सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: गुरूवार, 28 सप्टेंबर 2023 (15:37 IST)

काल रात्री गणपती बाप्पा होता टिळकांशी भांडत

काल रात्री गणपती बाप्पा 
होता टिळकांशी भांडत,
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने मांडत ||
 
देवघरातून तू मला
बाहेर का आणलंस ? 
तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक
कशाला  चार-चौघात मांडलंस ? 
 
गायलास तू सुरुवातीला 
ताल-सुरात आरत्या,
केलीस साधी फुलांची आरास
भोवती रंगीत बत्त्या.
 
खूप मस्त छान असायचं
आनंद वाटायचा येण्यात,
सुख-शांती-समाधान मिळे
चैतन्य तुला देण्यात.
 
दहा दिवस उत्सवाचे म्हणजे 
असे, दिव्यत्वाची रंगत... 
काल रात्री गणपती बाप्पा 
होता,  टिळकांशी  भांडत ||
 
पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने
मंगलमयी वाटायचे,
प्रबोधक, उद्बोधक  भाषणांनी
विचार उंची गाठायचे.
 
आत्ता सारखा हिडीसपणा 
मुळीच नव्हता तेव्हा,
शांताबाईच्याच नावाचा
आता अखंड धावा.
 
पीतांबर, शेला, मुकुट 
हे माझे खरे रुप,
शर्ट, पँट, टोपी, पागोटे
धिगाण्याला फक्त  हुरूप.
 
शाडूची माती... नैसर्गिक रंग
गायब आता झाले कुठे ? 
लायटिंग केलेल्या देखाव्याने
मला दरदरून घाम फुटे ! 
 
श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा
गेला ना रे सांडत... 
काल रात्री गणपती बाप्पा 
होता,  टिळकांशी भांडत ||
 
माणसां-माणसांनी एकत्र यावे
एकमेकांना समजुन घ्यावे,
देव-घेव विचारांची करतांना
सारे कसे एक व्हावे.
 
जातीभेद नसावा... 
बंधुभाव असावा,
सहिष्णुतेच्या विचारांनी 
नवा गाव वसावा.
 
मनातला विचार तुझ्या 
खरंच होता मोठा,
पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच
बघ मिळालाय फाटा.
 
पूर्वी विचारांबरोबर असायची 
खाण्यापिण्याचीही रेलचेल,
आता मात्र देखाव्यांमागे 
दडलेला असतो काळा खेळ.
 
पूर्वी बदल म्हणून असायचे 
पोहे-चिवडा-चहा-काॅफी... 
साग्रसंगीत जेवणा सोबत 
लाडू-मोदक-पेढे-बर्फी.
 
आता, रात्री भरले जातात 
पडद्यामागे, मद्याचे पेले
डी. जे. वर नाचत असतात
माजलेले दादांचे चेले.
 
नको पडूस तू असल्या फंदात
तेव्हाच मी होतो सांगत... 
काल रात्री गणपती बाप्पा 
होते,  टिळकांशी भांडत ||
 
कशासाठी उत्सव असा
सांग ना रे  बांधलास ? 
देवघरातून गल्लोगल्ली 
डाव माझा मांडलास ! 
 
दहा दिवस कानठळ्यांनी 
होतो मला आजार,
व्यवहारी दुनिया इथली, 
इथे चालतो लाखोंचा बाजार.
 
रितीरिवाज, आदर-सत्कार, 
मांगल्याचा नाही पत्ता,
देवघरा ऐवजी माझा
रस्त्यावरती सजतो कट्टा.
 
जुगार-दारु-सट्टा-मट्टा - 
अनैतिकतेला येतो ऊत,
देवा ऐवजी दैत्याचेच मग
मानेवरती चढते भूत.
 
सामाजिक बाजू सोडून सुटतो
राजकारणालाच इथे पेव,
गौरी-गणपती सण म्हणजे - 
गैरव्यवहाराची ठेव-रेव.
 
नको रे बाबा, नको मला हा
मोठेपणाचा तुझा उत्सव, 
मला आपले तू माझ्या जागी
परत एकदा नेऊन बसव.
 
कर बाबा कर माझी सुटका 
नको मला ह्यांची संगत... 
काल रात्री गणपती बाप्पा 
होता, टिळकांशी भांडत ||
 
आपल्या अडचणींची कैफियत
होता पोटतिडकीने  मांडत,
काल रात्री गणपती बाप्पा 
होता,  टिळकांशी भांडत ||

- सोशल मीडिया