शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 5 जून 2024 (16:00 IST)

गाझातील आणखी चार ओलिसांचा मत्यू झाल्याच्या वृत्ताला इस्रायलकडून दुजोरा

israel hamas war
हमासनं 7 ऑक्टोबरला अपहरण केलेल्या चार जणांचा मृत्यू झाला असल्याचं, इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे.
गाझाच्या दक्षिण भागातील खान युनिसमध्ये इस्रायलचे ऑपरेशन सुरू असताना या चार जणांचा मृत्यू झाल्याचं इस्रायली लष्करानं म्हटलं आहे. या चारही जणांचे मृतदेह अजूनही दहशतवाद्यांच्या ताब्यात आहेत.
 
ब्रिटिश-इस्रायली नादाव पॉपलवेल (51), क्लेम पेरी (79), योराम मेट्झगर (80) आणि अमिराम कूपर (85) अशी त्यांची नावं आहेत.
 
मागील काही आठवड्यात गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा निष्कर्ष काढण्यात आला असल्याचं, इस्रायली सैन्याचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हगारी म्हणाले.
 
"आम्ही परिस्थितीचं मूल्यांकन केलं असून त्यानुसार हमासविरुद्धच्या आमच्या खान युनिस भागातील ऑपरेशनमध्ये या चारही जणांचा एकत्र असताना मृत्यू झाला आहे," असं ते म्हणाले. मात्र त्यांनी यासंदर्भात पुढील माहिती दिली नाही
 
मागील महिन्यात हमासनं दावा केला होता की नादाव पॉपलवेल यांचा इस्रायलनं एप्रिल महिन्यात केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
 
युकेच्या परराष्ट्र खात्यानं सांगितलं की ते या गोष्टीचा तपास करत आहेत. मात्र नादाव यांच्या मृत्यूबद्दल अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही.
 
डिसेंबरमध्ये हमासनं एक व्हिडिओ जारी केला होता ज्यामध्ये इतर तीन जणांना दाखवण्यात आलं होतं.
 
चारही ओलिसांचं 7 ऑक्टोबरला गाझा पट्टी जवळच्या किबुट्झ येथून अपहरण करण्यात आलं होतं.
 
ओलिस आणि बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबांसाठी काम करणाऱ्या एका व्यासपीठावरून त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे की या माणसांच्या मृत्यूच्या बातम्यांनी प्रत्येक नेत्याला गहन आत्मशोधाकडे नेलं पाहिजे.
 
या वक्तव्यात म्हटलं आहे की "चेम, योराम, अमिराम आणि नादाव यांचं जिवंतपणी अपहरण करण्यात आलं होतं, त्यांच्यातील काहीजण आधी झालेल्या तडजोडीनुसार परतलेल्या ओलिसांमध्ये होते. ते त्यांच्या देशात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे जिवंत परत यायला हवे होते."
 
एक्स (आधीचे ट्विटर) टाकण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये युकेचे परराष्ट्र सचिव डेव्हिड कॅमेरॉन म्हणाले की "नादाव पॉपलवेलच्या मृत्यूची बातमी ऐकून त्यांना खूपच दु:ख झालं आहे. या कठीण प्रसंगी माझ्या सदभावना त्यांच्या प्रियजनांबरोबर आहेत."
 
नादाव पॉपलवेल यांचं त्यांच्या घरातून त्यांच्या आईबरोबर अपहरण करण्यात आलं होतं. नंतर त्यांच्या आईची सुटका करण्यात आली होती. तर त्यांचा भाऊ रॉय याचा हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता.
 
हमासनं दक्षिण इस्रायलमध्ये केलेल्या हल्ल्यात जवळपास 1,200 लोकं मारली होती आणि इतर 251 जणांना ओलीस म्हणून नेलं होतं, अशी माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
नोव्हेंबर महिन्यात एक आठवडाभर चाललेल्या युद्धविरामाच्या काळात 105 नागरिकांच्या गटाला मुक्त करण्यात आलं होतं.
 
अजूनही जवळपास 120 ओलीस बेपत्ता आहेत. इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं गृहीत धरण्यात आलं आहे.
 
इस्रायलनं हमासला नष्ट करण्यासाठी सीमेपलीकडे हल्ला चढवत एक लष्करी अभियान सुरू केलं होतं.
 
जवळपास आठ महिन्यांच्या लढाईमध्ये गाझामध्ये किमान 36,470 लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती हमास संचालित आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
 
Published By-