अँटी ब्लॅक मनी डे 8 नोव्हेंबरला साजरा करणार - अरुण जेटली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गतवर्षी केलेल्या नोटाबंदीच्या घोषणेला येत्या 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपा आणि विरोधी पक्ष नोटाबंदीवरून पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची चिन्हे आहेत. एकीकडे विरोधकांकडून हा दिवस ब्लँक डे म्हणून पाळण्याची तयारी होत असतानाच 8 नोव्हेंबरला अँटी ब्लॅक मनी डे साजरा करण्याची घोषणा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केली आहे.
आज दिल्लीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना अरुण जेटली म्हणाले, 8 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशभरात काळापैसा विरोधी दिवस साजरा करेल. त्या दिवशी नोटाबंदीच्या यशस्वीतेनिमित्त जल्लोष केला जाईल. तसेच पक्षाचे सर्व नेते या दिवशी देशभऱात विविध कार्यक्रमांचे आयोजन करतील.” त्याबरोबरच एसआयटीने केलेल्या शिफारशींनुसारच काळ्यापैशावर कारवाई करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. सत्तेत असताना काळ्यापैशावर कारवाई करण्याची संधी काँग्रेसकडे होती. पण त्यांनी काहीच केले नाही असा टोलाही जेटली यांनी लगावला.