रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (15:41 IST)

धक्कादायक! प्रख्यात नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

जगविख्यात कथ्थक नर्तक तथा पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे आज हदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मिडियाद्वारे दिली आहे.
 
कलेच्या क्षेत्रातील एका दिग्गज व्यक्तीच्या जाण्याने कलेचे आणि देशाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. बिरजू महाराज हे लखनौ घराण्याचे होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनौ येथे झाला होता. त्यांचे खरे नाव हे पंडित बृजमोहन मिश्रा असे आहे. बिरजू महाराज यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.  कथ्थक नर्तक तसेच ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराजांचे वडील तथा गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे सुद्धा अतिशय प्रसिद्ध कथ्थक नर्तक आहेत.
 
बिरजू महाराजांनी हजारो शिष्य घडविले आहेत. नृत्याचे धडे देणे आणि नृत्याच्या कलेमध्ये नवे प्राण त्यांनी फुंकले. त्यांच्यामुळे कथ्थक नृत्य देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचले. बिरजू महाराजांनी अनेक चित्रपटांमध्ये नृत्य दिग्दर्शनही केले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही प्राप्त झाले. देवदास, उमराव जान, बाजीराव मस्तानी, देझ इश्किया या चित्रपटांमधील त्यांचे नृत्य दिग्दर्शन विशेष चर्चिले गेले.
 
बिरजू महाराज यांनी शतरंज के खिलाडी या सत्यजित रे यांच्या चित्रपटाला संगीतही दिले होते. १९८३ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याशिवाय त्यांना कालिदास सन्मान आणि संगीत नाटक अकादमीचाही पुरस्कार मिळआला होता. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट ही मानद पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातून श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे.