सोमवार, 26 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 14 सप्टेंबर 2022 (22:35 IST)

खडकवासला धरणातून १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नदीत सोडण्यात आले

खडकवासला धरणातून १६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी नदीत सोडण्यात आले आहे. एवढे पाणी महानगरपालिकेकडून वर्षभर पुणेकरांसाठी देण्यात येते. दरम्यान, खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांत पाऊस सुरूच असून खडकवासला धरणातून मुठा नदीत ६८४८ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांत मिळून एकूण २९.१० टीएमसी म्हणजेच ९९.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. या चारही धरणांच्या परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरणात ४० मिलिमीटर, वरसगाव धरणक्षेत्रात २० मि.मी., पानशेत धरण परिसरात १८ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. खडकवासला धरणातून मुठा नदीत १९२९ क्युसेकने मंगळवारी सकाळी पाणी सोडण्यात येत होते.

पावसाचे प्रमाण वाढल्याने सकाळी ११ नंतर हा विसर्ग ३४२४ क्युसेकने वाढविण्यात आला. वरसगाव धरणातून १४५८ क्युसेकने, तर पानशेत धरणातूनही ९७७ क्युसेकने पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली.

त्यामुळे खडकवासला धरणातून दुपारी एक वाजल्यानंतर ४२८० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात आला. दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ३५ मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात २६ मि.मी. आणि २७ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात आठ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे सायंकाळी पाच वाजल्यानंतर हा विसर्ग ५१३६ क्युसेक, तर सहा वाजल्यानंतर ६८४८ क्युसेकपर्यंत वाढवण्यात आला.