मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 3 ऑक्टोबर 2020 (09:31 IST)

मुंबईत 65 उद्यानाचे घनदाट जंगलामध्ये रूपांतर होणार

मुंबईत झाडांची संख्या वाढविण्यासाठी 65 उद्यानाचे घनदाट जंगलामध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. ‘मियावाकी’ वनीकरण पद्धतीने दाट शहरी वनीकरण करण्याचा महापालिकेने निर्णय घेतला आहे. या पद्धतीने वर्षभरात चार लाख झाडे लावण्याचा संकल्प मुंबई महापालिकेने सोडला आहे.
 
2018 मध्ये झालेल्या वृक्ष गणनेनुसार मुंबईत साधारणपणे 29 लाख 75 हजार 283 झाडे आहेत. यापैकी 15 लाख 63 हजार 701 एवढी झाडे खासगी आवारांमध्ये आहेत, तर 11 लाख 25 हजार 182 एवढी झाडे शासकीय परिसरांमध्ये आहेत. याव्यतिरिक्त 1 लाख 85 हजार 333 झाडे ही रस्त्यांच्या कडेला असून उर्वरित 1 लाख 1 हजार 67 एवढी झाडे विविध उद्यानांमध्ये आहेत.
 
मुंबईतील झाडांची संख्या वाढवण्यासाठी पालिकेने ‘मियावाकी’ वनीकरण पद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत अंधेरीमध्ये अशा प्रकारची योजना राबवण्यात आली आहे. येणार्‍या काळात शहर, पश्चिम उपनगर व पूर्व उपनगरातील 65 उद्यानांची ‘मियावाकी’ वनीकरण पद्धतीने झाडे लावण्यासाठी निवड करण्यात आली आहे. यासाठी 226 कोटी 77 लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.