शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. घरचा वैद्य
Written By
Last Modified: सोमवार, 8 जून 2020 (06:42 IST)

जांभळट लाल ‘कोकम’चे गुणकारी फायदे जाणून घेऊया…

आमसूल किंवा कोकम हे आंबट फळ आमटी, भाजीत वापरले जाते. आमसुलाची झाडे गोवा, कोकण, केरळ, कर्नाटक या भागांत येतात. या झाडाच्या फळांना कोकम आणि फळावरच्या सुकवलेल्या सालींना आमसूल किंवा कोकम म्हणतात. 
 
आमसुलापासून सरबत, चटणी, सार बनवले जाते. वरण, भाजीला आंबटपणा येण्यासाठी आमसूल वापरले जाते. चिंचेपेक्षा आमसूल अधिक गुणकारी आहे. नेहमी वापरले तरी चालते.
आमसूल हे पाचक असून अंगावर पित्त उठणे, मूळव्याध, मुरडा, संग्रहणी, दाह यामध्ये उपयोगी पडते. 
आमसूल बारीक वाटून पाण्यात मिसळून वेलदोडे, जिरेपूड, साखर टाकून सरबत बनवता येते. तयार सरबतही बाजारात मिळते. 
उन्हाळ्यात याचा नेहमी वापर करावा. 
आमसुलांच्या बियांपासून तेल काढतात. ते पांढरट व मेणासारखे घट्ट असते. हिवाळ्यात त्वचेला, तळहात, तळपायास भेगा पडतात. त्यावर हे तेल गरम क रून लावतात. मलम तयार करण्यासाठी कोकम तेल वापरतात. 
मूळव्याधीतून रक्त पडत असल्यास कोकम तेल खाण्यास देतात. कोकम तेल पौष्टिकही आहे.
उष्णतेमुळे शरीराची आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळल्यास उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
पाण्यात कोकम घालून काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
रोजच्या आहारात कोकमचा वापर केल्यास आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इत्यादी तक्रारी दूर होऊन आहाराचे व्यवस्थित अन्नपचन होते.
अंगावर पित्त उठले असेल तर संपूर्ण अंगास कोकमचा कल्क लावल्याने आराम मिळतो.
पोटात कळ येऊन आव पडत असल्यास भातावर कोकमचा रस घालून तो खावा.
पोटात मुरडा येऊन रक्ताचे जुलाब होत असतील तर कोकम कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
पाण्यात कोकम कुस्करल्यानंतर गाळून घ्यावे. गाळलेल्या पाण्यात जिरेपूड, साखर घालून ते प्यायल्यास शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
हिवाळ्यात कोकमचे तेल कोमट करून लावल्यास आपले ओठ मऊ राहतात.
तसेच कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास शरीर कोरडे पडत नाही आणि शरीरावर भेगाही पडत नाहीत.