मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 25 जून 2022 (08:57 IST)

मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांत गतवर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जून महिन्यात सरासरी ७० टक्के कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत तलावांत १,४१,३८७ दशलक्ष लिटर इतका कमी पाणीसाठा शिल्लक असल्याने व अपेक्षित पाऊस न पडल्याने अखेर पालिकेने २७ जूनपासून दररोजच्या पाणीपुरवठ्यात १० टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महापालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही १० टक्के कपात लागू राहणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दररोज ३,८५० ऐवजी ३,४६५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होणार आहे. तलावातील शिल्लक पाणीसाठा व दररोज होणारा पाणीपुरवठा यांचे गणित केल्यास मुंबईला पुढील ४० दिवस म्हणजे येत्या २ ऑगस्टपर्यन्त पुरेल इतका आहे. मुंबईकरांनी उपलब्ध पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
 
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईतील कमी क्षमतेच्या दोन तलावांत व मुंबई बाहेरील पाच मोठया तलावांत म्हणजे एकूण सात तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. पावसाळा संपल्यावर म्हणजे १ ऑक्टोबर रोजी पालिकेकडून तलावातील पाणी साठ्याचा आढावा घेतला जातो. त्यानुसार मुंबईला पुढील वर्षभरासाठी सात तलावांत मिळून १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा असणे आवश्यक असते. मात्र तलावांत अपेक्षित पाणीसाठा नसेल व तो खूप कमी असेल तर पालिका प्रशासन पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेते.