बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 7 फेब्रुवारी 2023 (17:18 IST)

सॅन्ट्रोमधून गोतस्करीचा आरोप, एकाचा झुंडबळी, फेसबुक लाईव्ह आणि ‘ते’ CCTV फुजेट

हरियाणाच्या नूह जिल्ह्यात 28 जानेवारी 2023 रोजी एक घटना घडली होती. या घटनेचे फोटो, व्हीडिओ सोशल मीडियावर अचानक व्हायरल होऊ लागलेत. यातल्याच एका व्हायरल व्हीडिओमुळे हे प्रकरण समोर आलंय. यात काही कथित गोरक्षक तीन मुस्लिम तरुणांना मारहाण करताना दिसतायत. व्हायरल झालेल्या या व्हीडिओत दिसणाऱ्या तरुणांची नावं वारिस, शौकीन आणि नफीस अशी आहेत.
 
व्हायरल झालेल्या व्हीडिओत दिसणारे तरुण जखमी अवस्थेत कारमध्ये बसल्याचं दिसतंय. या घटनेशी संबंधित व्हीडिओमध्ये पोलिसांचा गणवेश घातलेला व्यक्ती या तरुणांना कमरेत कोपरखळी मारताना दिसतोय. तर दुसरे काही लोक या तरुणांना रस्त्यावर बसवून त्यांचे फोटो काढताना दिसतायत.
 
या घटनेचं फेसबुक लाईव्हही करण्यात आलंय. हे लाईव्ह झाल्यानंतर पाच तास उलटून गेले आणि या तिघा जखमी तरुणांपैकी वारिसचा मृत्यू झाला.
 
या घटनेवरून आता प्रश्न उपस्थित केले जातायत.
वारिसच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, बजरंग दलाशी संबंधित गोरक्षकांनी त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली असून हा प्रकार म्हणजे मॉब लिंचिंग असल्याचा त्यांचा आरोप आहे.
 
या घटनेमुळे आता पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जातायत.
 
नूहमध्ये घडलेली ही घटना मॉब लिंचिंगचा प्रकार होती का? मॉब लिंचिंगमुळे वारिसचा मृत्यू झाला का? बजरंग दलाच्या कथित कार्यकर्त्यांनी वारिसची हत्या केलीय का? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे नूहमध्ये घडलेल्या या प्रकारात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जातायत यामागे कारण काय?
 
तर दिल्लीपासून 75 किलोमीटर अंतरावर असणारं हे नूह गोहत्या, गुरांची तस्करी, वाहन चोरी अशा अनेक कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतं.
 
राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या नूह जिल्ह्यात 11 लाख लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकसंख्या ही मुस्लिम समाजाची आहे.
 
या व्हायरल व्हीडिओ मागचं सत्य जाणून घेण्यासाठी बीबीसीची टीम नूहच्या हुसैनपूर गावात पोहोचली. वारिसच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली होती. तिथं आम्ही वारिसच्या आई हाजराची भेट घेतली.
 
मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या हाजरा सांगतात, "माझा मुलगा आता राहिला नाही, तो मिस्त्री होता. ते माझ्या मुलाला घेऊन गेले, निष्पाप मुलाला त्यांनी मारलं. माझा मुलगा निर्दोष होता, आम्हाला न्याय हवाय."
 
वारिसच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा भावांपैकी पाचवा असलेला वारिस मेकॅनिक म्हणून काम करायचा. दीड वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं, आज त्याची तीन महिन्यांची मुलगी अनाथ झाली.
 
वारिसचा भाऊ इम्रान सांगतो की, बजरंग दलाशी संबंधित गोरक्षकांनी वारिसला मारहाण करून त्याचा जीव घेतला.
 
इम्रान यांचं म्हणणं आहे की, "बजरंग दलाच्या मोनू मानेसरने सकाळी फेसबुकवर लाइव्ह केलं तेव्हा गावकऱ्यांना समजलं की मुलं त्यांच्या ताब्यात आहेत. तेव्हाच आम्हाला देखील कळलं."
 
"त्यांनी या तीन मुलांना मोनू मानेसरच्या बोलेरो गाडीत बसवलं आणि तीन वेगवेगळ्या लोकेशनवर नेऊन त्यांना बेदम मारहाण केली. मुलांनी काही गुन्हा केला असेल तर तिथं काही पावलांवरच पोलीस स्टेशन होतं. मुलांना पोलिसांच्या ताब्यात द्यायचं होतं, पण त्यांनी तसं केलं नाही."
 
इम्रानचं म्हणणं आहे की, "जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यासाठी पोलीस आहे, सरकार आहे, कोर्ट कचेऱ्या आहेत. त्यामुळे तिसऱ्या एखाद्याला मुलांना उचलून नेऊन त्यांना मारहाण करण्याचा काहीएक अधिकार नाहीये."
 
नफीसच्या कुटुंबीयांचं काय म्हणणं आहे?
वारिस सोबतच नफीस नावाचा आणखीन एकजण होता. नफीस नूहच्या रानियाकी गावचा रहिवासी आहे.
 
22 वर्षांचा नफीस धरून सात बहीणभाऊ आहेत. ही घटना घडल्यापासून नफीसची पत्नी मुबीना बेशुद्ध अवस्थेत आहे. नफीसला दीड वर्षांचा मुलगा आणि सात महिन्यांची मुलगी आहे.
नफीसची आई अफसाना सांगते, "मारल्यामुळे माझ्या मुलाचा चेहरा सुजलाय. बजरंग दलाच्या लोकांनी त्याला खूप मारलंय. तो अर्धमेल्या अवस्थेत आहे."
 
नफीसचे वडील जाहिद सांगतात, "पोलिसांनी त्यांच्या मुलाला हॉस्पिटलमधून जेलमध्ये नेलं. पण त्याची तब्येत आणखीनच बिघडू लागल्यानंतर त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेलं.
 
नफीस आणि शौकीन यांच्याविरोधात गो-तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण तिघांना झालेली मारहाण आणि वारिसच्या मृत्यूसंबंधी कोणताच गुन्हा दाखल केलेला नाही."
 
गोरक्षकांचं यावर काय म्हणणं आहे?
दोन्ही पीडितांच्या कुटुंबीयांनी बजरंग दलाशी संबंधित मोनू मानेसरवर थेट आरोप केलेत. हरियाणातील बजरंग दलाशी संबंधित गोरक्षक दलाचे प्रदेश प्रमुख असल्याचं मोनू स्वतः सांगतात.
बीबीसीशी बोलताना मोनू मानेसर यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
 
ते म्हणतात की, "आमच्या भिवाडी येथील गोरक्ष दलाच्या कार्यकर्त्यांना टीप मिळाली होती की, एक सँट्रो कार गाय घेऊन निघाली आहे. ही टीप खरी असल्याचं समजलं आणि तितक्यात कार सुद्धा वेगात पुढं जाऊ लागली आणि खोरी चौकीजवळ पोहोचताच एका टेम्पोला जाऊन धडकली. कारमध्ये असलेले तिन्ही तस्कर जखमी झाले."
 
मोनू मानेसर सांगतात की, घटना घडून गेल्यानंतर 35 मिनिटांनी ते घटनास्थळी पोहोचले.
 
ते म्हणाले की, "ती मुलं आमच्या ताब्यात नव्हती. पोलिसांनीच त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मी त्यांच्यासोबत नव्हतो. कोणालाही मारहाण झालेली नाहीये. हे सर्व आरोप निराधार असून हे एक टक्का सुद्धा सत्य नाहीये."
 
तुम्ही त्या मारहाणीच्या व्हीडिओत दिसताय यावरही ते "त्यात एक टक्काही सत्यता नाहीये" असं म्हणाले.
 
प्रत्यक्षदर्शींनी काय पाहिलं?
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी असल्याच्या बीबीसीच्या दाव्यावर मोनू मानेसर प्रश्न उपस्थित करतात. घटनास्थळापासून अगदी समोर राहणाऱ्या एका महिलेने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "मी घरातून बाहेर आले तेव्हा, समोर मोठा जमाव उभा होता, गाडी निखळून पडली होती, भाजीपाला रस्त्यावर सांडला होता."
प्रत्यक्षदर्शी सांगतात की, "त्यांना बेदम मारहाण केली. मारून मारून जमिनीवर बसवलं. त्यातला एक मुलगा म्हणत होता की, माझं पोट दुखू लागलंय, मला हॉस्पिटलमध्ये न्या. भले ही मला तुरुंगात डांबा, पण मला हॉस्पिटलमध्ये न्या. त्या मुलाला रक्ताच्या उलट्या होत होत्या. तर मारहाण करणारे लोक म्हणायला लागले की, त्याने मांस खाल्लं असावं, त्यामुळे त्याला रक्ताच्या उलट्या होत असाव्या."
 
घटनास्थळी उपस्थित असलेल्या दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की, "सकाळची अजान सुरू होती. माझं घर तिथून जवळच आहे. आम्ही येत असताना पाहिलं की, गाडीचा अपघात झालाय. बजरंग दलाच्या लोकांनी त्यांना बाहेर काढून बेदम मारहाण केली होती. त्यांच्याकडे काठ्या तर होत्याच, शिवाय त्यांनी बंदुकीनेही त्यांच्या पोटावर वार केले."
 
या प्रकरणी नूहचे पोलिस अधीक्षक वरुण सिंगला म्हणाले की, "28 तारखेला आम्हाला एक टेम्पो ड्रायव्हर आणि काही गोरक्षकांकडून रस्त्यात अपघात झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या तीन आरोपींना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. यातल्या दोन तरुणांना सुपर स्पेशालिटीमध्ये रेफर करण्यात आलं. दोन जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला."
 
पोलिसांचं नेमकं काय म्हणणं आहे?
पोलीस अधीक्षकांनी जो काही दावा केला होता त्याचं वर्णन सीसीटीव्ही फुटेजशी जुळत नाही.
 
घटना घडून गेल्यानंतर आठ दिवसांनी यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. गोरक्षकांवर कोणती कारवाई सुरू आहे हे विचारल्यावर त्यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं.
 
जखमी तरुणांना रुग्णालयात नेण्यासाठी अडीच तासांपेक्षा जास्त वेळ का लागला? या प्रश्नावर वरुण सिंगला म्हणाले की, "टेम्पो चालकाच्या तक्रारीवरून अपघात आणि गो-तस्करी प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला नातेवाइकांनी गोरक्षकांविरुद्ध तक्रार केली आहे. सध्या या सगळ्याची चौकशी सुरू आहे."
 
हे प्रकरण समजून घेण्यासाठी घटनाक्रम समजून घेणं महत्त्वाचं आहे. अपघात कधी झाला? पोलीस घटनास्थळी कधी पोहोचले?
 
पोलिसांनी सुरुवातीच्या पाच तासांमध्ये काय केलं? आणि कथित गोरक्षक घटनास्थळी काय करत होते?
 
बीबीसीने केलेला तपास
घटनाक्रम : कधी काय घडलं?
 
ही घटना समजून घेण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीसीटीव्ही फुटेज.
 
घटना जिथं घडली त्याठिकाणी असलेल्या एका दुकानात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्यात आलाय. घटना घडली तेव्हा त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या दुकानदाराने आम्हाला 28 जानेवारीच्या सकाळी 5 ते 8 या वेळेतले सीसीटीव्ही फुटेज दाखवले. हे फुटेज पाहिले असता पोलिसांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उभं राहतं.
4 वाजून 56 मिनिटं - या वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता नूहकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या सॅन्ट्रोची समोरून आलेल्या टेम्पोशी धडक झाली.
 
घटनास्थळ 'खोरी कलान' पोलीस स्टेशनपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर आहे.
 
4 वाजून 56 मिनिटं - गाड्यांची धडक झाल्यानंतर पाच सेकंदात एक बोलेरो कार सायरन वाजवत घटनास्थळी येते. ही कार पोलिस स्टेशनसमोरून येत असल्याचं दिसतंय.
 
बोलेरो कारमध्ये बसलेले कथित गोरक्षक सॅन्ट्रो बसलेल्या तरुणांना बाहेर काढून मारहाण करायला सुरुवात करतात.
 
प्रत्यक्षदर्शी असलेले इरफान सांगतात की, "त्यांच्या जवळ काठ्या तर होत्याच शिवाय त्यांनी बंदुकीनेही पोटात दोन चार ठोसे लागावले."
 
5 वाजून 54 मिनिटं - कथित गोरक्षक सँट्रो कारमधून गोवंश बाहेर काढताना दिसतात. तर व्हायरल झालेल्या व्हीडिओत आणि प्रत्यक्षदर्शीही कारमधून गाय बाहेर काढल्याच बोलत होते.
 
घटनेच्या वेळी उपस्थित असणारे हरियाणाचे प्रांतीय गोरक्षा प्रमुख मोनू मानेसर यांच्या म्हणण्यानुसार, ती गाय गंभीररित्या जखमी झाली होती, तिच्यासाठी ऍम्ब्युलन्स मागविण्यात आली होती.
मोनू यांनी सांगितल्याप्रमाणे, या गाईला नेण्यासाठी आलेली ऍम्ब्युलन्स धारवेडा हॉस्पिटलमधून आली होती.
 
6 वाजून 17 मिनिटं - या अपघातानंतर 1 तास 21 मिनिटांनी पोलिसांची पेट्रोलिंग कार घटनास्थळी पोहोचली. दोन पोलीस कारमधून खाली उतरताना दिसतात. यातला एक पोलीस कर्मचारी फोनमध्ये फोटो घेताना दिसतो.
 
घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शीनेही पोलीस उशिराने पोहोचल्याचा दावा केलाय.
 
मात्र घटनास्थळापासून अवघ्या 200 मीटर अंतरावर असलेल्या खोरी पोलीस स्टेशनच्या रजिस्टरमध्ये लिहिलंय की, पोलिसांची पेट्रोलिंग कार 0496 ही 6 वाजून 35 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचली. आणि त्यानंतर 0495 ही कार तिथे आली.
 
खोरी पोलीस स्टेशनच्या म्हणण्यानुसार, टेम्पो चालकाने पोलीस स्टेशनमध्ये फोन करून या अपघाताची माहिती कळवली.
6 वाजून 26 मिनिट - कथित गोरक्षक सँट्रो कारसमोर फोटो काढताना आणि घोषणा देत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतंय.
 
यात 'हर हर महादेव, जयकारा वीर बजरंगी, भारत माता की जय' अशा घोषणा ऐकू येत आहेत.
 
घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या महिलेने सांगितलं की, "त्यांनी गाडीवर उभं राहून बजरंग बलीच्या, गो मातेच्या घोषणा दिल्या."
 
6 वाजून 41 मिनिट - पोलिसांची दुसरी पेट्रोलिंग कार आली, पण तरीही जखमी तरुणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही.
 
7 वाजून 40 मिनिट - पोलिसांनी या तरुणांना घटनास्थळापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या तावडूच्या लाला हरद्वारी लाल कम्युनिटी सेंटरमध्ये नेलं.
 
हॉस्पिटलच्या इमर्जन्सी एन्ट्री रजिस्टरनुसार, "शौकीन, वारिस आणि नफीस यांना सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं."
 
तावडू येथील लाला हरद्वारी लाल कम्युनिटी सेंटरचे मेडिकल ऑफिसर देवेंद्र शर्मा सांगतात की, "सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी पोलीस या तरुणांना घेऊन आले. त्यांची मीच तपासणी केली."
 
त्यांनी पुढे सांगितलं की, "वारिसच्या हनुवटीला हलकासा कट बसला होता. पोटात प्रचंड वेदना होत असल्याचं तो सांगत होता. त्याच्या दुखण्यावर त्याला इंजेक्शन देण्यात आलं.
 
8 वाजून 20 मिनिट - मेडिकल ऑफिसर देवेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी यावेळी मेडिको लीगल रिपोर्ट (MLC) तयार केला. त्यांनी पुढे सांगितलं की, "त्यावेळी वारिसची प्रकृती स्थिर होती. अल्ट्रासाऊंड आणि सर्जनचं ओपिनियन घेण्यासाठी त्याला नल्हाड मेडिकल कॉलेज रेफर करण्यात आलं होतं."
 
देवेंद्र शर्मा सांगतात की, "हनुवटी व्यतिरिक्त शरीरावर इतर कोणत्याही ठिकाणी दुखापतीच्या खुणा नाहीत. शरीराच्या अंतर्गत भागात दुखापत झाली असण्याची शक्यता होती म्हणून त्याला नल्हाड मेडिकल कॉलेजला रेफर करण्यात आलं होतं."
 
"नफीसच्या उजव्या भुवइला सूज आली होती. त्याचा एक्स-रे काढून घ्यायला सांगितलं होतं. शौकीनच्या डाव्या डोळ्यावर कट पडला होता. त्याला टाके घालणं गरजेचं होतं. त्याच्या कोपर आणि खांद्यावरही जखमा झाल्या होत्या."
 
9 वाजून 50 मिनिट - तावडू येथील शासकीय रुग्णालयातील ऍम्ब्युलन्सच्या लॉग बुकनुसार, वारिस आणि नफीस यांना ऍम्ब्युलन्सने 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या नल्हाड येथील शहीद हसन खान मेवाती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आलं.
ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर अलाउद्दीन यांनी सांगितल्याप्रमाणे, नल्हाडच्या मेडिकल कॉलेजमध्ये नेत असताना वारिस बरा होता. पण जसं आम्ही कॉलेजमध्ये पोहोचलो तसा वारिसचा श्वास खूप मंदावला होता.
 
10 वाजून 30 मिनिट - शहीद हसन खान मेवाती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, "वारिसला सकाळी 10.30 वाजता मृतावस्थेत इथं आणण्यात आलं होतं."
 
वारिसच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली असून, त्याच्या मृत्यूला गोरक्षकच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
 
घटनास्थळी कथित गोरक्षकांची उपस्थिती, जखमी वारिस, नफीस आणि शौकीन यांना ताब्यात घेणं, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळी सापडलेले पुरावे यावरून कथित गोरक्षकांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण होतं.
 
पण प्रश्न उरतो तो पोलिसांच्या भूमिकेवर. पोलिसांनी या घटनेत गोरक्षकांच्या भूमिकेचा तपास अद्यापही का सुरू केलेला नाही?
 
Published By- Priya Dixit