1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By BBC|
Last Modified रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (10:04 IST)

चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त; पुलाबद्दलच्या या गोष्टी माहीत आहेत?

चांदणी चौक हे पुणे शहरात प्रवेश करण्याचं एक महत्त्वाचं जंक्शन आहे. पण सध्या हा चांदणी चौक वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. चांदणी चौकातला वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी एनडीए रोड ते बावधन भागाला जोडणारा एक जुना उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय जाहीर झाला आणि या चौकाविषयी ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या.
 
शनिवारी (1 ऑक्टोबर) मध्यरात्री ठीक 1 वाजून 7 मिनिटांनी हा पूल पाडण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा पूल पाडण्याची तयारी सुरु होती. हा पूल पाडण्यासाठी रात्री बारा वाजल्यानंतर हा परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता.
 
हा पूल तर जमीनदोस्त केला गेला, पण चांदणी चौकाचं पुणे शहरातलं महत्त्व होतं तरी काय? या ठिकाणाचा इतिहास काय आहे? या चौकाचं प्रचलित असलेलं चांदणी चौक नाव अधिकृत आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले.
 
जुन्या दिल्लीतल्या ऐतिहासिक 'चांदनी चौक' पेक्षा पुण्यातला चांदणी चौक वेगळा आहे. पुणे शहर आणि शहराजवळच्या इतर गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा मिलाप चांदणी चौकात होतो. मुळशी, भुगाव, भुकूम, पौड यांसारख्या गावांचा पुण्यासोबतचा दुवा म्हणजे चांदणी चौक आहे.
 
नॅशनल डिफेन्स अकॅडमीला (एनडीए) जाण्याचा रस्ताही चांदणी चौकातूनच आहे. मुंबई- बंगळूरू हायवे चांदणी चौकातून जात असल्याने या ठिकाणाला वेगळं महत्त्व आलं आहे. पुणे शहर आणि बावधन, बाणेरचा काही भाग, वाकड आणि पुढे हिंजवडीला जोडणारा महत्त्वाचा मार्ग चांदणी चौकातून जातो.
 
पुण्यातली उपनगरं जशी वाढली, तशी चांदणी चौकातून होणारी वाहतूक आणि या ठिकाणाचं महत्त्व वाढत गेलं. यातूनच चांदणी चौकात वाहतूक कोंडीलाही सुरुवात झाली.
 
पुणे फोफावण्याच्या आधीचा चांदणी चौक कसा होता?
या भागातले स्थानिक सांगतात की, हायवे या भागातून जाण्याच्या आधी चांदणी चौक हे एनडीएकडे आणि मुळशीकडे जाण्याचं एक जंक्शन होतं.
 
"चांदणी चौकातून पूर्वी कोकणात फार लोक जायचे नाहीत, कारण ताम्हिणी घाटातला रस्ता तेव्हा नव्हता. फक्त मुळशी तालुक्यात जाणारे लोक इकडून जायचे. माझ्या आठवणीप्रमाणे चांदणी चौकामध्ये एक दगडी स्ट्रक्चर होतं ज्यावर चांदणी कोरलेली होती. साधारणपणे 5 फूट बाय 5 फूट आकाराचा तो दगड होता. त्यावर दोन्ही बाजूंनी चांदणी कोरलेली होती. त्यावर एनडीए असंही कोरलेलं होतं. एका वर्तुळाकार स्ट्रक्चरवर तो दगड होता. त्यावेळेस हा उड्डाणपूल नव्हता," असं कोथरुड भागातले माजी नगरसेवक शंकर केमसे यांनी सांगितलं.
 
चांदणी चौक लगतच्या कोथरुड भागातल्या प्रभागातून त्यांनी पालिकेत प्रतिनिधीत्व केलं.
 
उंचावर असलेल्या आणि टेकड्यांनी वेढलेल्या चांदणी चौकातून डेक्कनकडे जाणारा कर्वेरोड स्पष्ट दिसायचा असं स्थानिकांनी सांगितलं.
 
"एनडीरोडवर अनेक जण व्यायामासाठी जायचे. तिथे सकाळी ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा असायचा. चांदणी चौकातून कर्वेरोडचा भाग स्पष्ट दिसायचा. दशभुजा गणपतीचं मंदिर स्पष्ट दिसायचं. आजूबाजूंच्या गावांमधून पुण्याच्या बाजारात माल विकायला येणारे चांदणी चौकातून यायची. जो पूल पाडाला गेला तो फार काही प्राचीन होता असं नाही. जेव्हा पुणे - मुंबई एक्स्प्रेसवे बांधला गेला तेव्हा त्या पुलाचंही बांधकाम झालं," असं चारुदत्त घाटगे यांनी सांगतिलं.
 
चारुदत्त घाटगे फेसबुकवर 'आठवणीतील पुणे या नावाचा ग्रूप चालवतात. या ग्रुपमध्ये 88 हजारापेक्षा जास्त सदस्य आहेत. त्यांचं पुण्यातल्या वाड्यांवरचं पुस्तकही प्रकाशित झालं आहे.
 
चांदणी चौक कसा बदलला?
आधी शांत, हिरवेगार, टेकड्यांनी वेढलेला, नागरिकांसाठी कट्ट्यावर निवांत काही वेळ घालवण्यासाठीच एक ठिकाण असलेला चांदणी चौक नंतर हळूहळू बदलत गेला. मुंबई-बंगळूरु हायवे आणि पुणे- मुंबई एक्स्प्रेसवे सुरु झाल्यानंतर इथून होणारी वाहतूक वाढली.
 
हायवेवरुन होणारी फक्त जड आणि मालवाहतूकच नाही, पुणे शहरातल्या एका उपनगरातून दुसऱ्या उपनगरात जाण्यासाठीही हायवेचा वापर करुन चांदणी चौकातूनच प्रवास होऊ लागला. कात्रजवरुन जर कोथरुडमध्ये यायचं असेल तर शहरातून येण्याऐवजी, हायवेवरुन या भागात येणं अधिक सोयीचं झालं.
 
चांदणी चौकातून जाणाऱ्या हायवेमुळे उद्योगनगरी म्हणून ओळखलं जाणारं पिंपरी चिंचवड शहर आणि आयटीपार्क असलेल्या हिंजवडीत जाणंही सोयीचं झालं. यामुळे साहजिकच इथली रहदारी वाढली.
"लोकांकडे वाहनं आली तशी रहदारी पण वाढली. मुळशी भागातल्या गावांमधून व्यवसाय, कामासाठी पुणे शहरात बरेच लोकं यायचे. त्यांची ये-जा चांदणी चौकातून व्हायची. जशी बावधन, पाषाण, सूस, बाणेर ही गावं वाढली, शहराचा एक भाग बनली तशी चांदणी चौकातून वाहतूकही वाढली. पिंपरी- चिंचवड, हिंजवडीकडे जाण्यासाठीचा एका महत्त्वाचा मार्ग चांदणी चौक बनला. यामुळे साहजिकच हळूहळू वाहतूक कोंडीची समस्या तयार होत गेली," असं वरिष्ठ पत्रकार अद्वैत मेहता यांनी सांगितलं.
 
चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि सातत्याने वाढणारी रहदारीला पुरेसा ठरेल यासाठी नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि पुणे महानगरपालिकेकडून चांदणी चौक उड्डाणपुलाचं काम सध्या सुरू आहे. या उड्डाणपुलाचं काम 2023 मध्ये पूर्ण होईल असा अंदाज आहे.
 
या पुलामुळे चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. या कामासाठी चांदणी चौकाचा चेहरा मोहरा बदललाय. इथे असणाऱ्या टेकड्या फोडण्यात आल्या आहेत.
 
चांदणी चौक हे नाव कसं पडलं?
या चौकाला चांदणी चौक हे नाव कसं पडलं याची माहीती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण या नावाच्या मागची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. यामागे वेगवेगळे अंदाज बांधले गेले आहेत. काहींच्या मते, या चौकात बरेच रस्ते एकत्र येतात. यामुळे रस्त्यांची रचना गुंतागुंतीची होत असल्याने त्याला चांदणी चौक नाव पडलं असावं, तर या चौकात पूर्वी चांदणी कोरलेला दगड असल्याने त्यावरुन त्याला चांदणी चौक नाव पडलं असावं असा काहींचा अंदाज आहे.
 
पण चांदणी चौक नावाने प्रसिद्ध असलेल्या या चौकाचं पालिकेच्या रेकॉर्डवरचं नाव काय आहे? तर ते नाव चांदणी चौक नाही. पुणे पालिकेमध्ये चांदणी चौकाचं नाव एनडीए चौक असं नमुद आहे.
 
"अधिकृतरित्या या चौकाचं नाव एनडीए चौक आहे. चांदणी चौक हे नाव कसं पडलं याची आमच्याकडे माहीती नाही. हे नाव लोकांनी पाडलं असावं. पण त्याचं आॅफिशीयली नाव एनडीए चौक आहे," असं पुणे महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता अजय वायसे यांनी सांगितलं.
 
काही जुन्या बातम्यांमधून याची माहीती मिळते. इंडियन एक्स्प्रेसच्या एका बातमीनुसार एप्रिल 2013 साली मुंबई - बंगळुरू नॅशनल हायवे आणि पुणे पौड एकत्र येणाऱ्या जंक्शनला एनडीए चौक असं नाव दिलं गेलं. याच जंक्शनमधून एनडीएकडे जाणारा रस्ताही आहे.
 
काही दिवसांच्या आधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदणी चौकाची हवाई पाहणी केली. याविषयी ट्विट करताना त्यांनी चांदणी चौकाचा उल्लेख एनडीए चौक असा केला.

Published By - Priya Dixit