रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (18:56 IST)

प्राणी-पक्षी: मोरांची आगळीवेगळी दोस्ती, मृत्यूनंतरही सोडली नाही साथ...

मैत्रीचं नातं अत्यंत पवित्र असतं. पुराणकथांमधील कृष्ण-सुदामा यांच्या मैत्रीपासून ते विविध उदाहरण आपल्याला दिले जातात. पण मैत्री ही फक्त मानवी जीवनातच आढळून येते, असं नाही. तर प्राण्यांच्या विश्वातही घनिष्ट मैत्रीच्या अनेक कथा आहेत.
असंच एक उदारण नुकतेच राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात दिसून आलं. इथल्या मोरांच्या मैत्रीचा किस्सा सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. या घटनेचा व्हीडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
झालं असं की नागौरमधील एका गावात दोन मोरांची एक जोडी होती. त्यापैकी एका मोराचा मंगळवारी मृत्यू झाला.
मित्राचा मृतदेह दफन करण्यासाठी नेला जात असताना दुसरा मोर त्याच्या अंत्यविधीकरिता शेवटपर्यंत थांबून होता.
या घटनेची माहिती नागौर येथील वन आणि वन्यजीव संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रामस्वरुप बिश्नोई यांनी दिली.
ते म्हणाले, "माझ्या घरी अनेक पाळीव प्राणी-पक्षी आहेत. त्याशिवाय हे दोन-तीन मोरसुद्धा माझ्या फार्महाऊसवर गेल्या तीन-चार वर्षांपासून राहतात.
काल त्यांच्यापैकी एका मोराचा मृत्यू झाला. पण त्यानंतर इतर मोर त्याच्यापाशीच बसून होते. आम्ही मृत मोराला घेऊन दफन करण्यासाठी घेऊन जात होतो. त्यावेळी त्यांच्यापैकी एक मोर आमच्यासोबत येऊ लागला. आम्ही मृत मोराचा दफनविधी पूर्ण करेपर्यंत तो मोर समोरच बसून होता."
बिश्नोई यांच्या फार्महाऊसवरील मोर अत्यंत माणसाळले आहेत. ते बिश्नोई यांच्यासोबतच राहतात. त्यांच्या ताटातील भोजन खातात.
वरील दोन्ही मोर गेल्या तीन-चार वर्षांपासून सोबतच राहायचे. पण आपला एक साथीदार गमावल्याचं दुःख दुसऱ्या मोराला मोठ्या प्रमाणात झालं.
त्याच्या निधनानंतर फक्त तो समोर बसूनच राहिला नाही. तर त्याच्या अंत्यविधीकरिता स्वतः चालत मागे मागे आला. मित्राला दफन करेपर्यंत हा मोर त्याला निरोप देण्यासाठी समोर उभा होता, हे विशेष.