ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचं सोमवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, मुलगा, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. तेंडुलकर यांचे 90वे व्यंगचित्रप्रदर्शन नुकतेच बालगंधर्व कलादालनात पार पडले होते.
शेवटच्या दिवसांमध्येही त्यांचं व्यंगचित्र काढणं सुरूच होतं. 1954 मध्ये त्यांनी पहिलं व्यंगचित्र काढलं होतं. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढलं होतं. तेंडुलकर नाट्यसमीक्षकही होते. विनोदी आणि थोड्या तिरकस शैलीतील त्यांची नाट्य समीक्षा वाचनीय आहे. त्यांची स्वारी बुलेटवर बसून निघाली की भल्याभल्यांना आश्चर्य वाटायचे. व्यंगचित्रांमधून पुण्यातील वाहतूक कोंडी व बेशिस्त यावर त्यांनी प्रहार केला. बोचऱ्या, मार्मिक पुणेरी भाष्य करणाऱ्या या व्यंगचित्रांनी वाहतूक शाखेला मदतही केली.