1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. शाकाहारी
Written By वेबदुनिया|

खान्देशी भरीताची लज्जत न्यारी

MH NewsMHNEWS
'देश तसा भेस..!' असे आपण म्हणतो. ज्या प्रांतात व्यक्ति राहते त्याप्रमाणे त्याला पेहराव करावा लागतो. मात्र याउलट असे देखील म्हटता येईल की, ज्या प्रांतात राहतो त्याप्रमाणेच त्याचे खाद्य पदार्थही असतात. कारण पुणे म्हटलं की, जोशींची वडे आठवतात. त्याप्रमाणे खान्देश म्हटलं की, वांग्याच्या भरीताने तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. खान्देशी भरताची चव लय भारी असल्याने खान्देशातल्या वांग्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून तर मागणी आहेच. परंतु आता तर इतर राज्यातून मागणी होत आहे.

नोव्हेंबर महिना लागला की, भरीताच्या वांग्यांची बाजारात आवक वाढते. सुरवातीलला वांग्यांचे भाव तर गगनाला भिडलेले असतात. नंतर आवक जशी वाढते तसे भाव खाली येतात. जळगाव- भुसावळच्या बाजारात तर बामणोदच्या वांग्यांचा जोर दरवर्षीच कायम असतो. बामणोदची वांगी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. पुण्याच्या पिंपरी-चिंचवड परिसरात बामणोदची भरीताची वांगी हातोहात विकली जातात. कारण या परिसरात खान्देशी लोक मोठ्या प्रमाणात राहतात.

खान्देशात केळीचे मळे मोठ्या प्रमाणात असल्याने भरीत पार्ट्यांचे नियोजन केले जाते. भरीत, पुरी आणि आमसुलाच्या लज्जतदार कढीवर केळीच्या पानावर भारतीय बैठकीत ताव मारला जातो. प्रति व्यक्ति १ किलोप्रमाणे पार्टीला आलेल्या सदस्य संख्येवरून वांगी खरेदी केली जातात. त्यासोबत हिरव्या मिरच्या, कांद्याची पात, लसूण, शेंगदाणे हे पदार्थ भरतासाठी लागतात. तुरकाठ्यावर किंवा बोरीच्या काट्यांवर भाजलेले वांग्याचे भरीत अधिक चविष्ट लागते.

भरीत तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे. सर्व प्रथम भरीतासाठी लागणारे खास वांगे घ्यायचे. हे वांगे भाजी वांग्यांपेक्षा चार पट मोठे असतात. काही वांगे इतकी मोठी असतात की एक ते दीड किलोचे एकच वांगे भरते. हिरव्यागार रंगाचे व त्यावर पांढरे भुरकट डाग असणार्‍या वांग्यामध्ये बिया अत्यंत कमी असतात. भरीत करण्यासाठी घेतलेल्या वांग्यांना तेल लावून काड्यांची आग करून त्यावर ठेवले जाता व ते काळेशार होईपर्यंत भाजले जातात. थंड होईपर्यंत कांद्याची पात, लसूण, हिरव्या मिरच्या बारीक केल्या जातात. भाजलेले वांगी थंड झाल्यानंतर काळे सालटे काडून एका मोठ्या भांड्यात वांग्यात ठेचावे लागते. त्यात हिरव्या मिरचीचा ठेचा करून तेलात फोडणी द्यावी. त्यात शेंगदाणे टाकावेत. भरीत तयार झाल्यानंतर हिरवी कोथिंबीर घालावी. कळण्याची भाकरी, पुरीसोबत भरीत खाण्याची लज्जतच न्यारी आहे. भरताची चव कुठल्याही फायुस्टार हॉटेलातील पदार्थापेक्षा अधिकच चांगली असते.

भरीत पार्टी हा एक आनंदोत्सव असतो. पार्टी देणार्‍याला आणि घेणार्‍याचाही आनंद द्विगुणीत होत असतो. पाचपासून पाचशे जणांची पार्टी आयोजित केली जाते. कळण्याची किंवा गव्हाची पुरी, दह्याची कोशिंबीर आणि तळलेल्या हिरव्या मिरच्या केळीच्या पानावर रानात बसून खायचा आनंद शब्दात वर्णन करता येत नाही. नातेवाईकांना हवाबंद डब्यातून पाठविले जाते. सिझनमध्ये तर जळगांव, भुसावळ, असोदा येथे भरीत भाकरी सेंटर उघडली जातात. प्लेट सिस्टिमने पार्सलची सुविधा देणारे अनेक विक्रेते शहरात खवय्यांच्या जीभेचे लाड पुरवितात.

अजिंठा लेणी पाहण्यासाठी येणारे देशी पर्यटकही हौसेने केळीच्या पानावर भरीत भाकरीचा आस्वाद घेतात. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक परिषदा किंवा चर्चासत्रे, मेळावे असोत की रोटरी, लायन्सच्या बैठका असोत तेथील जेवणावळीत भरीत भाकरी हा मेनू आवर्जून असतो. खान्देशात वांग्याचे अनेक प्रकार पिकविले जातात. हिरवे आणि जांभळे वांगे, काटेरी वांगे या भागात पिकतात. भरीतसाठी लांब हिरव्या वांग्याची निवड केली जाते. ही वांगी देखील या भागात मुबलक पिकतात आणि विकतातही.

जळगांव येथील बी. जे. मार्केटजवळ असलेल्या श्री. भोळे यांचे कृष्णा भरीत सेंटरमध्ये बारा महिने भरीत मिळते. हिवाळ्यातच भरीत खाण्याची आणि खाऊ घालण्याची मजा काही औरच असते. खान्देशातील अशा भरीत पार्टीची मजा लुटायची असेल तर त्यासाठी जळगांवला यावे लागेल. कामानिमित्त जळगावात आलेल्यांनी सिझनमध्ये जरूर या मेनूचा लाभ घ्यावा अन् खान्देशी भरीताची मजा लुटावी.

स्त्रोत- महान्युज