शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (20:26 IST)

इस्रोची सगळी प्रक्षेपणं श्रीहरीकोट्यावरूनच का होतात? या जागेचं वैशिष्ट्य काय आहे?

- सिद्धनाथ गानू
चंद्रयान 3 पोहोचलं चंद्रावर, आदित्य L – 1 चाललंय सूर्याजवळ. या दोन्हीमध्ये एक गोष्ट समान आहे.
 
या दोन्ही यानांचं लाँच एकाच ठिकाणाहून झालंय आणि ते ठिकाण म्हणजे श्रीहरिकोटा. फक्त या दोन्हीचंच नाही तर यापूर्वी भारताने जितकी प्रक्षेपणं केली आहेत ती याच श्रीहरिकोटामधून केली गेली आहेत.
 
असं काय खास आहे या जागेत? इस्रो त्यांची सगळी प्रक्षेपणं इथूनच का करतं? याच प्रश्नांची ही उत्तरं.
 
1963 साली भारताने आपलं पहिलं रॉकेट लाँच केलं. केरळच्या थुंबा इथून 21 नोव्हेंबर रोजी भारताने साउंडिंग रॉकेट प्रक्षेपित केलं. पण यानंतर दहा वर्षांच्या आत भारताला आपल्या अवकाश मोहिमांच्या प्रक्षेपणासाठीची जागा सापडली.
 
ती जागा होती आंध्र प्रदेशातली श्रीहरिकोटाची. 9 ऑक्टोबर 1971 रोजी रोहिणी 125 हे साउंडिंग रॉकेट श्रीहरिकोटा रेंजवरून प्रक्षेपित झालं आणि तेव्हापासून भारताच्या सगळ्या अवकाश मोहिमांचं प्रक्षेपण इथूनच होत आलं आहे.
 
श्रीहरिकोटाची ही जागा नेमकी कशी सापडली?
1960 साली भारताचा अवकाश कार्यक्रम अगदी सुरूच होत होता.
 
या अवकाश कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई यांनी त्यांचे जवळचे सहकारी एकनाथ चिटणीस यांना उपग्रह प्रक्षेपणासाठी सुयोग्य जागा शोधण्याची जबाबदारी दिली.
 
इस्रोच्या निवृत्त शास्त्रज्ञांनी संपादित केलेल्या ‘From Fishing Hamlet to Red Planet: India’s Space Journey’ या पुस्तकात याचा उल्लेख सापडतो.
 
या पुस्तकात चिटणीसांची मुलाखत आहेत ज्यात त्यांनी सांगितलंय की, मार्च 1968 मध्ये त्यांनी आंध्र प्रदेशच्या उद्योग संचालकांच्या मदतीने संभाव्य ठिकाणांचं सर्वेक्षण केलं आणि नकाशे तयार केले.
 
ऑगस्ट महिन्यात विक्रम साराभाईंनी श्रीहरिकोटाची हवाई पाहणी केली आणि ऑक्टोबरमध्ये 40 हजार एकर जमिनीचं अधिग्रहणही झालं.
 
अवकाश मोहिमा श्रीहरिकोटा येथूनच का प्रक्षेपित होतात?
श्रीहरिकोटामध्ये असं काय विशेष आहे की तीच जागा निवडली आणि इतक्या वर्षांनंतरही तिथूनच प्रक्षेपणं होतात? श्रीहरिकोटाचा सर्वांत मोठा प्लस पॉइंट म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान.
 
श्रीहरिकोटा विषुववृत्ताजवळ आहे आणि त्याला पृथ्वीच्या रोटेशनचाही फायदा घेता येणं शक्य आहे.
 
म्हणजे काय तर पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वीकडे फिरत असते. तिचा वेग असतो ताशी 8 हजार किलोमीटर. जेव्हा आपण पृथ्वी फिरतेय त्याच दिशेने रॉकेट लाँच करतो तेव्हा पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगामुळे रॉकेटला अतिरिक्त बूस्ट मिळतो.
 
दर सेकंदाला साधारण 450 मीटर इतका तो अतिरिक्त बूस्ट असतो. विशेष म्हणजे यासाठी कुठलंही जास्तीचं इंधन वापरलं जात नाही.
 
जशी भारताची लाँच साईट श्रीहरिकोटा आहे तसंच अमेरिकेचं केनेडी स्पेस सेंटर, फ्रेंच गयानामधलं ग्रोव्ह स्पेस स्टेशन या जागासुद्धा विषुववृत्ताजवळच आहेत.
 
भारताने आजवर अनेक कम्युनिकेशन सॅटेलाईट्स लाँच केले आहेत. हे सॅटलाईट्स ज्या कक्षेत फिरतात ती कक्षा साधारणपणे विषुववृत्ताच्या वर असते.
 
त्यामुळे विषुववृत्ताच्या जवळ असलेल्या ठिकाणाहून प्रक्षेपण करणं फायद्याचं ठरतं आणि श्रीहरिकोटाने बाजी मारली
 
प्रक्षेपणानंतर रॉकेट ठरलेल्या ठिकाणी पोहोचेलच याची शाश्वती नसते. तांत्रिक किंवा इतरही कारणांमुळे रॉकेट भरकटू शकतं किंवा प्रसंगी इतरत्र कोसळूही शकतं.
 
ते कोसळलं तर त्याची शकलं होऊ शकतात आणि जिवीतहानीही होऊ शकते.
 
श्रीहरिकोटाजवळ फारशी लोकवस्ती नाही. जवळपास पाणीच पाणी आहे त्यामुळे एखादं रॉकेट प्रक्षेपण अपयशी ठरलं तरी त्याच्या कोसळण्याने जीवितहानी होणार नाही, ते समुद्रात जाऊन कोसळेल. हा विचार करून ही जागा पसंत केली गेली.
 
लाँचपॅड ही शक्यतो अशा ठिकाणी असतात जिथे वाहतूक करणं सोयीस्कर असेल. कारण कोणत्याही रॉकेट प्रक्षेपणासाठी मोठ्या प्रमाणात साधनसामग्रीची वाहतूक करून आणावी लागते.
 
श्रीहरिकोटाला समुद्रामार्गे वाहतूक करून आणणं शक्य आहे किंवा रस्तेमार्गेही इथे पोहोचणं तसं सुलभ आहे.
 
रॉकेट प्रक्षेपणासाठी अशी जागा निवडावी लागते जिथलं हवामान टोकाचं नसेल.
 
म्हणजे समजा आपण एक जागा निवडली आणि तिथे 8 महिने नुसता पाऊस पडत असेल किंवा 10 महिने कडाक्याचा उन्हाळा असेल तर? श्रीहरिकोटाचं हवामान पाहिलंत तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात पडणारा जोरदार पाऊस सोडलात तर उरलेले 10 महिने रॉकेट परीक्षणासाठी सोयीचे असतात.
 
या जागेतील जमिनीचा पोत ही महत्वाचा ठरतो. रॉकेट प्रक्षेपित होतात तेव्हा मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि जमिनीवर कंपनंही उमटतात.
 
ही कंपनं सहन करायला जमीन सक्षम हवी. श्रीहरिकोटाची जमीन मोठाली कंपनं पेलू शकते त्यामुळे ही जागा आदर्श ठरली.
 
पहिलं प्रेक्षपण केंद्र थुंबाला होतं, पण या सगळ्या गोष्टींमुळे श्रीहरिकोटाने बाजी मारली. आता श्रीहरिकोटाच्या जोडीने आणि इथल्यापेक्षाही कमी खर्चात प्रक्षेपण करता यावं यासाठी तामिळनाडूच्या कुलशेखरपट्टीनम या जागेचा विचार सुरू आहे.
 
तामिळनाडूच्या थुथुकुडी जिल्ह्यातल्या या 2300 एकरांच्या जागेला केंद्र सरकारनेही मान्यता दिली आहे. पण अजून या सगळ्याला मूर्त रूप यायला काही काळ जावा लागेल.