बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (16:20 IST)

आशिया कप : एका मराठी माणसानं मनावर घेतलं आणि स्पर्धा सुरू झाली

Asia Cup cricket trophy
-आशय येडगे
क्रिकेटचा जन्म जरी इंग्लंडमध्ये झाला असला तरी आज भारतीय उपखंडात या खेळाची लोकप्रियता प्रचंड आहे.
 
आशिया चषकातही या खेळाच्या लोकप्रियतेचं प्रतिबिंब उमटतं. 1984 साली या स्पर्धेची सुरुवाती कशी झाली, ती गोष्टही प्रचंड रोमांचक आहे.
 
आशिया कपच्या या गोष्टीची सुरुवात 1983 साली भारताच्या विश्वचषक विजयाशी जोडली गेली आहे.
 
बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांना 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या फायनलची एक्स्ट्रा तिकिटं देण्यास ब्रिटिश अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि रागावलेल्या साळवेंनी पुढचा वर्ल्डकप भारतातच आयोजित करण्याचा निर्धार केला.
 
आशिया कपची सुरुवात आणि भारतात वर्ल्डकप आयोजित करण्यामागची गोष्ट जाणून घेण्याआधी, त्या काळात आधी जागतिक क्रिकेटची काय परिस्थिती होती, हे लक्षात घ्यावं लागेल.
 
क्रिकेटवर इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व
आज जगातलं सगळ्यांत श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच, बीसीसीआयकडे पाहिलं जातं.
 
मात्र एकवेळ अशी होती जेव्हा, क्रिकेट विश्वात भारतीय संघ ‘अंडरडॉग’ म्हणून ओळखला जायचा.
 
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार विनायक दळवी याविषयी सांगतात की, "त्याकाळी क्रिकेटवर गोऱ्यांचं वर्चस्व होतं. इंग्लंड सोडून इतर देशांसाठी खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या हक्काची तिकिटंही दिली जात नव्हती.
 
एवढंच काय तर पहिल्या तिन्ही विश्वचषक स्पर्धा या इंग्लंडमध्येच भरवल्या गेल्या होत्या."
 
विसाव्या शतकाच्या मध्यावर क्रिकेट भारतासह अनेक देशांत लोकप्रिय खेळ म्हणून नावारूपाला येत होता.
 
पण, ज्या व्यावसायिक पद्धतीने इंग्लंडसारखे, ऑस्ट्रेलियासारखे देश त्यांच्या देशातील क्रिकेटचं नियोजन आणि व्यवस्थापन करायचे ते भारतालाच काय तर आशिया खंडातल्या इतर कोणत्याही देशाला अजूनही जमत नव्हतं.
 
आशिया खंडातील क्रिकेट व्यवस्थापन करण्यामध्ये प्रामुख्याने दोन अडचणी होत्या, एक म्हणजे या खेळासाठी लागणाऱ्या मूलभूत सोयीसुविधा आशियातल्या अनेक देशांत उपलब्ध नव्हत्या आणि दुसरी अडचण म्हणजे यातल्या प्रत्येक क्रिकेट नियामक मंडळाकडे पैश्यांचा अभाव होता.
 
हे सगळं तर होतंच पण, आशिया खंडातील संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्यानं मोठं यश मिळवू शकले नव्हते. अनेक सामने आणि स्पर्धांमध्ये आशियाई संघांचा साखळी फेरीतच पराभव झाला होता.
 
1983 साली पहिल्या वर्ल्डकप विजयानं बदललं चित्र
1975 आणि 1979 मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये आशियाई संघांनी धूळ चाखली होती.
 
ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, इंग्लंडसारख्या संघांनी आशियाई संघांना अक्षरशः लोळवलं होतं. पहिल्या वर्ल्डकपमध्ये भारत फक्त एक सामना जिंकू शकला तर 1979 मध्ये झालेल्या दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता.
 
नवखा फॉरमॅट, अनुभव नसलेले खेळाडू अशी बरीच कारणं सांगितली गेली, पण भारताला या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये काहीच करता आलं नव्हतं हेदेखील तितकंच खरं आहे. आशिया खंडातल्या इतरही संघांची अशीच परिस्थिती होती.
 
1975, 1979 मध्ये झालेले हे दोन्ही वर्ल्डकप वेस्ट इंडिजने जिंकले, त्या दोन्ही स्पर्धा इंग्लंडमध्ये झाल्या होत्या.
 
मात्र त्याच वेस्ट इंडीजला हरवून 1983 साली कपिल देवाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहास रचला.
 
इंग्लंडच्या संघानेही दोन्ही स्पर्धांमध्ये प्लेऑफ गाठून त्यांचाही संघ मजबूत असल्याचं दाखवून दिलं होतं.
 
संभाव्य विजेत्यांच्या यादीत नसूनही भारताने फायनलमध्ये वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाचा पराभव करत लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक विजेतेपद मिळवलं.
 
भारताने मिळवलेला हा विजय जगाला आशियाई संघदेखील जिंकू शकतात हे दाखवून देणारा होता. भारतीय संघाच्या खेळाने अनेकांना तोंडात बोटं घालायला भाग पाडलं होतं.
 
भारतीय क्रिकेटचं रूपडं बदलायला तिथूनच तर सुरुवात झाली होती.
 
BCCI अध्यक्षांनाच नाकारलेले वर्ल्डकप फायनलचे एक्स्ट्रा पासेस
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज आशिया चषकाला महत्त्वाचं स्थान आहे. पण याची सुरुवात एक जुगाड करून झालेली होती.
 
1983 मध्ये भारत आणि वेस्ट इंडिज संघांमधल्या फायनलच्या पूर्वसंध्येला एक घटना घडली होती. याच घटनेने आशिया खंडातील क्रिकेट संघटनांना एकत्र आणल्याचं सांगितलं जातं.
 
त्यावेळचा एक किस्सा असा सांगितला जातो की भारताचे तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री सिद्धार्थ शंकर रे यांनी त्याकाळचे बीसीसीआयचे अध्यक्ष एन. के.पी. साळवे यांच्याकडे फायनलच्या दोन तिकिटांची मागणी केली होती.
 
सिद्धार्थ शंकर रे हे त्याकाळी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते.
 
त्यानंतर साळवे यांनी सिद्धार्थ शंकर रे यांच्या विनंतीचा मान राखत इंग्लंडच्या अधिकाऱ्यांना फायनलची दोन तिकिटं मागितली. त्या अधिकाऱ्यांनी त्यांना ही तिकिटं दिलीच नाहीत.
 
मात्र पहिल्या दोन वर्ल्डकपमध्ये फक्त एक मॅच जिंकू शकलेल्या भारतीय संघाने थेट विश्वचषकावर नाव कोरलं आणि इतिहास रचला.
 
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार सुरेशन मेनन असं लिहितात की, "एन. के. पी. साळवे यांनी 'द स्टोरी ऑफ द रिलायन्स कप' या त्यांच्या पुस्तकामध्ये भारतात वर्ल्डकप आणण्याची गोष्ट सांगितली आहे.
 
“1983च्या वर्ल्डकपमध्ये भारताचा संघ फायनलला पोहोचला होता. या सामन्याची दोन तिकिटं साळवे यांना देण्यात आलेली नव्हती आणि तिथेच साळवे यांनी पुढचा वर्ल्ड कप भारतात आणण्याची शपथ घेतली होती.
 
आता पुढे भारतात वर्ल्डकप हा या घटनेमुळे आला की भारतात ही स्पर्धा येण्याची वेळ आलीच होती याबाबत मतमतांतरे असली तरी भारतात विश्वचषक स्पर्धा भरवण्याचं त्यांचं स्वप्न 1987 मध्ये पूर्ण झालं हे मात्र नक्की."
 
भारतात विश्वचषक आयोजित करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमोर अनेक अडचणी होत्या.
 
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या दोन देशांकडे त्याकाळी व्हीटो पॉवर होती.
 
यामुळे या देशांचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेवर वर्चस्व होतं. यानंतर एन.के. पी. साळवे यांनी भारतासह इतर आशियाई आणि सहयोगी देशांना एकत्र आणून ही व्हिटो पॉवर संपवण्यात मोठी भूमिका निभावल्याचं मेनन लिहितात.
 
कोण होते एन. के. पी. साळवे?
1982 ते 85 याकाळात बीसीसीआयचे अध्यक्ष राहिलेल्या नरेंद्र कुमार प्रसाद साळवे यांचा मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा येथे जन्म झाला होता.
 
याच काळात 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता.
 
प्रसादराव केशवराव साळवे आणि कॉर्नेलिया करुणा जाधव या मराठी ख्रिश्चन आई वडिलांच्या पोटी नरेंद्र साळवे यांचा जन्म झाला होता.
 
त्यांचे आईवडील दोघेही स्वातंत्र्यसैनिक तर होतेच पण त्यांच्या आई या गणित ऑनर्समध्ये पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
 
मध्य प्रदेशातल्या बैतुलमधून ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते.
 
नंतरच्या काळात राज्यसभेवर प्रतिनिधित्व करताना इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्रीदेखील होते.
 
1978 ते 2002 याकाळात साळवे महाराष्ट्रातून सलग चारवेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. 1972 ते 1980 मध्ये ते विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही राहिले होते.
 
त्यांच्याच प्रयत्नाने 1987 मध्ये विश्वचषक स्पर्धा भारत-पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती. क्रिकेटमधील त्यांचे योगदान लक्षात घेऊन 1988-89 मध्ये चॅलेंजर ट्रॉफीचे नामकरण एनकेपी साळवे चॅलेंजर ट्रॉफी असं करण्यात आलं.
 
भारत आणि पाकिस्तान जेव्हा एकत्र आले
25 जून 1983 ला भारताने पहिला विश्वचषक जिंकल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी घडलेल्या एका महत्त्वाच्या भेटीबाबत सुरेश मेनन यांनी लिहिलं आहे.
 
ते सांगतात, "26 जून 1983 ला म्हणजेच भारताने वर्ल्डकप जिंकल्याच्या दुसऱ्याच दिवशी लंडनमध्ये एन. के. पी. साळवे आणि पाकिस्तानचे एअर चीफ मार्शल नूर खान यांची भेट झाली.
 
याच भेटीत साळवे यांनी त्यांचा मानस बोलून दाखवला आणि यासाठी पाकिस्तानचा पाठिंबा मागितला. यानंतर साळवे यांना भारत-पाकिस्तान संयुक्त क्रिकेट व्यवस्थापन समितीचं अध्यक्ष बनवलं गेलं."
 
मात्र, आशिया खंडातील दोनच देश एकत्र येऊन काम होणार नव्हतं आणि म्हणून साळवे यांनी श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष गामिनी दिसानायके यांना सोबत घेऊन एक संघटना बनवण्याचा प्रयत्न सुरु केला.
 
19 सप्टेंबर 1983 ला आशियाई क्रिकेट संघटने(ACC)ची नवी दिल्ली येथे स्थापना झाली. या संघटनेचे पाहिले अध्यक्ष होते एन. के. पी. साळवे.
 
भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान यांसोबतच बांगलादेश, मलेशिया आणि सिंगापूर हेदेखील त्याकाळी या संघटनेचे सदस्य होते.
 
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाबाहेर क्रिकेटचा प्रसार करणे आणि आशिया खंडात जागतिक दर्जाच्या स्पर्धा आयोजित करणे हा या संघटनेचा हेतू होता.
 
याबाबत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदेश कुमार गुप्त असं म्हणतात की, "भारतात वर्ल्डकप आयोजित करण्यामध्ये त्याकाळी बीसीसीआयचे सचिव राहिलेल्या जगमोहन दालमिया यांनीदेखील महत्वाची भूमिका बजावली होती."
 
विस्डेन इंडिया या क्रिकेट संदर्भातील वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, "भारतीय उपखंडात वर्ल्डकप आयोजित करण्याआधी त्याच तोडीची एखादी स्पर्धा आयोजित केली जावी यासाठी आशिया कप स्पर्धेचा विचार करण्यात आला.
 
“अशी स्पर्धा आयोजित करण्यासाठी मोठा निधी लागत असतो आणि त्याकाळी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच होती.
 
मात्र तरीदेखील दिल्लीमध्ये एक बैठक त्याकाळी घेण्यात आली. या बैठकीत आयसीसीच्या सहयोगी सदस्य देशांनाही बोलवण्यात आलं आणि या बैठकीचे प्रमुख पाहुणे होते शारजाचे शेख बुखातीर."
 
क्रिकेटच्या इतिहासातील हा महत्त्वाचा क्षण होता. या क्षणापर्यंत, आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने आयसीसीद्वारे चालवले जात होते.
 
आता आयसीसीअंतर्गतच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं आयोजन करणारी आणि नफा कमावणारी ACC ही पहिली प्रादेशिक संस्था ठरली.
 
भारत पहिल्या आशिया कपचा विजेता ठरला
आता सगळीच व्यवस्था झाली होती. 1984 मध्येच पहिल्या रॉथमन्स आशिया कप स्पर्धेचं आयोजन केलं गेलं. या स्पर्धेत भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी झाले होते.
 
या स्पर्धेच्या विजेत्या संघाला तब्बल पन्नास हजार अमेरिकन डॉलर तर उपविजेत्या संघाला वीस हजार अमेरिकन डॉलरची घवघवीत रक्कम बक्षीस म्हणून मिळणार होती.
 
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय संघावर दुहेरी दबाव होता.
 
एकतर जगाला हे दाखवून द्यायचं होतं की 1983 मध्ये जिंकलेला वर्ल्डकप हा केवळ नशिबाचा भाग नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आशिया खंडात मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात, हेदेखील भारताला सिद्ध करायचं होतं.
 
1984मध्ये भारताचे कर्णधार कपिल देव हे दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होऊ शकले नव्हते.
 
भारतीय संघाने सुनील गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा पहिल्यांदा 1984 मध्ये जिंकली होती.
 
पहिली स्पर्धा शारजामध्ये का झाली होती?
संयुक्त अरब अमिरातीमध्ये ही स्पर्धा का आयोजित करण्यात आली होती याबाबत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आदेश कुमार गुप्त असं म्हणतात की, "संयुक्त अरब अमिरातीमध्ये दक्षिण आशियातील लोक मोठ्या प्रमाणात राहत होते.
 
पाकिस्तानात देशांतर्गत क्रिकेट खेळणारे संघ शारजाचे दौरे करायचे, शारजामध्ये पहिली खेळपट्टी बनवली गेली तेंव्हाही त्यासाठी पाकिस्तानातलीच माती वापरण्यात आलेली होती. त्यामुळे तिथे क्रिकेट हा लोकप्रिय खेळच होता."
 
विस्डेनने दिलेल्या माहितीनुसार, शारजामध्ये आशिया कपच्या आधीदेखील वेगवेगळ्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केलं जात होतं. शेख बुखातीर हे तिथल्या स्पर्धा भरवत असत.
 
यानंतर मात्र पुढचा वर्ल्डकप 1987 मध्ये भारत आणि पाकिस्तानात आयोजित करण्यात आला.
 
आज भारतीय क्रिकेट संघ जगातला बलाढ्य संघ बनला आहे. आशिया कपच्या इतिहासातील सगळ्यांत यशस्वी संघ म्हणूनही भारताकडे पाहिलं जातं कारण भारताने तब्बल सातवेळा ही स्पर्धा जिंकण्यात यश मिळवलं आहे.