सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक २०२४
  3. लोकसभा निवडणूक २०२४ बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 1 एप्रिल 2024 (10:47 IST)

नंदुरबारमध्ये डॉक्टर वि. वकील लढाईत भाजपची हॅटट्रिक होणार की पुन्हा काँग्रेसला 'अच्छे दिन' येणार?

BJP CONGRESS
काँग्रेसचा एकछत्री अंमल असलेला पण मोदी लाटेत भाजपच्या ताब्यात गेलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे नंदुरबार मतदारसंघ. 60 वर्ष काँग्रेसचं वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे.हातून निसटलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसनं याठिकाणाहून भाजपच्या हिना गावित यांच्या विरोधात के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं आहे.

आदिवासी बहुल असलेल्या या मतदारसंघामध्ये दोन उच्चशिक्षित उमेदवारांमध्ये याठिकाणी लढत रंगणार आहे. डॉक्टर विरुद्ध वकील अशा या लढतीवर यंदा सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.
नंदुरबार हा राज्यातील पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या दृष्टिनं हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ असून गांधी कुटुंबाचं विशेष प्रेम या मतदारसंघावर असल्याचं पाहायला मिळालं आहे.
त्यामुळं पुन्हा मतदारसंघावर असलेलं काँग्रेसचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी पक्षानं चांगलीच कंबर कसली आहे. मविआ आणि महायुतीतील अंतर्गत धुसफूसही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.
 
गांधी कुटुंबाचं खास नातं
नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर दीर्घकाळ काँग्रेसचा झेंडा फडकल्याचं पाहायला मिळालं त्याचं एक खास कारण आहे. ते म्हणजे गांधी कुटुंबाचं या मतदारसंघाबरोबर असलेलं खास नातं.
देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी या त्यांच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात नंदुरबार मतदारसंघातूनच करायच्या असं सांगितलं जातं.
 
इंदिरा गांधी यांच्या निधनानंतर पंतप्रधान बनलेले राजीव गांधी यांनीही ती परंपरा कायम ठेवली होती. राजीव गांधीदेखील त्यांच्या प्रचाराची सुरुवात या मतदारसंघातून करायचे.
प्रचंड चर्चा झालेल्या आणि आज अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज बनलेल्या आधार योजनेचा शुभारंभदेखील काँग्रेसनं याच मतदारसंघातून केला होता. त्यामुळं या मतदारसंघावर काँग्रेसचं आणि काँग्रेसवर मतदारांचं प्रेम पाहायला मिळालं.
त्यामुळंच 1952 पासून ते 2014 पर्यंत म्हणजे सुमारे सहा दशकांपेक्षाही जास्त काळ या मतदारसंघावर काँग्रेसचंच वर्चस्व पाहायला मिळालं आहे.
 
डॉक्टर विरुद्ध वकील
भाजपनं नंदुरबारमधून सलग दोन टर्म आमदार राहिलेल्या डॉक्टर हिना गावित यांचीच उमेदवारी कायम ठेवली आहे, तर काँग्रेसनं त्यांच्या विरोधात अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांना मैदानात उतरवलं आहे.
त्यामुळं यावेळी नंदुरबार मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा डॉक्टर विरुद्ध वकील अशी लढत पाहायला मिळणार आहे. गेल्यावेळी के.सी.पाडवी आणि हिना गावित यांच्यात अशी लढत रंगलेली पाहायला मिळाली होती.
 
एमबीबीएस आणि एमडीचं शिक्षण पूर्ण केलेल्या डॉ. हिना गावित यांनी पुणे आणि मुंबईमधून त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर मतदारसंघामध्ये वैद्यकीय शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यही केलं. विशेष म्हणजे, खासदार बनल्यानंतर हिना गावित यांनी वकिलीचं शिक्षणही घेतलं आहे.
तर त्यांचे विरोधी उमेदवार गोवाल पाडवी यांनीही त्यांचं वकिलीचं शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते सध्या वकिली करत आहेत.
दोन्ही उमेदवारांचा विचार करता वडील डॉ. विजय गावित यांनी हिना गावित यांना सक्रीय राजकारणात उतरण्यासाठी मार्गदर्शन केलं. तर गोवाल पाडवी यांनाही के.सी. पाडवी यांनीच राजकारणात उतरवल्याचं पाहायला मिळालं आहे.
त्यामुळं हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी यांच्यातील ही लढत पडद्यामागे डॉ. विजय कुमार गावित विरुद्ध के.सी. पाडवी यांच्यात असल्याचं चित्र सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
 
तर त्यांचे विरोधी उमेदवार गोवाल पाडवी यांनीही त्यांचं वकिलीचं शिक्षण मुंबईमधून पूर्ण केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयात ते सध्या वकिली करत आहेत.
दोन्ही उमेदवारांचा विचार करता वडील डॉ. विजय गावित यांनी हिना गावित यांना सक्रीय राजकारणात उतरण्यासाठी मार्गदर्शन केलं. तर गोवाल पाडवी यांनाही के.सी. पाडवी यांनीच राजकारणात उतरवल्याचं पाहायला मिळालं आहे.
त्यामुळं हिना गावित विरुद्ध गोवाल पाडवी यांच्यातील ही लढत पडद्यामागे डॉ.विजय कुमार गावित विरुद्ध के.सी. पाडवी यांच्यात असल्याचं चित्र सध्या तरी मतदारसंघात पाहायला मिळत आहे.
 
मतदारसंघाचा इतिहास
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासाचा विचार करता प्रामुख्यानं काँग्रेसचं वलय या मतदारसंघात राहिल्याचं सुरुवातीपासून पाहायला मिळालं आहे.
जयंतराव नटवडकर यांच्यानंतर लक्ष्मण वळवी, तुकाराम गावित, सुरुपसिंग नाईक या खासदारांनी सलग दोन टर्म इथं खासदारकी केली. त्यानंतर मात्र या मतदारसंघावर माणिकराव गावित यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं.
1981 मध्ये पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तब्बल 34 वर्ष आणि आठ टर्म सलग खासदार राहण्याचा विक्रम माणिकराव गावित यांच्या नावावर नोंदवला गेल्याचं पाहायला मिळालं. अगदी साधा नेता अशी माणिकराव गावितांची मतदारसंघामध्ये ओळख होती.
पण 2014 च्या मोदी लाटेमध्ये काँग्रेसच्या या गडाला सुरुंग लावण्याचं काम केलं भाजपच्या उमेदवार डॉ. हिना गावित यांनी. त्यांनी माणिकराव गावित यांना पराभूत करत इथं भाजपला विजय मिळवून दिला.
 
गेल्या निवडणुकीत काय घडले?
डॉ. हिना गावित यांनी 2014 मध्ये माणिकराव गावितांचा पराभव करून खासदारकी मिळवली होती. त्यानंतर 2019 मध्येही भाजपनं हिना गावित यांनाच उमेदवार म्हणून नंदुरबारमधून मैदानात उतरवलं होतं.
 
त्यामुळं काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याचीच सगळीकडं चर्चा असताना काँग्रेसनं त्यांचे अनुभवी नेते के.सी.पाडवी यांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं. काँग्रेसचे निष्ठावंत म्हणून त्यांना ओळखलं जात होतं.
 
पाडवी यांनी हिना गावित यांना निडणुकीत चांगलीच टक्कर दिली होती. पण तरीही काँग्रेसनं गमावलेला हा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यात के.सी. पाडवी यांना यश आलं नाही.
 
डॉ. हिना गावित यांनी जवळपास एक लाख मतांच्या फरकानं के.सी. पाडवी यांचा पराभव केला होता.
विधानसभा मतदारसंघात भाजपचं वर्चस्व
नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री, शिरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी अक्कलकुवा तसंच नवापूरमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत. तर उर्वरित चार मतदारसंघात भाजप किंवा महायुतीचे आमदार आहेत.
 
डॉ. हिना गावित यांच्या विरोधात गेल्या काही वर्षांमध्ये मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांची नाराजी वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. नंदुरबार डेव्हलपमेंट फोरम या माध्यमातून सर्वपक्षीय नेते त्यांच्या विरोधात मैदानात उतरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती.
 
भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांची नाराजीही काही वेळा समोर आली होती. आता हिना गावित यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, या नाराजीचा त्यांना खरंच फटका बसणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळं विरोधक एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे. पण ते निवडणुकीत ही एकी दाखवणार का यावरच भविष्यातलं चित्र अवलंबून असेल.
 
 
आदिवासींचे प्रश्न कधी सुटणार?
नंदुरबार आदिवासीबहुल मतदारसंघ असल्यानं याठिकाणच्या आदिवासींच्या समस्या हाच कायम महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. सगळ्याच पक्षांनी आजवर आदिवासांनी अनेक आश्वासनं दिलं. पण ती पूर्ण झालेली मात्र अभावानंच पाहायला मिळालं.
सामान्य आदिवासींचा विचार करता, कोणत्याही पक्षाकडून त्यांना अपेक्षित असलेला विकास किंवा मदत झाली नसल्याच्या प्रतिक्रिया कायम समोर येत असतात.
विस्थापितांचा प्रश्न, कुपोषणासारखा गंभीर मुद्दा, बेरोजगारी, त्यामुळं होणारं स्थलांतर, पायाभूत सुविधांचा असे एक ना अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये उभे ठाकलेले आहेत. त्यामुळं या प्रश्नांची गांभीर्यानं दखल घेतली जावी अशी मतदारांची इच्छा आहे.
या लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावित पुन्हा एकदा विजय मिळवून हॅटट्रिक साधत हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला बनल्याचं सिद्ध करणार की गोवाल पाडवी हे वडिलांच्या पराभवाचा वचपा काढून काँग्रेसला गतवैभव मिळवून देणार हे मात्र 4 जूनलाच स्पष्ट होणार आहे.
 
Published By- Priya Dixit