सोमवार, 9 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 6 फेब्रुवारी 2020 (11:13 IST)

गीता जगतो तो खरा शास्त्रज्ञ : स्वामी लोकनाथ महाराज

जगामध्ये ऐक्याची, विश्वबंधुत्वाची भावना पसरविणे व जोपासणे फार महत्त्वाचे आहे. कलियुगात संघटित होऊन कार्य केले तर शक्तीप्रदर्शन होते तसेच विचारांची क्रांतीही घडू शकते. स्वार्थ हा मनुष्याचा शत्रू आहे. निस्वार्थपणे सेवा केल्यास ती भगवंतापर्यंत पाहोचते. गीता जगतो तो खरा शास्त्रज्ञ असे मौलिक विचार इस्कॉनचे जागतिक कीर्तीचे स्वामी लोकनाथ महाराज यांनी व्यक्त केले.
 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे लोकनाथ स्वामी महाराज यांचा आज (दि. 4 फेबु्रवारी) जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्या वेळी ते बोलत होते. स्मृतीचिन्ह, शाल, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, भाजपाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, ज्ञानश्री दादा महाराज नगरकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, गंगा गोयल फाउंडेशनच्या गीता गोयल, शिकागोचे एकलव्य प्रभूजी, इस्कॉन पुणेचे राधेशामजी यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनिय योगदानाबद्दल श्रीराम जोशी (सहसंपादक, पुढारी, दिल्ली), उमेश कुमावत (संपादक, टिव्ही 9), डॉ. बाळासाहेब बोठे (कार्यकारी संपादक, सकाळ, अहमदनगर), सचिन जवळकोटे (निवासी संपादक, लोकमत, सोलापूर), सुकृत खांडेकर (संपादक, नवशक्ती, मुंबई), संदीप सिसोदिया (संपादकीय प्रमुख, वेबदुनिया, इंदूर), संतीश बांदल (संपादक, क्रीडावेध, पुणे) तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल भवरलाल ओसवाल (कृष्णा नदी सेवाकार्य फाउंडेशन, वाई), बाळासाहेब करंजुले (पुणे), डॉ. आशुतोष गुप्ता (अध्यक्ष, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिकल, मुंबई), उज्ज्वला जगताप (दिलासा केअर सेंटर, नाशिक), संजय चव्हाण (विसावा मंडळ, सांगली), संदीप राऊत (श्रीराम फाउंडेशन, पुणे), तर युवा सामाजिक पुरस्काराने मनिष संचेती (इंदूमती बन्सीलाल संचेती ट्रस्ट) तसेच हेमंत जोशी व डॉ. शिबू नायर यांचा गौरव करण्यात आला.
 
सुनील देवधर म्हणाले, राजकारणासह सर्वच क्षेत्रात अध्यात्म आहे. अध्यात्माशिवाय मनुष्यप्राणी राहू शकत नाही. जनतेबरोबर जनार्दन शब्द येतो. जनतेची सेवा केली की जनार्दनाची सेवाही आपोआपच घडते. मानवताधर्म ही संतांनी दिलेली शिकवण आहे.
सकारात्मक विचारांची नेहमी जोपासना करा, असे आवाहन डॉ. डी. वाय. पाटील यांनी केले. दादा महाराज नगरकर यांनी तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकार व समाजसेवकांनीही मनोगत व्यक्त केले.
 
कार्यक्रमाची सुरुवात पाच नद्यांच्या जलएकत्रीकरणाने झाली. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. पुणे संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी निमंत्रितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली. मान्यवरांचे स्वागत संजय भोकरे, किरण जोशी, अजित घस्ते, हर्षद कटारिया, नितीन बिबवे यांनी केले. पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वसंत मुंडे यांचा सत्कार सुनील देवधर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती कुलकर्णी यांनी केले.