गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 जुलै 2021 (14:26 IST)

एसटी : महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित लालपरी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ही महाराष्ट्र राज्यात रस्त्यांवरून प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थापन झालेली राज्य सरकारची कंपनी आहे. तिच्या सेवा आणि वाहने एसटी या लघुरूपानेच महाराष्ट्रीय जनतेत प्रचलित आहेत.
 
स्थापना
वाहनांद्वारे सावर्जनिक प्रवासी वाहतुकीची सुरवात महाराष्ट्रात १९३२ च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरू झाली. १९४७ मध्ये भारताच्या ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात १९४८ मध्ये बॉंबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रान्सपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.
 
बीएसआरटीसीची पहिली बस १ जून १९४८ यादिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली. पुढे भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्यप्रांत आणि संपुष्टात आलेल्या निजाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरू राहिला.
 
एसटीची सेवा "गाव तेथे एसटी", "रस्ता तेथे एसटी" या ब्रीदवाक्यानुसार खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण ३१ विभागातून एसटीचे विभागीय कामकाज होते. त्याचप्रमाणे एसटी महामंडळाकडून आंतरराज्यीय सेवा पुरविली जाते. ह्या सेवेचा गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यांत विस्तार झाला आहे.
 
आज 71 वर्षांच्या प्रवासात मैलाचा दगड सिद्ध झालेल्या या सेवेची कहाणी म्हणजे 18,449 बस, 1,02,000 कर्मचारी आणि दररोज सुमारे 67 लाख नागरिक या सेवेचा उपयोग करतात. एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर 2002 मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवीत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.
 
एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल ॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा दिली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच 2017 पासून महामंडळाने 'शिवशाही' या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत.
 
एसटीकडे वाहतूक सेवेसाठी सध्या साध्या बसगाड्या, शहर बस गाड्या, निम आराम बसगाड्या, मिनी बसगाड्या, डीलक्स बसगाड्या, वातानुकूलित बसगाड्या, मिडी गाड्या यांचा समावेश आहे. याशिवाय अधिकारीवर्गाची वाहने, पुरवठ्याची वाहने आदी वाहने महामंडळाकडे आहेत.
 
स्त्रोत: इंटरनेट