गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 29 एप्रिल 2019 (12:45 IST)

मुंबईतील झोपडीधारकांना हक्काचे घर देणार : राहुल

अवधी मुंबापुरी मतदानासाठी सज्ज झाली असताना, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मुंबईतील झोपडीधारक आणि भाडेकरूंना हक्काचे घर देण्याचे आश्वासन दिले आहे. केंद्रात काँग्रेस पक्षाचे सरकार आल्यावर झोपडपट्टीधारकांना व भाडेकरूंना हक्काचे घर मिळेल असा शब्द राहुल यांनी ट्विटरद्वारे दिला आहे.
 
1 मार्च या दिवशी मुंबईत झालेल्या पक्षाच्या सभेत मुंबईकरांना किमान 500 चौरस फुटांचे पक्के घर देण्याबाबतचा प्रस्ताव काँग्रेस नेत्यांनी मांडला होता. याचा उल्लेख राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या सभेत काँग्रेस नेत्यांनी मांडलेल्या हक्काच्या घराच्या प्रस्तावाला आपण पाठिंबा दिला असल्याचेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
मुंबईतील मतदार मोठ्या संख्येने झोपडपट्‌ट्यांमध्ये राहतो. त्याचप्रमाणे मुंबईतील भाडेकरूंची संख्याही लक्षणीय आहे. मुंबईवर अनेक दशके प्राबल्य मिळवणार्‍या काँग्रेस पक्षाचे हा मतदार जमेची बाजू होती. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हा मतदार टिकवता आला नव्हता. ही घोषणा करून राहुल यांनी हक्काच्या घराचे आश्वासन देत हा मतदार पुन्हा काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.