सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जून 2021 (19:23 IST)

राजस्थान: डॉ. आंबेडकरांचं पोस्टर फाडण्यावरून झालेल्या वादात एका दलित तरुणाचा मृत्यू

- मोहर सिंह मीणा
राजस्थानमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीला एका युवकाने घरावर आंबेडकरांचे पोस्टर लावले होते. काही लोकांनी ते पोस्ट फाडले. त्यातून वाद निर्माण झाला.
 
पुढे हा वाद चिघळला आणि पोस्टर लावणाऱ्या तरुणावर पोस्टर फाडणाऱ्यांनी हल्ला केला असा आरोप त्या तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
 
राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यातल्या रावतसर तालुक्यातल्या किकरालिया गावात एका घराबाहेर लावलेलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडण्यावरून झालेल्या वादात एका 22 वर्षीय दलित तरुणाचा मृत्यू झाला आहे.
 
विनोद मेघवाल असं या मृत तरूणाचं नाव आहे आणि डॉक्टरांच्या उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला आहे.
 
ही घटना घडली तेव्हा मृत तरूणाचे भाऊ, मुकेश मेघवाल, त्याच्याबरोबर होते. त्यांनी बीबीसीशी फोनवर बोलताना सांगितलं की, "5 जूनला संध्याकाळी मी आणि विनोद शेतावर जात होतो, तेव्हाच आमच्याजवळ एक गाडी थांबली. आम्हाला काही कळण्याच्या आत गाडीतून लोक निघाले आणि त्यांनी आमच्यावर हॉकीस्टीक आणि काठ्यांनी हल्ला केला. विनोदच्या डोक्यावर अनेकदा काठ्या मारल्या त्यामुळे खूप रक्तस्राव झाला आणि तो बेशुद्ध पडला. मी तिथून लगेचच पळालो आणि नातेवाईकांना सांगितलं की काय घडतंय."
 
विनोदच्या घरचे त्याला गंभीर अवस्थेत रावतसर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. तिथून हनुमानगढ आणि त्यानंतर श्रीगंगानगरला रेफर केलं. 7 जूनला सकाळी विनोदचा मृत्यू झाला.
 
विनोदच्या मृत्यूनंतर हॉस्पिटलसमोर भीम आर्मी आणि मेघवाल समाजाच्या लोकांनी आंदोलन केलं आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.
 
काय आहे प्रकरण?
रावतसर सर्कल ऑफिसर रणवीर सिंह मीणा यांनी माहिती देताना म्हटलं की, "घराच्या भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लावलेलं एक पोस्टर फाडणं, आणि हल्ला करण्याच्या आरोपाखाली चार लोकांना अटक केली आहे. आणखी दोघांचा शोध सुरू आहे."
 
याबाबत पुढे त्यांनी सांगितलं, "प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार या वाद सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे झाला आणि पुढे वाढला. मृत तरुण विनोद भीम आर्मीच्या सोशल मीडियाचे प्रभारी होती आणि सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या पोस्ट्स आणि वक्तव्यांवरून वाद वाढला."
 
स्थानिक पत्रकार पुरुषोत्तम उपाध्याय सांगतात की, "विनोदच्या घरचे आणि आरोपींच्या नातेवाईकांमध्ये एका शेतरस्त्यावरून अनेक वर्षांपासून वाद आहे. त्या रस्त्यावर कोर्टाने स्टे आणला आहे. आधीही दोनदा त्यांच्यात भांडणं झाली आहेत."
 
रस्त्याच्या वादावर विनोदचे भाऊ मुकेश यांचं म्हणणं आहे की, "रस्त्याच्या वादाचा या हल्ल्याशी काही संबंध नाही. तो दुसऱ्या कुटुंबाचा मुद्दा आहे."
 
पुरुषोत्तम म्हणतात की, "हा वाद इतका वाढला नसता पण पोलीस आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे प्रकरण वाढलं."
 
कधी पोस्टर फाडलं?
पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार 14 एप्रिल 2021 ला गावात डॉ. आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम झाला होता. त्यादिवशी विनोदने घरावर जयंतीच्या शुभेच्छा देणारं पोस्टर लावलं होतं.
 
तक्रारीत म्हटलंय की 24 मेला गावातलेच काही तरुण हे पोस्टर फाडून घेऊन गेले. पोस्टर कोणी फाडलं याचा शोध विनोदने घेतला आणि त्यानंतर हा वाद वाढला.
 
वाद मिटवण्यासाठी झालेल्या पंचायतीत दोन्ही पक्षांमध्ये समेट झाला. पण त्यानंतर 5 जूला आरोपींनी विनोदवर हल्ला केला.
 
22 वर्षांच्या विनोदचं 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. त्याचे मोठे भाऊ आणि दोन बहिणींचंही लग्न झालं आहे. त्याचे आई-वडील शेती करतात. विनोदही 3 एकर जमीन घेऊन खंडाने शेती करतात.
 
नुकसानभरपाईची मागणी
मृत तरूण विनोद मेघवाल यांच्या घरच्यांनी आणि भीम आर्मीने मागणी केलीये की एफआयआरमध्ये नोंदलेल्या सगळ्या आरोपींना अटक झाली पाहिजे. कुटुंबाला 25 लाख रूपये नुकसानभरपाई दिली पाहिजे, कुटुंबातल्या एका सदस्याला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, शेतात जाण्यासाठी वैकल्पिक रस्ता मिळाला पाहिजे, पोलीस उप-अधिक्षक रणवीर सिंह मीणा यांचं निलंबन आणि कुटुंबाला सुरक्षा दिली पाहिजे अशा मागण्याही त्यांनी केल्या आहेत.
 
स्थानिक पत्रकार पुरुषोत्तम उपाध्याय यांनी सांगितलं की यापैकी अनेक मागण्या मान्य झाल्या आहेत.
 
"10.39 लाख रूपये नुकसान भरपाई, सगळ्या आरोपींना अठक, सरकारी नोकरीसाठी प्रस्ताव पाठवणं, शेतात जायला वैकल्पिक रस्ता आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त या मागण्या मान्य झाल्या आहेत."
 
भीम आर्मीचे हनुमानगढ जिल्ह्याचे अध्यक्ष कुलदीप आंबेडकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "विनोद रावतसरचे भीम आर्मीचे सोशल मीडिया सेलचे प्रभारी होते. प्रशासनाने ज्या मागण्या मान्य करण्याचं ठरवलं आहे त्यावर विनोद यांच्या कुटुंबाला काही आक्षेप नाही. म्हणून आम्हालाही काही हरकत नाही."