासापासुनी परशुराम धनुष्पाणी अनुपम तेजें सुलक्षणी गजगती श्रीनिवास ॥३८॥
पद्मपाणी पद्मवक्र पद्मनाभी पद्मनेत्र पद्मपाद अतिपवित्र प्रसन्न वदन शोभती ॥३९॥
ते भ्रुगुवर्य जटील कृष्णाजिन धारीकीं अनल अनंत शक्ती भक्त वत्सल सर्वातीत हा सर्वज्ञ असे ॥४०॥
याचें यश कोण गणिती वेद ह्मणती नेति नेती मायावश काय वर्णिती ॥ ईशविभूती ॥४१॥
सूत बोले सावधान हे शौनकादि सुमन परिसावें सर्व कथन श्रवणामृतचि पैं ॥४२॥
हें परशुरामचरित्र केलें अमृताचें सत्र तृप्त व्हा श्रोते पवित्र सावधान परिसीजे ॥४३॥
स्वस्ती श्रीपरशुरामविजय कल्पतरु वर्णितां महात्म्य अपारु ऐकतां निःपाप होती नरु षष्ठमोध्याय गोड हा ॥६॥
श्रीरेणुका तनयार्पणमस्तु ॥