गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 ऑक्टोबर 2023 (11:21 IST)

'येथे तुम्हाला रुपये मिळतात, सौदी अरेबियात तुम्हाला रियालमध्ये भीक मिळेल'

ऑक्टोबर महिन्यातील 5 तारखेला पाकिस्तानातील दोन महिला आणि दोन पुरुष उमराह यात्रेकरू म्हणून सौदी अरेबियाला जाण्यासाठी लाहोरच्या अल्लामा इक्बाल विमानतळावर आले होते. ते सौदी निघाले होते भीक मागण्यासाठी.
 
नसरीन, त्यांचे काका अस्लम, काकू परवीन आणि भाऊ आरिफ हे पंजाबच्या कसूर जिल्ह्यातील भिकाऱ्यांच्या 'संघटित गटाचे' सदस्य होते.
 
हे चारजण विमानतळावरील एफआयए इमिग्रेशन काउंटरवर पोहोचले.
 
नसरीन यांनी याआधी 16 वेळा सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये प्रवास केला आहे. तर परवीन यांनी उमराहचं (तीर्थक्षेत्र) निमित्त साधून नऊ वेळा पाकिस्तानच्या बाहेर प्रवास केलाय.
 
तीर्थयात्रेला जाण्याच्या बहाण्याने भीक मागण्यासाठी हे लोक इतर देशात जातात.
 
अस्लम आणि आरिफ हे सौदी अरेबियाला पहिल्यांदाच भेट देत असले तरी त्यांनी यात्रेच्या निमित्ताने भीक मागण्यासाठी यापूर्वी अनेकदा इराण आणि इराकमध्ये प्रवास केला होता.
 
चौघांची चौकशी केल्यानंतर एफआयए इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्यांना विमानात चढण्यापासून रोखलं आणि त्यांच्यावर 'ट्रॅफिकिंग इन पर्सन्स अॅक्ट, 2018' अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
 
एफआयआर मधील माहितीनुसार, चौकशीदरम्यान चारही आरोपींनी कबूल केलं की ते उमराह यात्रेच्या निमित्ताने सौदी अरेबियाला जात होते. पण भीक मागणे हा त्यांचा मूळ उद्देश होता.
 
बीबीसीकडे उपलब्ध असलेल्या एफआयआर मधील माहितीनुसार, हे सर्व आरोपी यापूर्वी भीक मागण्यासाठी सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये गेले होते.
 
आरोपी आणि त्यांचा एजंट जहानजेब यांच्यात झालेल्या मोबाइल संभाषणातून हा गट परदेशात भीक मागण्यासाठी जात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या आरोपींचे मोबाईल फोन पुढील तपासणीसाठी फॉरेन्सिककडे पाठविण्यात आले आहेत.
 
नसरीन आणि परवीन यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून अन्य दोन आरोपी महंमद अस्लम आणि आरिफ यांना पुढील चौकशीसाठी पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
 
9 ऑक्टोबर रोजी स्थानिक न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या नसरीन यांच्याशी बीबीसीने न्यायालयाबाहेर संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या, "आम्हाला अशा प्रकारे अटक करून हा प्रश्न सुटणार आहे का? या देशातले लोक उपाशी आहेत, त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचा पर्याय नाहीये."
 
नसरीन यांच्या म्हणण्यानुसार, "आम्हाला अटक करून हे काम थांबणार नाही. आम्हा गरीब लोकांना सहज पकडलं, दुसऱ्या कोणत्या मोठ्या व्यक्तीला यांनी पकडलं आहे का?
 
भीक मागण्यासाठी परदेशात गेल्याने पाकिस्तानची बदनामी होत नाही का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, "आधी जाऊन काय झेंडे लावलेत काय"
 
नुकतेच पाकिस्तानच्या विदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी सिनेटच्या स्थायी समितीला माहिती देताना सांगितलं होतं की, परदेशात अटक करण्यात आलेल्या भिकाऱ्यांपैकी 90 टक्के भिकारी पाकिस्तानचे आहेत.
 
हैदर यांनी केलेल्या दाव्यानंतर बीबीसीच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या. त्यानुसार पाकिस्तानमधील एजंट भिकारी किंवा गरजू लोकांना पद्धतशीरपणे मध्यपूर्वेतील देशांमध्ये, विशेषत: सौदी अरेबिया, इराण आणि इराकमध्ये पाठवतात. तिथे त्यांना भीक मागायला लावली जाते.
 
मिळणाऱ्या उत्पन्नात या एजंटचाही वाटा असतो.
 
अलीकडेच, सौदी अरेबियातील सरकारने या प्रकरणावर पाकिस्तान सरकारकडे औपचारिक तक्रार केल्यानंतर, त्यांनी या समस्येवर उपाय म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाला सूचना दिल्या होत्या. त्या अंतर्गतच नसरीन आणि त्यांच्या कुटुंबाला अटक करण्यात आली.
 
पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एफआयए) मते, अलीकडच्या काही दिवसांत मुलतान आणि सियालकोट येथून काही टोळ्यांना अटक करण्यात आली आहे. या टोळ्या उमराहच्या बहाण्याने लोकांना सौदी अरेबियात घेऊन जातात. आत्तापर्यंत अशा 37 लोकांना अटक करण्यात आली आहे.
 
'पहिल्यांदा सौदी अरेबियाला जात आहे'
नसरीन यांचा भाऊ आरिफ आणि काका अस्लम यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, ते पहिल्यांदाच उमराहच्या बहाण्याने सौदी अरेबियाला भीक मागण्यासाठी जात होते.
 
माजिद अलीच्या म्हणण्यानुसार, त्यांचं संपूर्ण कुटुंब भीक मागतं आणि हे पिढ्यानपिढ्या सुरू आहे.
 
त्यांनी माहिती देताना सांगितलं की, "आम्ही एजंटला प्रति व्यक्ती 230,000 रुपये दिले. त्या बदल्यात त्याने व्हिसा आणि तिकिटांची व्यवस्था केली. सर्वांना सौदी अरेबियात 20 दिवस राहावं लागणार होतं."
 
"सुरुवातीला मी माकडासारख्या उड्या मारून रस्त्यावर आणि परिसरात भीक मागायचो, पण त्यानंतर मी इराण आणि इराकमध्ये भीक मागायला जाऊ लागलो."
 
आरिफच्या म्हणण्यानुसार, इराण आणि इराकमध्ये प्रती व्यक्ती 20 ते 30 हजार रुपये कमावले जातात.
 
इराण, इराक आणि सौदी अरेबियात जाऊन तो कधी मूकबधिर असल्याचे भासवून, भूक लागल्याचे इशारे करून भीक मागायचा.
 
आरिफ सांगतो, "अशा प्रकारे तीर्थयात्राही झाली आणि पैसेही कमावले."
 
अटक करण्यात आलेल्या लोकांनी सौदी अरेबियातील त्यांची राहण्याखाण्याची व्यवस्था करणाऱ्यांची माहिती दिली नाही.
 
पण एफआयएच्या मते, "एफआयए, या लोकांना सौदी अरेबियामध्ये निवास आणि इतर सुविधा पुरवणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे." सध्या एफआयएचे डेप्युटी डायरेक्टर अँटी ह्युमन सर्कल मोहम्मद रियाज खान यांच्या देखरेखीखाली तपास सुरू आहे.
 
बीबीसीशी बोलताना मोहम्मद रियाझ खान यांनी दावा केला की, "आतापर्यंतच्या तपासानुसार परदेशात जाऊन भीक मागणं संघटित गुन्हेगारी बनली आहे. यात पाकिस्तानसह परदेशातील विविध गट सामील आहेत."
 
मोहम्मद रियाझ खान यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील चार आरोपी आणि एजंट यांच्यात असं ठरलं होतं की, कमाईचा अर्धा हिस्सा एजंटला दिला जाईल. हा एजंट केवळ त्यांची प्रवासाची कागदपत्रेच नव्हे तर सौदी अरेबियातील त्यांच्या निवासाची आणि इतर गोष्टींची सोय करणार होता.
 
'सौदी अरेबियात रियालमध्ये भीक मिळते'
उमराहच्या नावाने भिकाऱ्यांना सौदी अरेबियात नेण्यासाठी सोशल मीडिया फेसबुक पेज चालवणाऱ्या एका एजंटने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, "इथे तुम्हाला रुपये मिळतात तर सौदी अरेबियात भीक रियालमध्ये दिली जाते. रुपया आणि रियालमध्ये मोठा फरक आहे."
 
त्याने सांगितलं की, "मजुरी आणि उमराहच्या नावावर मी इथून लोकांना सौदी अरेबियात नेतो. कधी 16 तर कधी 25 लोक असतात. जवळपास पाच महिन्यांपासून मी हे काम करतोय."
 
पाकिस्तानमध्ये काम करणाऱ्या विविध एजंटप्रमाणे ही व्यक्तीही फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आपलं काम चालवते. व्हॉट्स अॅपवरून लोकांना सर्व तपशील पुरवले जातात.
 
त्यांच्या कामाची पद्धत अशी आहे की, पाकिस्तानातील अनेक लोक मजुरीच्या उद्देशाने या एजंटशी संपर्क साधतात. ज्यांना काम करायचं नसतं त्यांना भीक मागण्यासाठी विचारलं जातं.
 
एजंटने सांगितलं की, पाकिस्तानातील प्रत्येकजण कामासाठी जात नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं दिलं जातं.
 
"यात महिला आणि मुलं देखील असतात. ते आधी उमराह किंवा तीर्थयात्रेसाठी व्हिसा मिळवतात. आणि नंतर त्यांना मक्का आणि पैगंबर मशिदीसमोर भीक मागण्यासाठी बसवलं जातं."
 
पाकिस्तानी भिकाऱ्यांबद्दल तुम्हाला कसे कळले?
या महत्त्वाच्या मुद्द्यावर सौदी अरेबियाच्या सरकारने पाकिस्तान सरकारला दिलेली अधिकृत कागदपत्रे बीबीसीने मिळवली आहेत.
 
बीबीसीकडे उपलब्ध असलेल्या अधिकृत कागदपत्रांनुसार, "16 जून 2023 रोजी सौदी अरेबियाच्या सरकारने पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाला सौदी अरेबियामध्ये भीक मागणे, वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांची तस्करी आणि बनावट प्रवासी दस्तऐवज तयार करणे यासारख्या गुन्ह्यांमध्ये पाकिस्तानी लोकांचा सहभाग असल्याची माहिती दिली होती."
 
या कागदपत्रानुसार, सौदी अरेबियाच्या औपचारिक तक्रारीनंतर, पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने एफआयएसह गृह मंत्रालय आणि इतर मंत्रालयांना याबाबत सूचना दिल्या.
 
त्यानंतर एफआयएने सर्व विमानतळांवर सौदी अरेबियासह इतर मध्य पूर्व देशांत जाणाऱ्या पाकिस्तानींची प्रोफाइल तयार करायला सुरुवात केली.
 
पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, त्यांना सौदी अरेबिया, इराण आणि इराकने याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर ही माहिती अहवालाच्या स्वरूपात सादर करण्यात आली.
 
ते म्हणाले, "माहिती मिळाल्यानंतर एफआयएने कारवाई करायला सुरुवात केली. एफआयए मानवी तस्करी रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि जी काही माहिती मिळते ती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली जात आहे."
 
सामानात भिकेचे भांडेही सापडले
एफआयएचे उपसंचालक ख्वाजा हमद-उल-रहमान यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सीनेटच्या स्थायी समितीमध्ये सचिवांनी खुलासा केल्यानंतर प्रवाशांचं प्रोफाइलिंग सुरू करण्यात आलं.
 
त्यांनी पुढे सांगितलं की, 'प्रोफाइलिंग मध्ये प्रवाशांसाठी आवश्यक नियम तपासले जातात, त्यांची प्रवासाची उद्दिष्ट, एखाद्या प्रवाशाला उमराहसाठी सौदी अरेबियाला जायचं असेल तर आर्थिक स्थिती तपासली जाते.
 
प्रोफाइलिंग प्रक्रियेदरम्यान, हॉटेल बुकिंग, परतीच्या प्रवासाची तिकिटं आणि प्रवाशांकडे असलेली रोकड देखील तपासली जाते. जेणेकरून प्रवाशाच्या प्रवास करण्याचा हेतू समजतो.
 
एका प्रश्नाच्या उत्तरात हमद-उल-रहमान म्हणाले की, काही वर्षांपूर्वीपर्यंत मानवी तस्करी रोखण्यासाठी युरोप आणि इतर देशांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांचे प्रोफाइलिंग केले जायचे. पण नंतर येणाऱ्या तक्रारींमुळे विमानतळांवर प्रोफाइलिंगची प्रक्रिया बंद करण्यात आली होती. सौदी अरेबियातील भिकाऱ्यांबाबत तक्रारी आल्यानंतर आता पुन्हा ही प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 
प्रोफाइलिंग सुरू केल्याने 29 सप्टेंबर 2023 रोजी सौदी अरेबियाला जाणाऱ्या 16 लोकांच्या गटाला मुलतान विमानतळावर पकडण्यात आलं.
 
नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी या सगळ्यांची चौकशी सुरू केली. ख्वाजा हमद-उल-रहमान यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात हे सर्व भिकारी असल्याचं समजलं.
 
त्यांच्याकडे हॉटेलचं बुकिंग नव्हतं, पैसे नव्हते आणि त्यांची आर्थिक स्थितीही उमराहला जाण्याइतपत चांगली नव्हती. त्यांच्या सामानाची झडती घेतली असता भीक मागण्याचे वाडगे सापडले.
 
मुलतान विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या लोकांची स्थिती काय आहे?
ख्वाजा हमाद-अल-रहमान यांनी सांगितलं की, "तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सौदी अरेबियातील नोरो नावाच्या एजंटकडून या भिकाऱ्यांची सोय केली जात होती."
 
एफआयएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, "करारानुसार दिवसाचा भत्ता मोजून अर्धा हिस्सा त्याच दिवशी एजंटला दिला जाणार होता."
 
मुलतान विमानतळावर अटक करण्यात आलेल्यांमध्ये लोधरण येथील शकील हा त्याच्या दोन पत्नींसह सौदी अरेबियाला जात होता.
 
मुलतानमधील स्थानिक न्यायालयाबाहेर बीबीसीशी बोलताना शकीलने सांगितलं की तो सायकलवरून चादरी विकतो.
 
त्याच्या म्हणण्यानुसार, उमराहसाठी सौदी अरेबियाला जाण्याची कल्पना त्याच्या मित्राने त्याला दिली.
 
तिघांचा सौदा 3 लाख रुपयांना झाला होता. व्हिसा आणि तिकीट इत्यादीसाठी मित्राने एजंटची ओळखही करून दिली होती.
 
लाहोर कॅंटमधील इस्माईल टाऊन भागातील चार महिलांना सुरुवातीला मुलतान विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून देण्यात आलं.
 
या महिलांमध्ये शकीला बीबी, त्यांची भाची आणि एक मुलगी होती.
 
शिवाय लाहोरमधील त्यांचे सात नातेवाईकही या गटात सामील होते. हे सात जण लाहोर लॉरी बेसवरून बसमध्ये चढले आणि 27 सप्टेंबरला मुलतानला पोहोचले.
 
बीबीसीने लाहोरमधील इस्माईल टाउनला भेट दिली. शकिला बीबी त्यांच्या पडक्या एक मजली घरात एका खाटेवर बसल्या होत्या. तिथे त्यांची भाची आणि मुलगी अशा दोघीही होत्या.
 
बीबीसीशी बोलताना शकिला बीबीने सांगितलं की, त्या भीक मागण्यासाठी नव्हे तर उमराहसाठी सौदी अरेबियाला निघाल्या होत्या.
 
शकिला बीबीच्या म्हणण्यानुसार, भीक मागण्याचा वाडगा त्यांच्या सामानामधून नव्हे तर इतर महिलांच्या वस्तूंमधून जप्त करण्यात आला होता.
 
शकिला बीबीच्या म्हणण्यानुसार, त्यांचे पती आणि तीन मुले बदामी बाग भाजी मंडईत विक्रेते म्हणून काम करतात आणि त्यांनी मोठ्या कष्टाने पैसे गोळा करून उमराहला जाण्याचा बेत आखला होता.
 
त्यांनी सांगितलं की, विमानतळावर त्यांना बोर्डिंग पास देण्यात आला होता आणि सामानही पाठवलं होतं. पण एफआयएने त्यांना अचानक थांबवलं.
 
"जेव्हा आम्ही इमिग्रेशनसाठी गेलो तेव्हा एफआयएने काही लोकांना थांबवलं नंतर आम्हाला थांबवलं."
 
त्यांना त्यांचे पती आणि मुलं उमराहसाठी सोबत का आले नाहीत अशी विचारणा करण्यात आली. यावर त्या म्हणाल्या की, त्यांचे पती आणि मुलांची इच्छा आहे की घरातल्या स्त्रियांना आधी उमराह करावा.
 
दुसरीकडे इस्माईल टाऊनच्या एका स्थानिक दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं की, या वस्तीत राहणारे स्त्री-पुरुष लाहोरच्या वेगवेगळ्या भागात जाऊन भीक मागतात.
 
टीप : लेखातील आरोपींची नावं बदलण्यात आली आहेत.