रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जुलै 2023 (15:55 IST)

'पाहिजे जातीचे' म्हणत मराठी चित्रपटसृष्टीत प्रतिभावान संगीतकार अन्वेषाचे पदार्पण

अन्वेषा ही अशी एक कलाकार आहे जिच्या आवाज आणि संगीताने देशोदेशीच्या सीमा ओलांडल्या आहेत, सूरमयी मैफिलींनी जगभरातील प्रेक्षकांना अन्वेषाने मंत्रमुग्ध केले आहे. गेल्या दोन दशकांत अन्वेषाने विविध संगीत बँडसह, एकल मैफिली आणि थीम-आधारित संगीत कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. अनोख्या सुरावटींमुळे अन्वेषा आंतरराष्ट्रीय स्टार असून तिने यूएसए, यूके, फ्रान्स, सिंगापूर, जपान, थायलंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, केनिया, दुबई, ओमान, चीन, कॅनडा, कतार आणि स्वित्झर्लंड इत्यादी देशांमध्ये आपली कला सादर केलेली आहे.
 
प्रतिभासंपन्न अन्वेषाने केवळ गायिकाच म्हणून नव्हे तर प्रतिभावान संगीतकार म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण केली आहे. 'पहिजे जातीचे' या चित्रपटाद्वारे अन्वेषा मराठी चित्रपटसृष्टीत संगीतकार म्हणून पदार्पण करीत आहे. प्रसिद्ध गायक अभय जोधपूरकर आणि हृषिकेश रानडे हे एकत्रितरित्या या चित्रपटाची निर्मिती करीत असून या चित्रपटात प्रेक्षकांना मधुर सुरावटीची मेजवानी मिळणार आहे.
 
पाहिजे जातीचे या चित्रपटातील अनुभवाविषयी बोलताना अन्वेषाने सांगितले की, या चित्रपटाची गाणी आणि पार्श्वसंगीत तयार करताना मला खूप चांगला वेळ मिळाला. विजय तेंडुलकर यांच्या चर्चित नाटकावर आधारित प्रकल्पावर काम करणे हा माझ्यासाठी बहुमान आहे. या चित्रपटाच्या अल्बममध्ये वेगवेगळ्या मूडमधील चार गाणी आहेत, या गाण्यांमध्ये मी ऑर्केस्ट्रल ट्रॅक, सेमी-क्लासिरल, रॉक आणि मराठी लोकसंगीत अशा घटकांचा समावेश केलेला आहे. जलालुद्दीन रुमी आणि संत कबीर यांचे समाजप्रबोधनाचे विचार दोन गाण्यांमध्ये आहेत. उमा कुलकर्णी यांनी या गाण्यांना आपल्या मधुर आवाजाने एक वेगळी उंची प्रदान केलेली आहे. प्रेक्षकांना ही चारही गाणी प्रचंड आवडतील यात शंका नाही.
 
मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाची देणगी असलेल्या अन्वेषाचे संगीत उद्योगातील योगदान फार मोठे आहे. अन्वेषाला फिल्मफेअर अवॉर्ड्स (पूर्व), मिर्ची म्युझिक अवॉर्ड्स (बांगला आणि दक्षिणेतील  तामिळ भाषा), टेली सिने अवॉर्ड, टेली सन्मान अवॉर्ड, बिग म्युझिक अवॉर्ड, वुमन एंटरटेनर्स अवॉर्ड, स्टार परिवार अवॉर्ड, चित्रपट पदार्पण पुरस्कार (मराठी नॉन फिल्म), गुजरात स्टेट अॅवॉर्ड (सर्वोत्कृष्ट गुजराती प्लेबॅक) अॅकेडेमिया अॅवॉर्ड इन लॉस एंजिलिस (स्वतंत्र गाणे) आणि GIFA (गुजरात आयकॉनिक फिल्म अवॉर्ड) उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रदान करण्यात आलेले आहेत. 
 
अन्वेषाने आतापर्यंत ए.आर. रहमान, अजय-अतुल, इस्माईल दरबार, हिमेश रेशमिया, प्रीतम, शंकर एहसान लॉय आणि इतर अनेक प्रथितयश संगीतकारांसोबत काम केलेले आहे. अन्वेषाने विविध भाषांमधील 550 हून अधिक चित्रपट आणि गैर-फिल्मी गाण्यांना आवाज दिलेला आहे. अविनाश विश्वजित आणि हर्षित अभिराज या मराठीतील दिग्गजांसोबतही अन्वेषाने काम केले असून दक्षिणेतील प्रख्यात संगीतकार विद्या सागर यांच्यासोबत काम करण्याचा बहुमान अन्वेषाला मिळालेला आहे.
 
अन्य संगीतकारांसाठी आवाज देत असतानाच स्वतःचा गायक आणि संगीतकार म्हणूनही तिचा प्रवास अत्यंत जोमाने सुरु आहे. सुनिधी चौहान, जावेद अली, अभय जोधपूरकर, रुपंकर बागची आणि इतर अनेक नामवंत गायकांनी अन्वेषाच्या सुरावटींनी नटलेल्या गीतांना आपल्या मधुर संगीताने अजरामर केलेले आहे.
 
हृषिकेश रानडे भारतातील ख्यातनाम पार्श्वगायक असून तो भावपूर्ण आवाज आणि मधुर सादरीकरणासाठी ओळखला जातो, आता संगीत उद्योगात एक नवीन झेप घेत आहे. ४ ऑगस्ट २०२३  रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'पाहिजे जातीचे' या मराठी चित्रपटाचे संगीतकार म्हणून तो अन्वेषासोबत समोर येत आहे.
 
हृषिकेश रानडे गेल्या दोन दशकांहून अधिक काळ संगीतक्षेत्रात कार्यरत असून संगीतप्रेमींना आपल्या आवाजाने मोहित केलेले आहे. हृषिकेशने आतापर्यंत 35 हून अधिक मराठी चित्रपट आणि दोन हिंदी चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलेले आहे. हृषिकेशने भारतीय, मराठी आणि हिंदी संगीत उद्योगावर आपली अमिट छाप सोडलेली आहें.
 
अभय जोधपूरकर, एक प्रतिष्ठित आणि प्रतिभाशाली पार्श्वगायक असून मधुर आवाजासाठी तो ओळखला जातो. मध्य प्रदेशातील इंदूरमधील अभयने करिअरची सुरुवात प्रख्यात ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमानसोबत प्रख्यात दिग्दर्शक मणिरत्नमच्या ‘कादल’ चित्रपटातून केली होती. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘मुंगिल थोट्टम’ हे गाणे गाऊन अभय जोधपूरकरने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. केएम म्युझिक कॉन्झर्व्हेटरीमध्ये असताना अभयने एक कव्वाली गायली होती आणि ती कव्वाली ए. आर. रहमानने ऐकून त्याला चित्रपटात गाण्याची संधी दिली. अभयने  झिरो, पानिपत, मीनाक्षी सुंदरेश्वर आणि अन्य अनेक सुपरहिट चित्रपटासाठी गाणी गायलेली आहेत.
 
अन्वेषाला संगीताची लहानपणापासूनच आवड होती. तिने वयाच्या चौथ्या वर्षी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे औपचारिक प्रशिक्षण सुरू केले. ‘व्हॉईस ऑफ इंडिया’ आणि ‘म्युझिक का महामुकाबला’ या रियालिटी शोमुळे तिच्या प्रतिभेची जगाला ओळख झाली. अन्वेषाने तेव्हापासूनच आपल्या मधुर आवाजाने प्रेक्षकांना भुरळ घातलेली आहे.
 
संगीताच्या दुनियेत अन्वेषा नेहमी वेगवेगळे प्रयोग करीत असते. अन्वेशाच्या रचना आणि भावपूर्ण सादरीकरण जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करीत असतात. आता अन्वेषा ‘पाहिजे जातीचे’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून संगीतकार म्हणून प्रेक्षकांसमोर येत आहे. तिच्या कारकिर्दीतील हा एक नवा अध्याय असून यातही ती यशस्वी होईल यात शंका नाही.