मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 20 नोव्हेंबर 2023 (07:23 IST)

सुब्रत रॉय यांच्यानंतर 'सहारा ग्रुप'चं पुढे काय होणार?

एक काळ होता जेव्हा सहारा समुहाकडे लंडनपासून न्यूयॉर्कपर्यंत अनेक ठिकाणी हॉटेल्स होते. त्यांची स्वतःची एअरलाईन होती, तसंच आयपीएलपासून ते फॉर्म्युला वनसारख्या टीमही होत्या. एवढंच नव्हे तर सहारा समूह भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजकही होता.
 
कंपनीचा विस्तार रियल इस्टेटपासून, आर्थिक सेवा, पायाभूत सुविधा निर्मिती, म्युच्युअल फंडपासून ते अगदी विमा क्षेत्रापर्यंत झालेला होता.
 
या कंपनीची अॅम्बी व्हॅली टाऊनशिप होती, लखनऊसह अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनींची मालकी होती.
 
देशभरातील हजारो कर्मचारी या कंपनीत काम करायचे. कंपनीचं स्वतःचं मीडिया साम्राज्यही होतं.
 
सुरुवातीच्या काळात स्कुटर चालवणारे 'सहाराश्री' सुब्रत रॉय सहारा यांच्या पार्ट्यांमध्ये राजकारणापासून ते क्रिकेट आणि बॉलिवूडपर्यंत अनेक क्षेत्रांतील बड्या हस्तींचा समावेश असायचा. रॉय हे कायम वृत्तपत्रांमध्ये झळकत असायचे.
 
एका रिपोर्टनुसार 2004 मध्ये त्यांच्या दोन मुलांच्या लग्नात 500 कोटींपेक्षा अधिक खर्च झाला होता. त्या सोहळ्यात 11 हजाराहून अधिक पाहुणे सहभागी झाले होते. चार दिवस चाललेल्या सोहळ्यासाठी पाहुण्यांना खासगी जेट्सनं आणण्यात आलं होतं.
 
पण 14 नोव्हेंबरला सुब्रत रॉय यांच्या मृत्यूची बातमी आली तेव्हा कंपनीची स्थिती आता पूर्वीपेक्षा फार वेगळी आहे. सहारा ग्रुपनं त्यांच्या अनेक मालमत्ता विकल्या आहेत. आधीसारखं ग्लॅमर आता त्यांच्या आसपासही दिसत नाही.
 
तज्ज्ञांच्या मते, कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. सुब्रत रॉय यांच्यानंतर कंपनीची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर असेल हे अद्याप स्पष्ट नाही. त्यांची दोन्ही मुलं भारतात नसल्याचं सांगितलं जात आहे, पण आम्ही या वृत्ताची पुष्टी केलेली नाही.
 
सुब्रत रॉय यांना ओळखणाऱ्यांचे त्यांच्याबाबत खूप वेगवेगळे विचार आहेत. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तीनं त्यांना 'डायनामिक, सेल्फ-मेड मॅन' आणि 'जादूई' व्यक्ती म्हटलं होतं. 'त्यांना जो भेटेल तो त्यांच्या प्रेमात पडायचा,' असंही ते सांगतात.
 
सुब्रत रॉय यांची कारकीर्द दीर्घकाळ पाहिलेले ज्येष्ठ शोध पत्रकार शरत प्रधान त्यांना 'फायनांशियल जगलर' किंवा 'आर्थिक बाजीगर' म्हणतात. कारण त्यांनी गरिबांना स्वप्नं विकली.
 
शरत प्रधान यांच्या मते, "सहाराचा बहुतांश व्यवसाय पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारच्या गरीब भागांमध्ये होता. त्याठिकाणी गरीब लोक आशेवरच जीवंत असतात. कारण त्यांची परिस्थिती कधीच सुधारत नसते."
 
सहारावर 'द अनटोल्ड स्टोरी' पुस्तक लिहिणारे लेखक आणि पत्रकार तमल बंदोपाध्याय यांच्या मते, यशाच्या शिखरावर असताना सहाराची 4,799 कार्यालयं आणि 16 वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस होते. पण नव्या वातावरणात समूह टिकणं अत्यंत कठीण आहे.
 
तज्ज्ञांच्या मते, तुरुंगातून सुटल्यानंतर सुब्रत रॉय माध्यमांपासून थोडं दूर राहत होते.
 
कंपनीच्या भवितव्याबाबत आमचं कोणत्याही अधिकाऱ्याशी बोलणं झालं नाही. सुब्रत रॉय यांच्या एका अत्यंत निकटवर्तीय व्यक्तीनं त्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नसल्याचं सांगितलं.
 
सुब्रत रॉय यांची यशोगाथा
सुब्रत रॉय यांची कहाणी ही अनेक अर्थांनी गूढ आहे. कारण एखादी व्यक्ती काही वर्षामध्येच एवढी मोठी कंपनी आणि एवढ्या संपत्तीचा मालक कसा बनला? तसंच सत्ता, राजकारण, बिझनेस, मीडिया आणि ग्लॅमर जगतात हे नाव एवढं मोठं कसं झालं? हे प्रश्न त्यांच्या जीवनातून समोर आल्याशिवाय राहत नाहीत.
 
लेखक तमल बंदोपाध्याय यांच्या मते, सहारानं वेगानं यश मिळवायला सुरुवात केली तेव्हाच, त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला? हा इतर कोणाचा पैसा तर नाही? असे प्रश्न उपस्थित व्हायला सुरुवात झाली होती.
 
पण सुब्रत रॉय यांनी प्रत्येतवेळी आरोप फेटाळत चुकीचं काहीही करत नसल्याचं म्हटलं.
 
यश अगदी शिखरावर पोहोचल्यानंतर एक वेळ अशीही आली होती जेव्हा बाजार नियामक आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं सुब्रत रॉय यांना तुरुंगवारीही करावी लागली होती.
साठच्या दशकापासून सुब्रत रॉय यांचे मित्र असलेले अजय चॅटर्जी म्हणाले की, "सुब्रत रॉय यांचा जन्म बिहारच्या अररियामध्ये झाला. नंतर त्यांचं कुटुंब गोरखपूरला आलं. त्यांनी गोरखपूर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण पूर्ण केलं. सुब्रत रॉय यांनी पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा पूर्ण केला. त्यांचे वडील एका साखर कारखान्यात केमिकल इंजिनीअर होते.
 
अजय चॅटर्जी यांच्या मते, सुब्रत अत्यंत 'मनमिळावू' व्यक्ती होते, 'असं व्यक्तिमत्त्वं असलेला व्यक्ती मिळणं कठिण आहे.'
 
त्यांच्या मते, आर्थिक क्षेत्रात शिरण्यापूर्वी सुब्रत रॉय लहान-सहान व्यवसाय करायचे. त्यात नमकीनचा कारखाना, त्याची पॅकिंग आणि विक्री याचा समावेश होता.
 
सहाराच्या सुरुवातीबाबत सांगताना अजय चॅटर्जी म्हणाले की, सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये बनारस चिट फंड कंपनीचे डायरेक्टर गोरखपूरला आले होते. त्यावेळी त्यांची भेट झाली. अजय चॅटर्जी मासिक 15 रुपये भरुन कंपनीचे मेंबर बनले. त्यांनी सुब्रत रॉय यांनाही त्या कंपनीचं सदस्य बनवलं.
 
अजय चॅटर्जी यांच्या मते, काही महिन्यांनी सुब्रत रॉय यांच्या सांगण्यावरून त्यांची भेट कंपनीचे प्रमुख (खुराणा साहेब) यांच्याशी घालून दिली. पण काही काळानंतर ही कंपनी सुब्रत रॉय यांच्या ताब्यात देण्यात आली. पण हे नेमकं कसं आणि का घडलं, हे मात्र सांगू शकत नसल्याचं अजय चॅटर्जी म्हणतात.
 
सुब्रत रॉय यांच्या गप्पांनी अनेक लोक आकर्षित व्हायचे. अशाप्रकारे 1978 मध्ये सहाराची सुरुवात झाल्याचं, ते सांगतात.
 
सहाराचा विस्तार
देशातील गरीब आणि मागासलेल्या भागात लोकांकडं बँका, पोस्ट ऑफिसमध्ये डिपॉझिटसारख्या सुविधा नसलेल्या काळात सहाराचा विस्तार झाला.
 
त्यावेळी पक्क्या नोकऱ्या नसलेल्या या लोकांकडून रोज 10-20 रुपये घेऊन काही महिन्यांनी चांगल्या व्याजासह त्यांना पैसे परत करणं हा एक चांगला मार्ग होता, त्यातून कंपनीचा विस्तार वेगानं झाला.
 
यापैकी अनेक लोकांकडं पक्की घरं नव्हती, पण त्यांना चांगल्या भवितव्याची आशा होती. त्याच आधारे ते त्यांच्या घाम गाळून कमावलेल्या पैशातील एक भाग सहाराला देत होते.
 
त्यांच्यासाठी भविष्यातील लग्न, शिक्षण आणि इतर गरजांसाठी पैसा जमा करण्याचा हा चांगला मार्ग होता.
 
तज्ज्ञांच्या मते, 80 च्या दशकात याच आशेनं लाखो गरीब आणि वंचित लोक सहाराशी जोडले गेले. कंपनीवरील विश्वास त्यांच्या विस्ताराचं एक मुख्य कारण होतं.
 
ज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान यांच्या मते, याच दशकात सुब्रत रॉय हे वीर बहादूर सिंह आणि मुलायम सिंह यादव अशा नेत्यांच्याही जवळ आले.
 
लेखक तमल बंदोपाध्याय यांच्या मते, क्रिकेटपटू आणि बॉलिवुड स्टार्स यांच्याशी जवळीकतेमुळं सहाराच्या गुंतवणूकदारांमध्ये कंपनीप्रती विश्वास वाढला आणि कंपनीचा वेगानं विस्तार झाला. त्याचा थेट फायदा झाला सुब्रत रॉय यांना.
 
सुब्रत रॉय यांना सरकारी नियमांवर फार विश्वास नव्हता आणि त्यांची कंपनी वेगानं पुढं जात होती, असं तमल सांगतात.
 
पण तज्ज्ञांच्या मते, पैसे येणं आणि पैसे जाणं या संपूर्ण चक्रामध्ये संतुलन किती काळ टिकून राहणार, हा प्रश्न अशा प्रकरणांमध्ये कायम निर्माण होतच असतो.
 





























Published By- Priya Dixit