'के दिल अभी भरा नही' चा द्वि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्रयोग संपन्न
मंगेश कदम दिग्दर्शित, नाटक मंडळी निर्मित आणि शेखर ढवळीकर लिखित 'के दिल अभी भरा नाही' या नाटकाचा द्वि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्रयोग नुकताच बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात संपन्न झाला. सुप्रिया आणि सचिन पिळगावकर, जलपा आणि सचिन खेडेकर, रोहिणी हट्टंगडी, सुहिता थत्ते, लेखिका रोहिणी निनावे, एन चंद्रा, आदी मान्यवरांनी प्रयोगाला आवर्जून हजेरी लावली. उतार वयातील जोडप्यांची भावनिक कथा विनोदी अंगाने 'के दिल अभी भरा नही' या नाटकात मांडण्यात आली आहे. जवळच्या सगळ्या लोकांसाठी आयुष्य जगून झाल्यानंतर, सगळ्या जबाबदाऱ्या यथायोग्य पार पडल्यानंतर उरलेले आयुष्य एकमेकांसोबत राहूनही स्वतःसाठी जगणाऱ्या अनेक जोडप्याची हि सत्य कथा अगदी हुबेहूब या नाटकात दाखवण्यात आली आहे. नाटकाच्या द्वि शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी प्रयोगानंतर मान्यवरांनी नाटकाबद्दल त्यांचे मत व्यक्त करत नाटक आणि कलाकारांवर स्तुतीसुमने उधळली.
रोहिणी हट्टंगडी यांनी सांगितले की, " मंगेश आणि लीना हे नाटक सादर करताना नाटक जगतात. त्यामुळे एक वेगळीच ऊर्जा एक वेगळीच मजा यातून नाटकात येते. आणि त्याच मुळे हे नाटक प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीरीत्या पोहचते."
सचिन पिळगांकर यांनी यावेळी सांगितले की, "हे नाटक बघण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. नाटक पाहिल्यावर वाटते की 'के दिल अभी भरा नाही' म्हणून मी नक्कीच पुढच्या प्रयोगाला सुद्धा जाणार आहे. या वयात असणाऱ्या सर्व जोडप्यांच्या आयुष्याचा 'हे' नाटक म्हणजे एक आरसाच आहे."
सचिन खेडेकरांनी कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करत, "प्रत्येक कलाकारांच्या वाट्याला अशी एक संहिता यावी लागते, जी त्या नटाला अजून परिपक्व करते. 'हे' नाटक म्हणजे लीना आणि मंगेश ला अजून जास्त परिपक्व करणारे नाटक आहे." असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रेक्षकांनी देखील नाटकाला भरभरून दाद देत नाटक आणि कलाकारांना शुभेच्छा दिल्या, आणि लवकरच 'हे' नाटक ५०० प्रयोग पूर्ण करेल असा विश्वास व्यक्त केला.
या नाटकाचा गाभा तोच ठेवत नाटकाच्या सादरीकरणात काही बदल करण्यात आले आहेत. प्रेक्षकांचे हे नाटक बघताना शंभर टक्के मनोरंजन होणार असल्याची खात्री नाटकाच्या संपूर्ण टीमकडून देण्यात आली आहे. लीना भागवत आणि मंगेश कदम यांच्या सहज, सुंदर अभिनयाने या नाटकाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहेत. याव्यतिरिक्त या नाटकात चंद्रशेखर कुलकर्णी, बागेश्री जोशीराव यांनीही दमदार अभिनय केला आहे.