बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : रविवार, 26 नोव्हेंबर 2023 (17:42 IST)

मुंबई दहशतवादी हल्ला : 26 नोव्हेंबर 2008 ला नेमकं काय घडलं होतं?

26/11 अर्थात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती आपली ओळख बनू द्यायची नव्हती.
 
या घटनेला 15 वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत.
 
लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता.
 
सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले.
 
26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली.
 
हल्लेखोरांनी मुंबईतील दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स, एक हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन आणि ज्यू सेंटरला टार्गेट केलं होतं.
 
हा हल्ला इतका मोठा असेल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता.
 
पण हळूहळू परिस्थिती चिघळत गेली आणि त्याच्या गांभीर्याचा अंदाज येऊ लागला.
 
26 नोव्हेंबरच्या त्या रात्री दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह मुंबई पोलिसांच्या अनेक अधिकाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले.
 
लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसपासून सुरू झालेलं हे मृत्यूचं तांडव ताजमहाल हॉटेलजवळ जाऊन संपलं.
 
या दरम्यान 160 हून जास्त लोकांना त्यांचे प्राण गमवावे लागले. तर सुरक्षा दलाच्या जवानांना या ऑपरेशनसाठी 60 तासांहून अधिक वेळ लागला. पण त्या रात्री नेमकं काय काय घडलं ते जाणून घेऊ...
 
लिओपोल्ड कॅफे
मुंबई पोलीस आणि तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी दोन दोन गटांमध्ये विभागले होते. लिओपोल्ड कॅफेमध्ये पोहोचलेल्या दोन दहशतवाद्यांनी तिथं अंदाधुंद गोळीबार सुरु केला.
 
या कॅफेमध्ये बरेच फॉरेनर्स येतात. कारण हा कॅफे परदेशी पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. त्या दिवशी कॅफेत हजर असणाऱ्या लोकांना काही कळायच्या आतच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला आणि तिथून पळ काढला.
 
अधिकृत आकडेवारीनुसार, लिओपोल्ड कॅफेमध्ये झालेल्या गोळीबारात 10 जण मृत्युमुखी पडले होते.
 
छत्रपती शिवाजी टर्मिनस
छत्रपती शिवाजी टर्मिनस हे रेल्वे स्थानक नेहमीच लोकांनी गजबजलेलं असतं. ते देशातील सर्वांत व्यग्र रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर त्यादिवशी अत्यंत क्रूर पद्धतीने दहशत पसरवण्यात आली. 
 
या स्थानकावर त्या दिवशी या मोठ्या संख्येने प्रवासी हजर होते. दहशतवाद्यांनी तिथंही अंदाधुंद गोळीबार केला. इथं जो गोळीबार झाला त्यात अजमल अमीर कसाब आणि इस्माईल खान यांचा सहभाग असल्याचं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं.
 
त्यानंतर पोलिसांनी अजमल अमीर कसाबला पकडलं, पण त्याचा दुसरा साथीदार इस्माईल खान मारला गेला. या गोळीबारात 58 लोक मृत्युमुखी पडले होते.
 
ओबेरॉय हॉटेल
ओबेरॉय हॉटेल बिझनेस क्लासमध्ये खूप फेमस आहे. दहशवादी या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा घेऊन घुसले.
 
असं म्हटलं जातं की, त्यावेळी हॉटेलमध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. आत घुसल्यानंतर दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं होतं.
 
नॅशनल सिक्युरिटी गार्डच्या जवानांनी या हॉटेलमध्ये दोन्ही दहशतवाद्यांना ठार केलं.
 
ताजमहाल हॉटेल
26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची एक ओळख जी कधीच विसरता येणार नाही ती म्हणजे, ताजमहाल हॉटेलच्या घुमटावर लागलेली आग. आजही हा हल्ला आठवायचा म्हटलं तर त्या जळत्या घुमटाचा फोटो आपल्याला डोळ्यांपुढं दिसतो.
 
हे हॉटेल जवळपास 105 वर्षं जुनं आहे. गेटवे ऑफ इंडियाजवळ असलेलं हे ताजमहाल हॉटेल परदेशी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. इथूनच समोर पसरलेला अरबी समुद्र दिसतो.
 
त्या रात्री हॉटेलमध्ये जेवणं सुरू होती आणि बरेच लोक हॉटेलमध्ये जमले होते, अचानक दशतवादी आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.
 
सरकारी आकडेवारीनुसार, हॉटेल ताजमध्ये एकूण 31 लोक मृत्यमुखी पडले. आणि इथंच चार दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं.
 
कामा हॉस्पिटल
कामा हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हे हॉस्पिटल 1880 साली बांधण्यात आलं असून एका श्रीमंत व्यापाऱ्याने याची बांधणी केली होती.
 
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आलेल्या दशतवाद्यांपैकी चार जणांनी पोलिस व्हॅन चोरली आणि त्यानंतर गोळीबार सुरू ठेवला.
 
याच कारने ते कामा हॉस्पिटलमध्ये घुसले. कामा हॉस्पिटलबाहेर झालेल्या चकमकीत दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर शहीद झाले.
 
नरिमन हाऊस
या सगळ्यात दहशतवाद्यांनी नरिमन हाऊसलाही टार्गेट केलं. नरिमन हाऊसची ओळख चबाड लुबाविच सेंटर अशी देखील आहे. नरिमन हाऊसमध्ये घुसून दहशतवाद्यांनी अनेकांना ओलीस ठेवलं.
 
ज्या इमारतीत दहशतवादी घुसले ती इमारत ज्यू लोकांच्या मदतीसाठी बांधलेलं एक सेंटर आहे. याठिकाणी ज्यू पर्यटक थांबलेले असतात.
 
या सेंटरमध्ये ज्यू धर्मग्रंथांची एक मोठी लायब्ररी आहे. या ठिकाणी कारवाई करण्यासाठी एनएसजी कमांडो हेलिकॉप्टरच्या सहाय्याने पलीकडे लागून असलेल्या इमारतीवर उतरले.
 
या कारवाईत दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं, पण दहशतवाद्यांनी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्यातलं मात्र कोणीच वाचलं नाही. इथं सात लोक मृत्युमुखी पडले तर दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आलं.
 
चबाड हाऊसची देखरेख करणारे गॅवरिल आणि त्यांची पत्नी रिवका यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा मोशे वाचला. इथं झालेल्या हल्ल्यात सहा ज्यू लोक मारले गेले.