शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 16 मार्च 2022 (11:59 IST)

IND W vs ENG W: सलग तीन पराभवानंतर इंग्लंडचा भारतावर 4 गडी राखून विजय

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 15व्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 4 गडी राखून पराभव करून स्पर्धेतील आपल्या विजयाचे खाते उघडले. तर भारतीय संघाला स्पर्धेतील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यापूर्वी न्यूझीलंडने भारताचा 62 धावांनी पराभव केला होता. 
 
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या शार्लोट डीनसमोर गुडघे टेकले. डीनच्या 4 विकेट्सच्या जोरावर इंग्लंडने भारताचा डाव केवळ 134 धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात इंग्लंडने 31.1 षटकांत 6 बाद 136 धावा करून सामना जिंकला. 
 
भारताकडून स्मृती मंधानाने 35 धावा केल्या. मंधानाशिवाय ऋचा घोषने 33 आणि झुलन गोस्वामीने 20 धावा केल्या. हरमनप्रीत 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. इंग्लंडकडून शार्लोट डीनने 4, श्रबसोलने 2 आणि एक्लेस्टोन, क्रॉसने 1-1 गडी बाद केले. 
 
135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मेघना आणि गोस्वामी यांनी इंग्लंडच्या सलामीवीरांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, नताली सायवर ने वेगवान धावसंख्येने इंग्लंडचा डाव सांभाळला आणि बाद होण्यापूर्वी 46 चेंडूत 45 धावा केल्या. यादरम्यान त्याने 8 चौकार मारले. कर्णधार हीदर नाइटने शानदार अर्धशतक झळकावले. भारतातर्फे मेघनाने तीन, झुलन, गायकवाड आणि पूजाने 1-1 बळी घेतला.