कुमारस्वामी यांचा आज शपथविधी
डीएसचे नेते एच.डी. कुमारस्वामी बुधवारी संध्याकाळी ४.३० वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तसेच गुरुवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करणार आहेत. तर काँग्रेसकडून दलित नेते जी. परमेश्वर यांच्या नावावर उपमुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. तर सभापतीपद काँग्रेसच्या के. आर. रमेश यांना देण्यात येणार आहे. कर्नाटकच्या मंत्रिमंडळात ३४ मंत्री असतील. त्यातील २२ काँग्रेसचे तर मुख्यमंत्र्यासह १२ जेडीएसचे असतील. बहुमत सिद्ध केल्यानंतर पदांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे काँग्रेसच्या के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले. काँग्रेस आणि जेडीएस नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय झाल्याने उपमुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
या सोहळय़ाला मान्यवरांची उपस्थितीया सोहळय़ाला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह बसपा नेत्या मायावती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि सीपीआयचे महासचिव सीताराम येचुरी सहभागी होण्याची शक्यता आहे.