बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 18 जानेवारी 2023 (20:10 IST)

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी लैंगिक शोषणाच्या आरोपांवर म्हटलं...

vinesh fogat
ANI
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
 
बृजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटू जंतरमंतर मैदानावर आज (18 जानेवारी) धरणे आंदोलनास बसल्या होत्या.
 
यावेळी महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले.
 
कुस्तीपटू विनेश फोगाटने पत्रकारांशी बोलताना म्हटलं, “प्रशिक्षक महिलांना त्रास देत आहेत. महासंघाचे काही आवडीचे प्रशिक्षक तर महिला प्रशिक्षकांनाही असभ्यतेने वागवतात. ते महिला खेळाडूंना त्रास देता. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांनीही अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे.”
 
फोगाट पुढे म्हणाली, “ते आमच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करतात आणि त्रास देतात. ते आमचं शोषण करत आहेत. आम्ही ऑलिम्पिक खेळण्यासाठी जातो त्यावेळी आमच्याकडे ना फिजिओ असतो ना प्रशिक्षक. आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र त्यांनी आम्हाला धमकावणं सुरू केलं.
 
विनेश फोगाट ही 2022 च्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतील 53 किलो वजनी गटातील सुवर्ण पदकविजेता आहे.
 
विनेश फोगाट पुढे म्हणाली, “माझा इतका मानसिक छळ करण्यात आला आहे की मी एके काळी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. दररोज माझ्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. प्रत्येक खेळाडूला आमच्यासोबत काय घडत आहे, याची कल्पना आहे.”
 
“मला काही झालं, तर माझ्या कुटुंबाचं काय झालं असतं, याची जबाबदारी कुणी घेतली असती? आपल्या कोणत्याही खेळाडूला काही झालं तर त्याची संपूर्ण जबाबदारी कुस्ती महासंघाची असेल. आमचा इतका मानसिक छळ होतो. वरून मला म्हटलं जातं की मीच मानसिकरित्या कमकुवत आहे.”
 
यादरम्यान विनेश फोगाटच्या डोळ्यात अश्रूही तरळल्याचं दिसून आलं.
 
कुस्तीपटूंनी पुकारलेल्या धरणे आंदोलनात अनेक दिग्गज खेळाडू उतरल्याचं दिसून येत आहे.
 
दिल्लीच्या ऐतिहासिक जंतर-मंतर मैदानावर बजरंग पुनिया, विनेश फोगाट, साक्षी मलिकसह इतर अनेक खेळाडू ठाण मांडून बसले आहेत.
 
कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला, “कुस्ती महासंघामध्ये बदल व्हावा, अशी आमची मागणी आहे. या लोकांना कुस्ती खेळाबाबत काहीएक माहिती नाही.”
 
बृजभूषण सिंह यांचं स्पष्टीकरण
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी तत्काळ समोर येऊन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.
 
बृजभूषण यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून असं काही घडलं असल्यास मी स्वतः फाशी घेईन, असं ते म्हणाले.
 
ANI वृत्तसंस्थेशी बोलताना बृजभूषण सिंह म्हणाले, “दिल्लीत कुस्तीपटूंनी महासंघाविरुद्ध धरणे आंदोलन पुकारल्याची माहिती मिळताच मी तत्काळ आलो. माझ्यावर सगळ्यात मोठा आरोप विनेशने लावला आहे. महासंघाच्या अध्यक्षांनी या खेळाडूचं शोषण झालं, असं म्हणणारा कुणी खेळाडू समोर आला आहे का?”
 
ते पुढे म्हणाले, “लैंगिक शोषणाचा कोणताही प्रकार झालेला नाही. तसं काही घडलं असल्यास मी स्वतःला फाशी लावून घेईन.”
 
बृजभूषण सिंह कोण आहेत?
बृजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत. केसरगंज लोकसभा मतदारसंघ हा गोंडा जिल्ह्याच्या तरबगंज, कटराबाजार आणि करनैलगंज तर बहराईच जिल्ह्याच्या पयागपूर आणि केसरगंज या तालुक्यांनी मिळून बनलेला आहे.
 
1991 साली पहिल्यांदा गोंडामधून खासदार बनलेले बृजभूषण सिंह भाजपचे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते म्हणून ओळखले जातात. 2019 साली ते सहाव्यांदा खासदार बनले.
 
एके काळी गोंडा शहरातील स्थानिक नेते म्हणून ओळखले जाणारे आता बृजभूषण शरण सिंह भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत.
 
बृजभूषण 2008 मध्ये भाजप सोडून काही काळ समाजवादी पक्षातही गेले होते. मात्र 2014 ला पुन्हा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांनी विजय मिळवला.
 
राज ठाकरे यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात अयोध्येला जाण्याचं नियोजन केलं होतं. त्यावेळी राज यांच्या दोऱ्याला बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. तसंच राज ठाकरे यांना त्यांनी उंदीर असंही संबोधलं होतं.
 
राज ठाकरेंना अयोध्येत पाय न ठेवू देण्याचा इशारा त्यावेळी बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता.
 
अयोध्येला येण्याआधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली.
 
"राज यांनी सार्वजनिक माफी मागितली नाही तर मी त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही," असं ब्रिजभूषण शरण सिंह यांनी म्हटलं होतं.
 
"योगी आदित्यनाथ यांनी जनभावना लक्षात घेता जोपर्यंत राज माफी मागत नाही तोपर्यत त्यांना भेटू नये," अशी मागणीसुद्धा ब्रिजभूषण यांनी केली होती.
 
मात्र, नंतर एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्यानंतर त्यांनी राज ठाकरेंशी आपलं वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.
 
स्थानिकांच्या मते, बृजभूषण सिंह हे राजकारणात येण्याच्या आधीपासून कुस्ती स्पर्धा आयोजित करत होते. त्यांना महागड्या एसयूव्ही गाड्यांचाही छंद आहे.
 
उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये लक्ष्मणपुरी भागात त्यांचा एक आलिशान बंगलाही आहे. तिथे गाड्या उभ्या करण्यास जागाही कमी पडते, असं लोक सांगतात.
 
भूतकाळात बृजभूषण सिंह यांच्यावर हत्या, जाळपोळ, तोडाफोडी यांसारखे आरोपही लावण्यात आले होते.
Published By -Smita Joshi