शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 जुलै 2023 (22:05 IST)

Heavy rains in Mumbai मुंबईत मुसळधार : रस्ते पाण्याखाली, रेल्वे वाहतूक उशिराने

Heavy rains in Mumbai मुंबईत आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहर आणि उपनगरांतील सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चुनाभट्टी, सायन सर्कल, हिंदमाता, अंधेरी आदींसह वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे.
 
हवामान खात्याने मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर केला होता. तो अंदाज खरा ठरला.  मुंबई आणि उपनगरांत मागील दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका पश्चिम रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. अनेक रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहतूक मंदावली आहे. तर पश्चिम रेल्वेची वाहतूक पंधरा मिनिटे उशिराने आहे.
 
मुंबईला गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपले. त्यानंतर आज, शुक्रवारी सकाळपासूनच मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेल्या दोन तासांपासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रस्त्यांवर पाणी साचले आहे. परिणामी रस्ते वाहतूक मंदावली आहे. रस्ते वाहतूक मंदावल्याने नागरिकांचे हाल झाले.
 
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे हवेतील दृश्यमानता कमी झाल्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटे उशिराने सुरू आहे. विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी देखील वाढली आहे.
 
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे अंधेरी सबवेमध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी भरले आहे. वाहतूक पोलिसांनी हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. अंधेरी पूर्वेकडे जाण्यासाठी वाहनचालकांना कॅप्टन गोरे पूल आणि ठाकरे उड्डाणपुलाचा वापर करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत.