दरवर्षी दोन तीन वेळा तरी मी माझ्या खेडेगावी जातो, चार दोन दिवस विश्रंती घेतो. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतात. बालपणीचे मित्र भेटतात. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. लहानपणी खेळलेले खेळ, तुडुंब भरलेल्या विहिरीत मारलेल्या उडय़ा या सगळ्या गमती-जमती आठवून खूप आनंद होतो.
अलीकडे खेडय़ाचे वातावरण संपूर्ण बदललेले आहे. विहिरी, तळी, ओढे कोरडे-फटक पडले आहेत. शेतमळे उदास दिसताहेत. झाडेझुडपे नाहीशी झाली आहेत, जनावरांची संख्या कमालीची घटली आहे. शेळ्या, मेंढय़ांचे कळप तर शोधूनही नजरेला पडत नाहीत.
मी माझे बालपण आठवू लागलो. आजचे दृश्य पाहता मनाला चटका लागून गेला. रम्य ते वातावरण, झाडे-झुडपे भरपूर, हिरवेगार शेतमळे, शेतकर्यांचे लगबगीने शेताकडे जाणे येणे, जनावरांची दूधदुभतंची रेलचेल, हे सगळं आठवताना एका गोष्टीने मन फारच उदास झाले.
लिंबाच्या, आंब्याच्या झाडावर होणारा एकच गलका मला आठवला. पक्ष्यांच्या किलबिलाट कानात एकसारखा घुमू लागला. चिमण्यांचा चिवचिवाट, कावळ्यांचे काव-काव, हे सगळे आवाज माझ्या कानात एकच गर्दी करू लागले; पण आज हे सगळे कुठे गेले? काहीच कळायला मार्ग नाही.
खेडय़ात रोजच्या पक्ष्यांचा कलकलाट असायचा. एखाद्या झाडावर सूर्योदयापूर्वी इतका कलकलाट व्हायचा की, ते ऐकूनच सारा गाव झोपेतून जागा होत होता. झाडावर भरपूर चिमण्या असत. त्यांच्याबरोबर इतर अनेक पक्षीही सामील झालेले दिसत. एकाच झाडावर सगळ्या पक्ष्यांचा एकच दंगा चालू असे. हा पक्ष्यांचा खेळ, चिवचिवाट, कलकलाट ऐकण्यात व बघण्यात मोठी मौज असे, आनंद वाटे. मन अगदी प्रसन्न होऊन जात असे.
एके काळी कितीतरी मोठय़ा संख्येने चिमण्या, कावळे, पोपट, घारी, गिधाडे, करकोचे पाहायला मिळायचे, पण आज हे सगळे पक्षी फार थोडय़ा प्रमाणात दिसतात. कोठे गेले हे सगळे पक्षी? हा प्रश्न मनाला एकसारखा सतावतो. माणसांना आवडणारे, मुलांना हवेहवेसे वाटणारे हे सगळे पक्षी आपल्यावर रूसून दुसर्या देशात तर गेले नसतील?
घरात येऊन बसणारी एखादी चिमणी, घराच्या इमल्यात चिमणीने बांधलेले घरटे आजही आठवते. आजीनं बाळाला भरवलेला चिऊचा घास, आईनं म्हटलेलं चिऊ चिऊचं गाणं आणि रात्री झोपताना सांगितलेली ‘चिमणीचं घर मेणाचं’ ही गोष्ट; हे सगळं आठवतं, पण आजची बदललेली स्थिती बघून मन अधिकच उदास बनते.
आपलकडच्या चिमण्या कुठे गेल्या? त्यांना परत आणायला हवं. त्यांना बोलवायला हवं, पण नुसत बोलवण्याने त्या येतील का? हा मोठा प्रश्न आहे. त्यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवं. चिमण्या येण्याची नुसती वाट पाहून चालणार नाही. चिमण्या कमी झाल्या म्हणून काळजी करून, चिंता करून, चर्चा करून काहीच पदरात पडणार नाही.
चिमण्या परत येण्यासाठी आपल्याला मनापासून प्रयत्न करायला हवेत. सर्वप्रथम खूप झाडे लावून ती वाढवायला हवीत. चिमण्यांना आवडते ज्वारी म्हणजेच जोंधळा; पण आता तर शेतात ज्वारी फारशी लावलीच जात नाही. सगळेच शेतकरी ऊस लावतात. गहू लावला तरी चिमणी येत नाही, कारण गव्हाच्या ओम्बीला टोचणारं टोक असतं. चिऊताईला ते टोचतं. चिमण्यांना ज्वारी आवडते म्हणून ज्वारीची शेते वाढली पाहिजेत. आपण सर्वानी चिमण्यांठी आपल्या अंगणात ज्वारी पसरून टाकायला हवी. अंगणात कुंडीमध्ये ज्वारीचे दाणे टाकून ज्वारीची कणसे त्यांच्यासांठी आणता येतील. शिवाय चिऊताईसाठी दाणा पाणी ठेवायला हवं. दाणा म्हणजे घरातलं थोडसं धान्य. शिजवलेला भात, पोळीचे तुकडे. आमच्या लहानपणी तर तांदूळ घेतले भातासाठी की, मूठभर तांदूळ खिडकीत टाकायची आई!
आज चिमण्यासाठी आपणा सर्वानी काहीतरी नक्कीच केले पाहिजे. त्यांना घरटी बांधण्यास वळचणीची जागा दिली पाहिजे. सिमेंटच्या इमारतीत त्यांना आपण पूर्ण मज्जाव केला आहे. आपल्या बाल्कनीत चिमणीने घर बांधयले पाहिजे. तिच्यासाठी दाण्या-पाण्याची सोय करायला हवी. चिमण्या आल्या नाहीत, वाढल्या नाहीत तर पुढच्या पिढीला चित्रातच चिमणी दाखवावी लागेल.