शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 21 ऑगस्ट 2023 (09:02 IST)

चंद्रयान 3 : रशियाचं 'लुना 25' लँडिंगआधीच कोसळलं, भारतासाठी ही महत्त्वाची संधी का?

chandrayaan 3
इस्रोची चंद्रयान-3 मोहीम सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. भारताच्या चंद्रयानाने दोन दिवसांपूर्वी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. आता 23 ऑगस्ट रोजी हे चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.
 
भारताचं चंद्रयान-3 चं 14 जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण झालं होतं. एकूण 40 दिवसांचा लांबलचक प्रवास करून हे यान इथपर्यंत पोहोचलं आहे.
 
यापूर्वी भारताच्या दोन चांद्रमोहिमा झाल्या होत्या. त्यामध्ये चंद्रयान-1 मोहिमेतील इम्पॅक्ट प्रोब हे चंद्राच्याच दक्षिण ध्रुवावर अपघातग्रस्त झालं होतं, तर चंद्रयान-2 च्या लँडरने सॉफ्ट लँडिंगच्या अखेरच्या मिनिटाला सिग्नल देणं बंद केलं होतं.
 
त्यानंतर आता इस्रोने चंद्रयान-3 मोहिमेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला. आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश बनण्याचा प्रयत्न भारत करत आहे.
 
एकीकडे भारताची चंद्रयान मोहीम सुरू असतानाच रशियाकडूनही एक चांद्रमोहीम राबवण्यात आली होती. 11 ऑगस्ट रोजी रशियाने त्यांचं लुना-25 हे यान चंद्राच्या दिशेने पाठवून दिलं. पण काल (20 ऑगस्ट) आलेल्या बातमीनुसार त्यांचं हे यान चंद्रावर लँडिंग करण्याआधीच कोसळलं आहे.
 
रशियाच्या या मोहिमेतही चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. मात्र, त्यांची मोहिम अयशस्वी ठरल्याने आता सर्वांच्या नजरा भारताच्या मोहिमेकडे वळल्या आहेत.
 
रशियाला मोहिमेत अपयश आलं असलं तरी भारताची चंद्रयान-3 मोहिम यशस्वी होईल, असा विश्वास इस्रोच्या शास्त्रज्ञांना आहे.
 
अंतराळासंदर्भात संशोधन करत असलेल्या देशांमध्ये या मोहिमांवरून एक स्पर्धा नेहमीच सुरू असल्याचं दिसून येतं. अंतराळाची रहस्ये शोधून काढण्यासाठी सर्वच जण आतूर असतात.
 
यामुळेच, सौर मालिकेत आपल्या पृथ्वीच्या सर्वात जवळ आणि आवाक्यात असलेल्या चंद्रावर जाण्यासाठीची स्पर्धा अनेक वर्षांपासूनची आहे
 
चंद्रावर पोहोचण्यावरून अमेरिका आणि रशिया यांच्यात सुरुवातीला मोठी स्पर्धा होती. दुसऱ्या महायुद्धानंतर या दोन्ही देशांमध्ये अंतराळ संशोधनावरून तीव्र स्पर्धा सुरू झाली.
 
तत्कालीन सोव्हिएत रशियाने 1955 साली आपली अंतराळ मोहीम सुरू केली. त्याच्या 3 वर्षांनंतर अमेरिकेत 1958 साली नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस एजन्सी (NASA) ची सुरूवात झाली.
 
14 सप्टेंबर 1959 साली पहिलं मानवनिर्मित यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं. सोव्हिएत रशियाच्या लुना-2 मोहिमेतील हे यान सुरक्षितपणे चंद्रावर लँडिंग करण्यात यशस्वी ठऱलं. त्यांमुळे चांद्रमोहिमांमध्ये रशियाच्या लुना-2 मोहिमेला प्रचंड महत्त्व आहे.
 
लुना-2 चंद्रावर उतरल्यानंतर त्याने येथील वातावरण, पृष्ठभागावरील परिस्थिती, चुंबकीय क्षेत्र आदी गोष्टींबाबत बहुमूल्य अशी माहिती पृथ्वीवर पाठवली.
 
या यशामुळे चंद्रावर अधिक संशोधन करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन मिळालं. यानंतर नासाने सुरू केलेल्या अपोलो मिशन, मानवयुक्त अंतराळ मोहीम, तसंच रशियाची लुना-25 मोहीम याअंतर्गत अनेक यान हे चंद्राच्या पृष्ठभागावर भूमध्य रेषेजवळच उतरलेले आहेत.
 
इस्रोच्या मोहिमेचं वैशिष्ट्य
यापूर्वीच्या सर्व चांद्र मोहिमांमध्ये यानांनी केवळ येथील भूमध्य रेषेवरच उतरण्याचे प्रयत्न केले आहेत. कारण,चंद्रावरील भूमध्ये रेषेजवळच्या भागात उतरणं तुलनेने सोपं आहे.
 
चंद्राच्या भूमध्ये रेषेजवळच्या परिसरात सेन्सर लावण्यात आलेले आहेत. तसंच तिथे यानांच्या मदतीसाठी काही उपकरणही लावलेले आहेत. याठिकामी पुरेशा प्रमाणात प्रकाश असतो. त्यामुळे बहुतांश अंतराळ यान चंद्रावरील भूमध्य रेषेच्या जवळच उतरलेले आहेत.
 
आपली पृथ्वी ही सरळ नसून काहीशी कललेल्या अवस्थेत आहे, हे आपल्याला माहिती आहे. शास्त्रीय भाषेत सांगायचं झाल्यास आपली पृथ्वी ही 23.5 अंशांनी कललेल्या स्थितीत आहे.
 
या कारणामुळे पृथ्वीवरील उत्तर-दक्षिण ध्रुवावर सहा महिने प्रकाश तर सहा महिने अंधार असतो.
 
मात्र, चंद्रावर अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळत नाही. नासाच्या माहितीनुसार, चंद्र केवळ 1.5 अंशांनी कललेला आहे. अशा प्रकारच्या भौगोलिक स्थितीमुळे सूर्यकिरणे चंद्राच्या ध्रुवीय भागावर जातात. मात्र, तिथल्या खड्ड्यांच्या खोलगट भागापर्यंत हा प्रकाश पोहोचू शकत नाही. याठिकाणी कायम अंधार असतो. याला कायम सावलीतील क्षेत्र असं संबोधलं जातं.
 
सूर्यकिरणच पोहोचत नसल्याने चंद्राच्या ध्रुवीय भागातील खड्डे हे दोन अब्जांपेक्षाही जास्त काळापासून अतिथंड अवस्थेत आहेत.
 
चंद्रावर या परिसरातील तापमान शून्य ते वजा 230 अंश सेल्सियसपर्यंत कमी असू शकतं. त्यामुळे अशा बिकट परिस्थितीत लँडिंग करणं आणि तांत्रिक प्रयोग करणं हे अत्यंत आव्हानात्मक आहे.
 
चंद्रावर बनलेले काही खड्डे खूपच मोठे आहेत. त्यापैकी काहींचा व्यास शेकडो किलोमीटरपर्यंतचा असू शकतो. या सर्व आव्हानांना तोंड देत इस्रोचं चंद्रयान-3 चे लँडर हे दक्षिण ध्रुवावर 70 व्या अक्षांशाजवळ सॉफ्ट लँडिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर असं काय आहे?
चंद्राच्या भूमध्य रेषेजवळ तापमानामध्ये सतत बदल होत असतो. इथे रात्रीचं तापमान वजा 120 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकतं, तर दिवसा येथील तापमान तब्बल 180 अंश सेल्सियसपर्यंत वाढूही शकतं.
 
मात्र, असं असलं तरी चंद्राच्या ध्रुवीय भागात गेल्या कित्येक कोटी वर्षांपासून सूर्याचा एक किरणदेखील पोहोचलेला नाही. येथील काही ठिकाणी तापमान वजा 230 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकतो, असा अंदाज अनेक संशोधनांमधून लावण्यात आलेला आहे.
 
याचा अर्थ, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माती ही वर्षानुवर्षे तशीच आहे. आता इस्रो याच गोष्टींचा तपास करण्यासाठी दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करत आहे. इस्रो या परिसरात लँडर आणि रोव्हर उतरवून मातीचं परीक्षण करण्याच्या प्रयत्नात आहे.
 
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जमलेल्या बर्फाच्या अणुंच्या नमुन्यांवर संशोधन केल्यास काही रहस्ये मानवाला कळू शकतात.
 
उदा. सौर मालिकेचा जन्म, चंद्र आणि पृथ्वी यांच्या निर्मितीमागचं रहस्य, त्यावेळची परिस्थिती यामुळे जाणून घेता येऊ शकते.
 
विशेष म्हणजे, चंद्राच्या भूमध्य रेषेजवळच्या परिसरात केलेल्या संशोधनात इथे इतके सारे रहस्य लपलेले असल्याचं आढळून आलं नव्हतं.
 
पण आता दक्षिण ध्रुवावर केलेल्या संशोधनाच्या माहितीचा उपयोग चंद्राच्या निर्मितीचं कारण, त्याच्या भूगोलाचं आणि वैशिष्ट्य यांची माहिती घेण्यासाठी करता येऊ शकतो.
 
चंद्रावर पाणी आहे की नाही?
नासाने दिलेल्या माहितीनुसार नासाचं अपोलो 11 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावरून काही दगड घेऊन आलं होतं.
 
या दगडांच्या परीक्षणानंतर नासाने निष्कर्ष काढला की, यामध्ये पाण्याचा कोणताही अंश नाही. नासाच्या वैज्ञानिकांनी चंद्राचा पृष्ठभाग हा पूर्णपणे कोरडा असल्याचा निष्कर्ष काढला होता.
 
त्यानंतर काही दशकांपर्यंत चंद्रावर पाणी शोधण्यासाठी कोणतेच प्रयत्न केले गेले नाहीत. 1990 च्या दशकात मात्र चंद्राच्या अंधाऱ्या बाजूवर असलेल्या बर्फाच्या रुपात पाणी असू शकतं अशी शक्यता वर्तवली गेली. म्हणूनच नासाच्या क्लेमेंटाईन तसंच लूनर प्रॉस्पेक्टर मोहिमांमधून चंद्राच्या पृष्ठभागाचा पुन्हा अभ्यास केला.
 
जिथे सूर्याचा प्रकाश पोहोचू शकत नाही, त्या भागात हायड्रोजन आढळून आला. त्यामुळेच चंद्राच्या ध्रुवांवर पाणी असण्याच्या शक्यतेला बळकटी मिळाली. मात्र, पाणी असल्याचा ठोस पुरावा नाहीच मिळाला.
चंद्रयान-1 ने ऑर्बिटर सोबत चंद्रावर क्रॅश लँडिंगसाठी मून इम्पॅक्ट प्रोबही पाठवलं होतं. जेव्हा चंद्रयान-1 चं ऑर्बिटर चंद्राभोवती परिक्रमा करत होतं, तेव्हा मून इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या पृष्ठभागावर दुर्घटनाग्रस्त झालं.
 
18 नोव्हेंबर 2008 ला चंद्रयान-1 ने 100 किमी उंचावरून मून इम्पॅक्ट प्रोब लॉन्च केलं होतं. 25 मिनिटांत त्याला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्यात आलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर नियंत्रित पद्धतीने त्याला सोडण्यात इस्रोला यश आलं होतं.
 
मून इम्पॅक्ट प्रोबवरील अल्टीट्यूड कंपोजिशन एक्सप्लोररने चंद्राच्या पृष्ठभागावरील 650 मास स्पेक्ट्रा रीडिंग एकत्र केली आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर इस्रोने 25 सप्टेंबर 2009 ला चंद्रावर पाणी असल्याची घोषणा केली.
 
इतिहास रचण्याचा प्रयत्न
एखादी गोष्ट सर्वांत पहिल्यांदा करणाऱ्याचं नाव हे इतिहास नेहमीच लक्षात ठेवतो. जसं की, चंद्रावर यान पाठवणारा पहिला देश रशिया होता, पण चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारा देश अमेरिका ठरला.
 
आता भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरणार की नाही, याची उत्सुकता आहे. लुना-25 कोसळल्यानंतर आता भारताकडे ही संधी अजूनही आहे.
 
जर चंद्रयान-3 ने दक्षिण ध्रुवावरील मातीमधल्या पाण्याच्या अंशाचा शोध घेतला, तर भविष्यातल्या प्रयोगांसाठी ते अधिक उपयुक्त ठरेल. चंद्रावरील पाण्याचा शोध लागला, तर त्यातून ऑक्सिजन मिळवण्याचा पर्यायही शोधता येऊ शकतो. ऑक्सिजनचा उपयोग अंतराळात होणाऱ्या प्रयोगांसाठी तसंच चंद्रावर होणाऱ्या प्रयोगांसाठी प्रोपेलन्ट म्हणून केला जाऊ शकतो.
 
या कारणांमुळेच इस्रो सुरूवातीपासूनत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा शोध घेण्याची तयारी करत होता. चंद्रयान-1आणि चंद्रयान- 2 या मोहिमांद्वारेही हेच प्रयत्न करण्यात आले होते. आता चंद्रयान-3 च्या माध्यमातून भारत इतिहास रचण्याचा प्रयत्न करत आहे.
 
 



Published By- Priya Dixit