सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 फेब्रुवारी 2024 (12:16 IST)

लोकसभा निवडणूक : '2024नंतर निवडणुकाच होणार नाहीत', या दाव्यावर प्रशांत किशोर काय म्हणाले?

Prashant kishore
देशात लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी आघाडी इंडियादेखील वेगवेगळे दावे प्रतिदावे करत आहेत. भारतीय राजकारणाची नस ओळखलेला माणूस अशी ज्यांची ख्याती आहे ते प्रशांत किशोर याबाबत काय विचार करतात हे जाणून घेण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर सध्या बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. जवळपास दीड वर्षांपासून त्यांच्या जनसुराज अभियानच्या माध्यमातून ते पदयात्रा करत आहेत. या पदयात्रेदरम्यान बीबीसीनं त्यांच्याशी चर्चा करत त्यांच्या प्रवास आणि भविष्यातील नियोजनाबद्दल चर्चा केली. तसंच आगामी निवडणूक आणि सत्ताधारी आणि विरोधकांची रणनिती याबाबतही जाणून देण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना विरोधकांनी मैदानात उतरायला खूप उशीर केला आहे, असं मत त्यांनी मांडलं. तसंच 2024 च्या निवडणुकीनंतर सगळं काही संपणार या विचारावरही त्यांनी परखडपणे भूमिका मांडली.
 
यावेळच्या निवडणुकीत त्यांच्या संघटनेची किंवा त्यांची काहीही भूमिका नसेल असं स्पष्ट करत त्यांनी त्यांच्या अभियानाबाबतही माहिती दिली. त्यांच्या मुलाखतीचा काही भाग याठिकाणी देत आहोत. तुम्ही बिहारच्या जवळपास 15 जिलह्यांत पदयात्रा केली आहे. या प्रवासात लोकांची प्रतिक्रिया काय आहे? बिहार देशातील सर्वांत मागास राज्य आहे. मी या राज्यातील नागरिक आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर मी जुनं काम करायचं नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळं बिहारच्या लोकांच्या जीवनात बदल घडवून आणता येईल असं काहीतरी करण्याचा निर्णय मी घेतला आहे. संयुक्त राष्ट्रातील 10 वर्षे आणि 10 वर्षांच्या राजकीय क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवाच्या आधारे मी विचार केला. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की, महात्मा गांधींनी सांगितलेला मार्ग हाच आजच्या काळात सर्वात महत्त्वाचा आणि योग्य मार्ग आहे. तो म्हणजे, तुम्ही जोपर्यंत समाजामध्ये जाऊन त्यांना जागं करत नाही, तोपर्यंत समाजात बदल घडणं शक्य नसतो. त्यामुळं मी हा मार्ग निवडला आहे. पण लोक खरंच जागे होत आहेत असं वाटतं का?
 
नक्कीच लोक जागे होत आहेत. हे मोजण्याचं काही माप नाही. पण आम्ही पदयात्रा सुरू केली तेव्हा गावोगावी जाऊन लोकांना मतदान करताना कोणत्या गोष्टीसाठी मत द्यावं हे सांगायचं ठरवलं. कोणाला मत द्या किंवा देऊ नका हे आम्ही सांगत नाही. लोकशाहीत अनेकदा मत कुणाला द्यावं हे सांगण्यासाठी जास्त शक्ती खर्च केली जाते. पण माझ्या मते, मत कोणाला द्यावं यापेक्षाही मत कशासाठी द्यावं हे सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही नेहमी महात्मा गांधीचं नाव घेता, आजच्या भारतात महात्मा गांधीचं किती महत्त्व आहे? इतर कोणत्याही काळापेक्षा गांधीजींचं महत्त्वं आज अधिक आहे. अनेकदा लोकांमध्ये आणि विशेषतः शहरी लोकांमध्ये एक समज पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. हा समज म्हणजे, गांधींचं आजच्या काळात महत्त्व कमी झालं आहे किंवा त्यांना मानणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.
 
पण त्यात सत्य नाही. मी हे आजवरच्या अनुभवावरून सांगत आहे. आम्ही 2018-19 मध्ये महाविद्यालयीन स्तरावर 2500 महाविद्यालयांत एक सर्वेक्षण केलं. त्यात आजही महात्मा गांधी हेच सर्वांत मोठे सामाजिक-राजकीय आदर्श असल्याचं समोर आलं होतं. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत जनसुराजची भूमिका काय असेल? जनसुराजची काहीही भूमिका नाही. आम्ही जनतेमध्ये जाऊन जनजागरण करू हे ठरवलं आहे. आम्ही तेच करत राहणार आहोत. कारण, जनतेला आम्ही एक वचन दिलं आहे. ते म्हणजे पूर्ण बिहारमध्ये फिरल्यानंतर लोकांना भेटल्यानंतर आम्ही सगळे मिळून चर्चा करू आणि नंतरच पक्ष स्थापन करायचा आहे किंवा नाही हे ठरवणार आहोत.
 
आम्ही सध्या अर्धा बिहार फिरलो आहोत. लोकसभेपर्यंत पूर्ण राज्य फिरून होणार नाही. ही यात्रा पूर्ण व्हायला आणखी एक दीड वर्ष लागेल. पुढच्या विधानसभा निवडणुका होतील तेव्हा हा प्रवास पूर्ण होईल असे वाटते का?आमची यात्रा नक्कीच पूर्ण होईल. कारण वेळ भरपूर आहे. पण हा सगळा प्रयत्न लोकसभा आणि विधानसभा डोळ्यासमोर ठेवून केलेला नाही. हा अगदी वेगळा प्रयत्न आहे. ज्या दिवशी पदयात्रा पूर्ण होईल, तेव्हा लोक सोबत येतील आणि कोणते लोक सोबत येऊन पक्ष स्थापन करू इच्छितात हे ठरेल. पक्ष एका दिवसातही तयार होईल. लोकसभेपूर्वी हे होणार नसल्यानं लोकसभेत आमची काहीही भूमिका नाही. जनसुराजबाबत लोकांमध्ये अजूनही प्रश्नचिन्हं आहे? प्रशांत किशोर कोण आहेत? ही भाजपची बी टीम आहे का? फंडींग कोण करत आहे? असे प्रश्न उपस्थित होतच आहेत.
 
प्रश्न तर उपस्थित होतच राहणार. ते व्हायलाही हवेत. प्रश्न करणारे त्यांचं काम करत आहे. माझं काम मी करत आहे आणि ते प्रामाणिकपणे करण्याचा माझा प्रयत्न आहे. मी सगळ्यांना गावोगावी जाऊन हेच सांगतो की, मी काय करत आहे ते पाहा, ते योग्य वाटलं तर आमच्या पाठिशी या. तुम्हाला तुमचं आणि तुमच्या मुलांचं भवितव्य घडवायचं असेल तर उभं राहावं लागेल, माझी भूमिका त्यात सूत्रधाराची आहे. मी नेता नाही. पण लोक कसे एकत्र आणायचे, एकत्र आले तर त्यांना पक्षाचं रुप कसं द्यायचं आणि पक्षाचं रुप आल्यानंतर त्या पक्षाला जिंकवायचं कसं हा माझा अनुभव आहे, त्या आधारे लोक प्रतिसाद देत आहेत. त्यामुळंच सकाळी आठपासून रात्री 12 वाजेपर्यंत लोकांना भेटत आहोत. मग कुणी विश्वास ठेवत नसेल तर लोक का येत आहेत? पैसे कुठून येत आहेत याचं उत्तर मी अनेकदा दिलं आहे. आम्ही ज्या लोकांना गेल्या 10 वर्षांत राजकीय क्षेत्रात मदत केली, तिथून पैसा येत आहे. याचा अर्थ ते पक्ष किंवा नेते पैसे देत आहेत असं नाही.
 
पण जेव्हा तुम्ही एखाद्या राज्यात जिंकण्यासाठी कुणाला मदत करता तेव्हा त्या राज्यात अनेक असे लोक असतात जे तुमचं काम पाहत असतात आणि त्यांना ते आवडत असतं. त्यापैकी काहींना विश्वास असतो, आणि ते लोक मदत करत आहेत. गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि आपची आघाडी झाली आहे, समाजवादी पक्षाबरोबर चर्चा सुरू आहे, निवडणुकीला काही दिवसच राहिले आहेत, अशा परिस्थितीत तुम्ही विरोधकांकडं कसं पाहता माझ्या मते खूप उशीर झाला आहे. मी एक व्यवहारिक उदाहरण देतो. मोदींनी राम मंदिराचा सोहळा एवढा अचूक वेळेला केला तो म्हणजे निवडणुकीच्या तीन महिने आधी. मी म्हणतो की, मंदिराची प्राणप्रतिष्ठा जानेवारी 2024 ला व्हावी यासाठी कोणीतरी चार वर्षांपूर्वी विचार केला असेल. त्याच पद्धतीनं त्याचं काम, कामाचा वेग ठेवण्यात आला. सगळ्याचा विचार त्यांनी चार वर्षांपूर्वी केला असेल. कारण मे 2024 मध्ये निवडणुका होणार हे सगळ्यांना माहिती होतं. जर हे मोदींना माहिती आहे, ते या दिशेनं प्रयत्न करत आहेत. पत्रकारांना माहिती आहे, समाजाला माहिती आहे तर मग विरोधकांना माहिती नव्हतं का? मग त्यासाठी तुमच्याकडं काही उत्तर तयारच नव्हतं.
 
जागावाटप आता झालं काय किंवा सहा महिनेआधी झालं काय? निवडणुका कधी होणार हे सगळ्यांनाच माहिती होतं. मग जे आज विरोधक आहेत, त्यांना तीन वर्षांपूर्वीच सगळं करायला कोणी रोखलं होतं. त्यांना तेव्हाच I.N.D.I.A आघाडी स्थापन करता आली असती, तेव्हाच शेतकऱ्यांचे मुद्दे उचलता आले असते. हेच तीन वर्षांपूवी घडलं असतं तर लोकांना अधिक जास्त कळलं नसतं का? यांना कोणी रोखलं होतं. हा लढा 'करा किंवा मरा असा' निकराचा लढा आहे असं विरोधकांमधल्या काही जणांचं म्हणणं आहे, यावर तुमचं मत काय आहे? ही विरोधकांची आणखी एक मोठी चूक आहे. यानंतर काहीही शिल्लक राहणार नाही, असं विरोधक म्हणत असतील तर ती मोठी चूक आहे. कारण, हीच पहिली आणि शेवटची निवडणूक आहे, यावर आपण सर्वांनी यावर विश्वास ठेवावा हीच भाजपचीही इच्छा आहे. मी अनेक दिवसांपासून हे सांगत आहे की, 2024 मध्ये कोणीही जिंकलं तरी विरोधकच शिल्लक राहणार नाही, सगळ्या समस्या संपतील, आंदोलनं होणार नाहीत असं काही होणार नाही.
 
त्यामुळं विरोधक असं म्हणत असतील, आणि ते याद्वारे लोकांना घाबरवून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर माझ्या मते ती मोठी चूक आहे. त्यांनी असं म्हणायला नको. यात सत्यही नाही. मी त्यांच्याजागी असतो तर म्हटलो असतो मी पूर्ण ताकदीने लढेल आणि जिंकलो नाही तरी 2024 नंतर लढू. मोदींना पाहा ते संसदेत उभं राहून 400 जागा जिंकणार म्हणत आहेत. ते फक्त पक्षासाठीच लक्ष्य ठरवत नाहीत, तर ते मानसिक दबाव आणत आहेत. कारण आता लोक कोण जिंकणार ही चर्चाच करत नाही. चर्चा फक्त 400 जागा जिंकणार की नाही, यावर सुरू आहे. अशा प्रकारे अजेंडा सेट केला जातो. तुम्ही जातनिहाय सर्वेक्षणाचा मुद्दा चुकीचा आहे असं म्हणता, विरोधकांनी कोणते मुद्दे उचलायला हवे असं वाटतं? विरोधकांची नेमकी चूक कुठे होत आहे? जातनिहाय जनगणनेचा गाजावाजा करणारे नितीश कुमारच सगळ्यात आधी इंडिया आघाडी सोडून गेले. हा मुद्दा आता राहुल गांधींनी उचलला आहे आणि ते देशभरात यावर बोलत आहेत. त्यामुळं उलट त्यांचं नुकसान होत आहे. एकीकडं मोदी पाच ट्रिलियन इकॉनॉमी, आर्थिक विकास, पुरोगामी विचारसरणी, मोठे निर्णय यावर बोलत आहेत. तर राहुल गांधी जातीवर बोलत आहेत. यामुळं प्रतिमा कशी निर्माण होत आहे, ते पाहा. मोदी पुरोगामी विचारांचे तर राहुल जुन्या विचारांचे आहेत अशी प्रतिमा दिसत आहे. त्यामुळं हा मुद्दा असेल पण हा निवडणुकीचा मुख्य मुद्दा होऊ शकतो यावर मी सहमत नाही. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीत राजदमध्ये तेजस्वी यादव यादव यांची यूथ आयकॉन म्हणून प्रतिमा तयार केली जात आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? लोकशाहीमध्ये वारंवार एकच समीकरण चालू शकत नाही. लोकांनी बिहारमध्ये राजदचा काळ पाहिला आहे. पत्रकारांनी बाहेरून हा काळ पाहिला, त्याबद्दल लिहिलंदेखील. पण ज्या लोकांना 15 वर्ष ते दंगलराज पाहिलं आहे, ते कोणत्याही परिस्थितीत राजद किंवा त्यांच्या विचारसरणीशी संबंधित लोकांना नेतृत्व करताना पाहू शकत नाहीत.
 
गेल्या काही दिवसांत पाहिलं तर चेहरा राजदचा नव्हता, नितीश कुमार यांचा होता. त्यामुळं माझ्या मते तेजस्वी यादव राजदच्या कार्यकर्त्यांचे यूथ आयकॉन असू शकतात ते मला बिहारचे यूथ आयकॉन वाटत नाही. तुमच्या वडिलांचा पक्ष असेल तर त्या पक्षाचे नेते बनणं जगातील सर्वात सोपं काम आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता यांना सत्ताविरोधी लाटेचा फटका बसू शकतो असं तुम्ही म्हणाले. संदेशखालीचा आणि इलेक्टोरल बाँड्सचा निर्णय आला आहे. या विषयांचा निवडणुकीवर परिणाम होईल असं वाटतं का? इलेक्टोरल बाँड्सचा थेट निवडणुकीवर, मतदानावर किंवा निकालांवर परिणाम होईल असं मला वाटत नाही. निवडणुकीत आर्थिक बाबी पारदर्शक व्हाव्या यासाठीचा तो धोरणात्मक विषय आहे. त्यामुळं गावांत, शहरांत लोकांचं मतदान यावर ठरत किंवा बदलत नाहीत.
 
पण संदेशखाली सारखे मुद्दे जेव्हा सार्वजनिक रित्या समोर येतात तेव्हा त्याचा नक्कीच परिणाम होतो. ते खरे आहेत की खोटे, त्याचं गांभीर्य हे चौकशीचे विषय आहेत. पण असे मुद्दे समोर येतात तेव्हा सत्ताधारी पक्षाला त्याचा फटका बसतो. पश्चिम बंगालबाबत माझं असं मत आहे की, अनेकांना असं वाटतं की पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निकालांनंतर भाजपचं तिथं अस्तित्व राहिलेलं नाही. पण तसं नाही. निकाल येतील तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटेल. विधानसभेत खूप प्रयत्न करून त्यांचा पराभव केला होता. लोकसभेला तृणमूलला तसे प्रयत्न करण्यात यश आलं नाही तर ते 2019 सारखे किंवा त्यापेक्षा चांगले यश मिळवू शकतात.
 
Published By- Dhanashri Naik