बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 28 जुलै 2022 (11:14 IST)

50 कोटी रोकड, 5 किलो सोने : अर्पिता मुखर्जीच्या घरात सापडला संपत्तीचा डोंगर

शिक्षक भरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरी बुधवारी ईडीने छापा टाकला. अर्पिताच्या घरीही ईडीला नोटांचा खजिना सापडला आहे. ईडीने या घरावर तब्बल 18 तास छापेमारी केली असून, त्यात 29 कोटी रुपये रोख आणि 5 किलो सोने सापडले आहे. रात्रभर नोटांची मोजणी सुरू होती. याशिवाय सोन्याचे दागिने आणि बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. याआधीही ईडीने अर्पिताच्या आणखी एका घरावर छापा टाकला होता, ज्यामध्ये तपास यंत्रणेने 20.9 कोटी रुपये रोख आणि सर्व संपत्तीची कागदपत्रे जप्त केली होती. तपास यंत्रणेशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जीच्या दोन्ही फ्लॅटमधून आतापर्यंत 50 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
 
याआधी बुधवारी संध्याकाळी तपास अधिकाऱ्यांचे पथक कोलकात्यातील बेलघरिया भागात अर्पिताच्या घरी पोहोचले होते आणि फ्लॅटची चावी नसल्यामुळे अधिकारी कुलूप तोडून आत घुसले होते. कुलूप तोडून शोधमोहिमेदरम्यान साक्षीदारांनाही बोलावण्यात आले. वृत्तानुसार, अर्पिता मुखर्जीच्या या घरातून मोठी वसुली पाहून अधिकारीही चक्रावून गेले. बँक अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि नोटांची मोजणी सुरू करण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. ईडीला कपाटातून रोकडही सापडली.
 
दुसऱ्या घरातूनही बेहिशेबी रक्कम मिळाल्यानंतर नोटा मोजण्यासाठी चार बँक कर्मचाऱ्यांना बोलवावे लागल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 5 मोजणी यंत्रे बसविण्यात आली. येथेही अर्पिताच्या टॉलीगंज येथील घराप्रमाणे येथील बेलघारिया टाऊन क्लब हाऊस येथील फ्लॅटच्या वॉर्डरोबमध्ये नोटांचे बंडल भरले होते. याठिकाणी नोटांचे बंडल मिळाल्याचे वृत्त समजताच मोठी गर्दीही जमली.
 
पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी सध्या 3 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. पार्थला अटक केल्यानंतर तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. शिक्षण भरती घोटाळ्याबाबत त्यांची सातत्याने चौकशी केली जात आहे. अर्पिताच्या घरातून मिळालेली रक्कम ही शैक्षणिक भरती घोटाळ्यातून कमावलेली रक्कम असल्याचे ईडीचे म्हणणे आहे, जे पार्थ चॅटर्जीचे आहे.