सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. निवडणूक
  3. लोकसभा निवडणूक
Written By
Last Modified: रविवार, 25 फेब्रुवारी 2024 (10:01 IST)

पुणे लोकसभा : यंदाही 'भाजप विरुद्ध काँग्रेस' सामना की मनसेही लढणार?

election
पुणे लोकसभा ही काँग्रेसची तशी परंपरागत जागा. मात्र जवळपास 10 वेळा खासदार निवडून आणणाऱ्या काँग्रेसची ही जागा मोदी लाटेत म्हणजेच 2014 साली भाजपकडे गेली.
 
कधीकाळी हा मतदारसंघ माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. पण मोदी लाटेत अनिल शिरोळे आणि त्यानंतर गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेवर विजय मिळवला. मुख्यत: काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच पुणे लोकसभेत लढत होते.
 
यावेळी देखील ही लढत चुरशीची होणार असं दिसतंय. भाजपकडून अनेक नावं समोर येत आहेत तसंच काँग्रेसकडून देखील अनेक इच्छुक तयारीला लागल्याचं दिसतंय. पण त्याआधी या मतदारसंघाचा थोडा इतिहास बघू.
 
काँग्रेसच्या वर्चस्वाला भाजपने 1991 साली पहिलं आव्हान
तर 1951 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नरहर गाडगीळ इथून खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतरच्या काळात इथून प्रजा सोशालिस्ट पार्टी, संयुक्त सोशालिस्ट पार्टी, भारतीय लोकदल अशा पक्षांचेही खासदार झाले.
 
या कालावधीमध्ये तब्बल 10 लोकसभा निवडणुकांत काँग्रेसचा खासदार या मतदारसंघावर निवडून आला आहे.
 
पण 1991 साली पहिल्यांदाच भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिलं. अण्णा जोशी हे भाजपचे पहिले खासदार निवडून आले.
 
कॉमनवेल्थ गेम्स घोटाळ्यामुळे चर्चेत आलेले सुरेश कलमाडी 1996 मध्ये पहिल्यांदाच या जागेवरून खासदार झाले.
 
2014 आणि 2019 च्या निवडणुकीचं गणित
2004 आणि 2009 मध्येही कलमाडी काँग्रेसच्या तिकिटावर येथून खासदार झाले.
 
कॉमनवेल्थ घोटाळ्यात नाव पुढे आल्यानं 2014 मध्ये कलमाडी यांचं तिकीट कापून काँग्रेसने विश्वजीत कदम यांना उमेदवारी दिली.
 
पण 2014 च्या मोदी लाटेत लोकसभेतच नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला सपाटून मार खावा लागला.
 
2014 मध्ये काँग्रेसच्या या परंपरागत जागेला सुरुंग लावत भाजपने या मतदारसंघातून अनिल शिरोळे यांना निवडून आणलं.
 
खरं तर सुरेश कलमाडी राजकारणापासून दूर गेल्यानंतर या मतदारसंघातील चित्रंच बदललं. याचा फायदा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी-चिंचवडमधून पुण्यात येत महापौरपद ताब्यात घेतलं.
 
पुढे जाऊन त्यांनी भाजपासोबत हात मिळवणी करत 'पुणे पॅटर्न' अस्तित्वात आणला. मात्र 2017 साली भाजपा पालिकेत सत्तेत आली.
आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे गिरीश बापट इथून खासदार झाले. त्यामुळे पुण्यावर भाजपाचा एकछत्री अंमल सुरू झाला. पण मतदारांचा बदलता कल देखील इथं लक्षात घ्यायला हवा. कारण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे दोन आमदार पडले होते.
 
अशातच गिरीश बापट यांच्या निधनानंतर भाजपकडून पुणे लोकसभेसाठी कोण चेहरा असणार हे निश्चित होत नाहीये.
 
भाजपकडून ही नावं चर्चेत
भाजपने यावेळी 'अब की बार 400 पार'ची घोषणा दिली आहे. 2014, 2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने 2024 मध्येही सत्तेवर येण्यासाठी कंबर कसली आहे. यावेळी पुण्यातून भाजप मध्ये इच्छुकांची गर्दी आहे.
 
यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार व माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर रांगेत आहेत. मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून भाजपने पुण्यातील उमेदवारीची चुरस थोडी कमी केली आहे.
 
मोहोळ यांना महापालिकेतील कामाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. मुळीक यांनी आमदार आणि त्यानंतर शहराध्यक्ष म्हणून काम करीत असताना लोकसभेचा उमेदवार म्हणून स्वत:ची प्रतिमा तयार केली आहे. तर देवधर हे मूळचे पुण्याचे असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक, राष्ट्रीय राजकारण आणि विविध राज्यातील संघटनात्मक कामाचा त्यांना तगडा अनुभव आहे.
 
पण लोकसभेसाठी ब्राह्मण उमेदवार द्यायचा की ब्राह्मणेतर, हा भाजप पुढचा तिढा सुटला नसल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय.
 
भाजपच्या उमेदवारावर ठरणार काँग्रेसचं गणित
पुणे लोकसभा मतदारसंघ हा कॉंग्रेस आणि भाजपा अशा दोन विचारधारांमध्ये विभागलेला मतदारसंघ आहे.
 
महाविकास आघाडी आणि महायुती अशी नवी समीकरणं उदयाला आल्याने त्याचाही परिणाम शहराच्या राजकारणावर झालेला दिसतोय.
 
भाजपचा उमेदवार कोण, यावर काँग्रेसचं गणित अवलंबून आहे.
 
काँग्रेसकडून माजी आमदार मोहन जोशी, कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर, प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक अभय छाजेड यांची नावं पुढं येत आहेत.
 
तसं पाहायला गेलं तर काँग्रेसकडे आतापर्यंत अनेक जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलेत.
कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांचं नाव देखील लोकसभेसाठी चर्चेत आहे. किंबहुना त्यांचे तसे बॅनर देखील पुण्यात लागायला सुरुवात झाली आहे.
 
आक्रमक कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे धंगेकर लोकसभेच्या रिंगणात उतरले तर या निवडणुकीत आणखीनच रंग भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
पुण्यात मनसेकडूनही तयारी
पुणे लोकसभा निवडणुकीसाठीची लढत तसं तर भाजप आणि काँग्रेस मध्येच आहे. मात्र पुण्यात मनसेकडूनही लोकसभेसाठी तयारी सुरू झाल्याचं चित्र आहे. मागील निवडणुकीमध्ये उमेदवारही न देताना तटस्थ राहिलेल्या मनसेने यावेळी पुण्याकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
 
मनसेने पुणे जिल्ह्याची जबाबदारी राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर सोपवली आहे. पुणे लोकसभेच्या जागेवरील प्रश्नावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरे म्हटलेत की, राज ठाकरे यांनी जबाबदारी दिल्यास यशस्वीपणे पार पाडणार आहे.
 
शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेवक वसंत मोरे यांची नावंही लोकसभा उमेदवारीसाठी चर्चेत आहेत.
 
मतदारसंघात कोणाचं वजन जास्त?
पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये वडगाव शेरी, पर्वती, कोथरूड, कसबा पेठ, शिवाजीनगर, पुणे छावणी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
 
यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार, भाजपचे चार आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघात भाजपचं वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे ही लढाई काँग्रेससाठी सोपी नाहीये.
 
Published By- Priya DIxit