मार्केटमध्ये बेवारस बॅगेत सापडलेला बॉम्ब
दिल्लीतील गाझीपूर परिसरात शुक्रवारी सकाळी एक संशयास्पद बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गाझीपूर फ्लॉवर मार्केटमध्ये ही संशयास्पद बॅग सापडली आहे. माहिती मिळताच पोलीस, बॉम्बविरोधी पथक आणि अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तपासात पोलिसांना बॅगमधून आयईडी स्फोटके सापडली.
बॉम्ब निकामी करण्यात आला
गाझीपूर फ्लॉवर मार्केटमध्ये बेवारस बॅग सापडल्याची माहिती पोलिसांना सकाळी 10.30 वाजता मिळाली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आजूबाजूचा परिसर रिकामा करून घेतला. घटनेचे गांभीर्य पाहून एनएसजी घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर जेसीबी मागवण्यात आला. येथे खोल खड्डा खोदून बॉम्ब निकामी झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास आता दिल्ली पोलिसांचे विशेष पथक करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही.
याआधीही दिल्लीच्या रोहिणी कोर्टात बॉम्बस्फोट झाला होता. 9 डिसेंबर रोजी हा स्फोट झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी एका शास्त्रज्ञाला अटक केली होती. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कमी तीव्रतेचा बॉम्बस्फोट होता, एक प्रकारचा क्रूड बॉम्ब होता. पोलिसांना घटनास्थळावरून एक आयईडी, स्फोटक आणि टिफिनसारखी वस्तू सापडली आहे. दिल्ली पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 102 रूम नंबर कोर्टमध्ये हा स्फोट एका लॅपटॉप बॅगेत ठेवलेल्या टिनच्या बॉक्समध्ये झाला. स्फोटानंतर बॉक्सचा स्फोट झाला आणि त्याचे भाग कोर्टरूममध्ये विखुरलेले आढळले. याशिवाय ज्या बॅगेत स्फोट झाला त्यात काही बॅटरी आणि वायरही होत्या.