काँग्रेसकडून पेट्रोल, डिझेल दर वाढीचा निषेध, सोमवारी राज्यभरात आंदोलन
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत असल्याने काँग्रेसने निषेध व्यक्त केला असून सोमवारी राज्यभरात आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ही माहिती दिली. अर्थव्यवस्थेला बळ देण्याऐवजी केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत, या संदर्भात सोमवारी राज्यभर आंदोलन करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, “काँग्रेस २९ तारखेला पेट्रोल आणि डिझेलची जी भाववाढ चालली आहे त्याविरोधात एक तासाचं आंदोलन करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबत केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींना निवेदन पाठवण्यात येणार आहे. इंधनाचे दर वाढत असल्याने अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसत आहे”.