खुशखबर : एसबीआयने गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त केले
भारतीय स्टेट बँकेने ग्राहकांना मोठी भेट देत गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज आणि वाहन कर्ज स्वस्त केले आहे. एसबीआयने कर्जावरील एमसीएलआर दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. बँकेचा हा निर्णय १० ऑक्टोबरपासून लागू होत आहे. बँकेने केलेली चालू आर्थिक वर्षातील ही सहावी कपात आहे. बँकेने एमसीएलआरचे दर ०.१० टक्क्यांनी घटवले आहेत. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) गेल्याच आठवड्यात रेपो दरात कपात केली.
सण आणि उत्सव काळात आपल्या ग्राहकांना फायदा मिळावा यासाठी एसबीआयने एमसीएलआरचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला. याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दरात ०.१० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आता पुढील आर्थिक वर्षापर्यंत हे दर ८.१५ टक्क्यांवरून ८.०५ टक्क्यांवर येऊन स्थिरावले आहेत.