शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (15:35 IST)

बीएचआर पतसंस्था घोटाळा,मुख्य संशयित आरोपी सुनील झंवरला अटक

भाईचंद हिरचंद रायसोनी अर्थात बीएचआर पतसंस्थेतील घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या मुख्य संशयित आरोपी सुनील देवकीनंदन झंवर (रा.जळगाव) यास ९ महिन्यानंतर नाशिकमधून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली.याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून,त्यास पुण्यात आणले जात आहे.
 
पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात सेवानिवृत्त शिक्षिका तथा ठेवीदार रंजना घोरपडे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची १७ लाख ८ हजार ७४२ रुपयांची फसवणूक झाली आहे. पोलीस चौकशी बीएचआर पतसंस्थेत ६१ कोटी ९० लाख ८८ हजार १६३ रुपयांचा घोटाळा झाला आहे. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार व अवसायक जितेंद्र कंडारे यास सात महिन्यानंतर २९ जून २०२१ रोजी इंदोर येथून अटक करण्यात आली आहे. झंवर व कंडारे या दोघांना न्यायालयाने फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. जिल्हा व उच्च न्यायालयाने दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. झंवर वशांतर करुन जळगाव, मुंबई,राजस्थान व इंदोर येथे राहत होता.९ महिने पुणे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. तो नाशिकमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने त्याला सापळा रचून अटक केली.