शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (12:51 IST)

रणी फडकती लाखो झेंडे

रणी फडकती लाखो झेंडे अरुणाचा अवतार महा
विजयश्रीला श्री विष्णूंपरी भगवा झेंडा एकची हा ॥ धृ.॥
शिवरायांच्या दृढ वज्राची सह्याद्रीच्या हृदयाची
दर्या खवळे तिळभर न ढळे कणखर काठी झेंड्याची
तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता
पाश पटापट तुटती त्यांचा खेळे पट झेंड्यावरचा
लीलेने खंजीर खुपसता मोहक मायेच्या हृदयी
अखंड रुधीरांच्या धारांनी ध्वज सगळा भगवा होइ
अधर्म लाथेने तुडवी,
धर्माला गगनी चढवी,
राम रणांगणी मग दावी ॥१॥
कधी न केले निजमुख काळे पाठ दावुनी शत्रुला
कृष्ण कारणी क्षणही न कधी धर्माचा हा ध्वज दिसला
चोच मारण्या परव्रणावर काकापरी नच फडफडला
जणु जटायु रावणमार्गी उलट रणांगणी हा दिसला
परलक्ष्मीला पळवायाला पळभर पदर न हा पसरे
श्वासांश्वासांसह सत्याचे संचरती जगती वारे
गगनमंदिरी धाव करी
मलीन मृत्तिका लव न धरी
नगराजाचा गर्व हरी ॥२॥
मुरारबाजी करी कारंजी पुरंदरावर रुधिरांची
झुकली कुठली दौलत झाली धर्माच्या ध्वजराजाची
संभाजीच्या हृदयी खवळे राष्ट्रप्रेमाचे पाणी
अमर तयांच्या छटा झळकती निधड्या छातीची वाणी
खंडोजी कुरवंडी कन्या प्रेमे प्रभुचरणावरुनी
स्वामी भक्तीचे तेज अतुल ते चमकत राहे ध्वज गगनी
हे सिंहासन निष्ठेचे
हे नंदनवन देवांचे
मूर्तीमंत हा हरी नाचे ॥३॥
स्मशानातल्या दिव्य महाली निजनाथासह पतीव्रता
सौभाग्याची सीमा नुरली उजळायाला या जगता
रमा-माधवा सवे पोचता गगनांतरी जळत्या ज्योती
चिन्मंगल ही चिता झळकते ह्या भगव्या झेंड्यावरती
नसूनी असणे, मरूनी जगणे, राख होउनी पालविणे
जीवाभावाच्या जादुच्या ह्या ध्वजराजाला हे लेणे
संसाराचा अंत इथे
मोहाची क्षणी गाठ तुटे
धुके फिटे नव विश्व उठे ॥४॥
या झेंड्याचे हे आवाहन ’महादेव हर हर’ बोला
उठा हिंदुनो अंधारावर घाव निशणीचा घाला
वीज कडाडुनि पडता तरुवर कंपित हृदयांतरी होती
टक्कर देता पत्थर फुटती डोंगर मातीला मिळती
झंजावाता पोटी येउनी पान हलेना हाताने
कलंक असला धुवूनी काढणे शिवरायाच्या राष्ट्राने
घनचक्कर या युद्धात
व्हा राष्ट्राचे राऊत
कर्तृत्वाचा द्या हात.. ॥५॥
- वि. स. खांडेकर