शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (17:35 IST)

शिवसेना BMC निवडणुका आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढविणार?

राजकीय पक्षांनी पुढील वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु करण्याच्या बातम्या येत असून 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली होण्याचे समजत आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ज्याप्रकारे 1997 बीएमसी निवडणुकीत उद्धव प्रयोग यशस्वी केला तसाच 2022 मध्ये करण्याचा मनसुबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आखल्याची सूत्रांद्वारे माहिती दिली जात आहे.
 
युवासेनेचे प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण आणि उपनगरीय पालकमंत्री सध्या विविध वार्डामधील प्रश्न आणि नगरसेवकांच्या बैठका घेत आहे तसंच मुंबईतील इन्फ्रास्ट्रक्चरशी संबंधित प्रकल्पांकडे जातीने लक्ष देत आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे 1997 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईच्या महापालिका निवडणुकीची सूत्रे वर्तमान  मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांना सोपविल्या होत्या त्याच प्रमाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीचे सूत्र आदित्य ठाकरे यांच्या हाती असल्याने त्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. 
 
त्यावेळी बाळासाहेब हे निवडणुकीचे प्रमुख जरी होते परंतु सर्व रणनीतीची आखणी उद्धव ठाकरे यांनी केली होती, त्यांच्या हातात सर्व सूत्रे होती. यंदाच्या निवडणुकीचे नेतृत्व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे असल्याने पक्षात नवीन तरुणांना संधी मिळणार का.. अशी चर्चा होत आहे. 
 
उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी असल्याने, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून त्यांचे नेतृत्व पक्षाला दिले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे यंदाच्या महापालिकाच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहेत.