सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (10:16 IST)

मैत्रिणींसाठी खर्च करता यावा म्हणून दोघे अल्पवयीन चोरायचे गाड्या

असाही व्हॅलेंटाईन डे फिवर पहायला मिळत असून मैत्रिणींच्या खर्चासाठी अल्पवयीन मुलांकडून १३ दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे. अजून किती दुचाकी चोरी केल्या याचा तपास पोलीस करत आहेत.
 
सविस्तर वृत्त असे की, जुने नाशिक भागातून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या, मात्र पोलिसांना चोर पकडण्यासाठी काही यश मिळत नव्हते. मात्र दोघा अल्पवयीन चोरट्यांनी झाकीर हुसेन रुग्णालयाचे वाहनतळ येथून पार्किंग मध्ये  उभ्या असलेल्या दुचाकींमधून काही दुचाकी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हा काही नागरिकांना हे दिसले आणि या दोघांना रंगेहाथ पकडून पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, तत्काळ भद्रकाली पोलीसांचे पथक घटनास्थळी आले व दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले.
 
भद्रकाली पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली. या दोघांनी टाकसाळ लेनमधून करण संजय लोणारी यांच्या राहत्या घरासमोरून अ‍ॅक्टीवा एम.एच.१५ डीएन ०१५८ चोरी केल्याची कबुली दिली. तसेच पोलिसांनी अजून कडक शब्दात विचारले असता त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे.हे दोघे अल्पवयीन चोरटे तेरा दुचाकी विविध ठिकाणांवरून चोरत होते.
 
मैत्रिणींवर खर्च करण्यासाठी पैसे नसल्यामुळे दुचाकी चोरी शहर व परिसरात सुरू केल्याची धक्कादायक माहिती या गुन्ह्याच्या तपासातून समोर आली आहे. पाच गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून उर्वरित दुचाकी कोठून व कधी चोरी केल्या त्याचा तपास पोलीस करत आहेत.