सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 31 जुलै 2024 (18:18 IST)

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षणार्थी IAS पद UPSC कडून रद्द, भविष्यात सर्व परीक्षा देण्यावरही बंदी

केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीने पूजा खेडकरविरुद्ध कारवाई केली असून तिचे प्रशिक्षणार्थी IAS पद रद्द करण्यात आले आहे.त्याचबरोबर भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यास पूजा यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे.
 
यूपीएससीने केलेल्या चौकशीत पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचा भंग केल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
 
यूपीएससीने 19 जुलै 2024 रोजी एक पत्रक प्रसिद्ध करून पूजा खेडकर यांनी स्वतःच्या नावात, त्यांच्या वडिलांच्या नावात तसेच आईच्या नावात बदल करून केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक केल्याचं समोर आल्याचं म्हटलं होतं.
 
पूजा खेडकर यांनी परीक्षेचा फॉर्म भरत असताना फोटो, सही, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि पत्ता बदलून परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचंही यूपीएससीने स्पष्ट केलं होतं.
 
पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, पूजा खेडकर नागरी सेवा परीक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्या आहेत.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना 18 जुलै 2024 रोजी नागरी सेवा परीक्षा-2022च्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. पूजा खेडकर यांनी आपली खोटी माहिती देत परीक्षा देण्याची कमाल मर्यादा ओलांडली असल्याचं यूपीएससीने म्हटलं होतं.
 
34 वर्षीय पूजा खेडकर यांना 25 जुलै 2024 पर्यंत बाजू मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, तिने 4 ऑगस्टपर्यंत वेळ वाढवून मागितला. यूपीएससीने तिला 30 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आणि ही शेवटची संधी असून त्यापेक्षा जास्त वेळ दिला जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.मात्र, या वाढवून दिलेल्या मुदतीतही पूजा खेडकरने आपली बाजू न मांडल्यामुळे यूपीएससीने ही कारवाई केली आहे.
याआधी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा प्रशिक्षण कालावधी स्थगित करण्याचा आदेश महाराष्ट्र सरकारनं दिला होता.
 
पूजा खेडकर यांचा वाशिम येथील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते.
 
लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केली होती.
 
चौकशीसाठी समितीची स्थापना
पूजा खेडकर यांच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली होती.
 
ही समिती पूजा खेडकर यांच्या निवडीबाबत करण्यात आलेले दावे आणि इतर तपशिलांची चौकशी करणार होती.
 
दरम्यान पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली होती. 11 जुलैला त्या वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाल्या होत्या.
 
प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडं अवास्तव मागण्या केल्यामुळं आणि अरेरावी वर्तनामुळं त्यांच्याबाबत प्रचंड चर्चा झाली.
नेमकं काय घडलं?
पूजा दिलीप खेडकर या 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांना परीविक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली.
 
प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होते. मात्र तिथे ऋजू होण्याच्या आधीच त्यांनी अवास्तव मागण्या करणे सुरू केले. त्यांच्या विनंत्या मान्य करुनसुद्धा त्यांनी काही ना काही कारणाने तक्रारी करतच राहिल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंदर्भात लेखी तक्रारी नोंदवल्या. अखेर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार नोंदवली.
 
सरकारी कागदपत्रातील माहितीनुसार, 3 जून 2024 ला खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणे अपेक्षित होते. मात्र त्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना व्हॉट्सअप वर अपेक्षित सुविधांबद्दल मेसेज केले.
 
पहिल्याच दिवशी त्यांनी या सुविधांबाबत विचारणा केली. मात्र ट्रेनी अधिकाऱ्यांना या सुविधा देत येत नाहीत. तसंच निवासस्थानाची व्यवस्था केली जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. 3 ते 14 जून या काळात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून कामकाजाची माहिती घेणे अपेक्षित होते.
 
निवासी उपजिल्हाधिकारी महिला असल्यामुळे त्यांच्या अँटी चेंबर वापरावे अशी सूचना करण्यात आली होती. मात्र पुन्हा विनंती केल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांना बैठक व्यवस्था करण्यास सांगण्यात आले होते.
 
अटॅच्ड बाथरूम नसल्याने बैठक व्यवस्था नाकारली
पूजा खेडकर यांची चौथ्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र या कक्षाला अटॅच्ड बाथरूम नसल्यामुळे त्यांनी ती नाकारली. त्यानंतर वडिलांबरोबर त्यांनी व्हीआयपी सभागृहात जागा शोधली.
 
मात्र तिथे इलेक्ट्रिक फिटिंग नसल्यामुळे पूजा खेडकर पुन्हा एकदा नाराज झाल्या. यावेळी वडिलांनी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.
 
“ही बैठक व्यवस्था केल्याशिवाय जायचे नाही. ही सगळी व्यवस्था आधीच करायला हवी होती.” असं त्यांनी सुनावलं. या धमक्यांचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.
पुन्हा या अधिकाऱ्यासाठी बसण्याचा जागेचा शोध सुरू झाला. 13 जून 2024 ला त्यांनी पुन्हा वडिलांबरोबर जागेची पाहणी केली. आता अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबरमध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली.
किंबहुना तसा आग्रह खेडकर यांनी वडिलांबरोबर भेटून अपर जिल्हाधिकाऱ्यांना केला. “परीविक्षाधीन अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन का निर्माण केलं नाही’ असा प्रश्नही खेडकर यांचे वडील विचारायला विसरले नाहीत.
 
अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे अँटी चेंबरच बळकावले
18 जून ते 20 जून या काळात अतिरिक्त जिल्हाधिकारी मंत्रालयात होते. या काळात खेडकर यांनी अँटी चेंबरमधले सर्व सामान काढले. त्याबरोबरच स्वत:च्या नावाचा बोर्ड तयार केला. तसंच लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, राजमुद्रा असं सगळं साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
 
या घटनेमुळे खळबळ माजली. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष पूर्ववत करण्याचा आदेश दिला.
त्यावर खेडकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला की, “तुम्ही जर या चेंबरमधून बाहेर काढलं तर माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो मला सहन करणे शक्य होणार नाही.”
त्याचवेळी खेडकर यांच्या वडिलांनी तहसीलदारांना मेसेज करून सांगितलं की “महिला अधिकारी असलेल्या माझ्या मुलीला त्रास देत आहात, भविष्यात याचे परिणाम भोगावे लागतील.”
 
त्याचप्रमाणे खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीला अंबर दिवा लावला आणि तो दिवसाही सुरू ठेवतात असाही या तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
 
जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी खेडकर यांचे समुपदेशनही केले. हक्कापेक्षा कर्तव्य महत्त्वाचे आहे असं त्यांनी सांगितलं. खेडकर यांनी पाठवलेले मेसेज आणि वर्तन प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल असं नाही असा उल्लेख या तक्रारीत केला आहे.
 
खेडकर यांनी विविध अधिकाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजेसचा स्क्रीनशॉटही या तक्रारपत्राबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी जोडला आहे.
 
पूजा खेडकर कोण आहेत?
पूजा खेडकर 2023 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. 2022 मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून या पदासाठी निवड झाली आहे.
 
2021 मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत त्यांची सहायक संचालक या पदावर नियुक्ती झाली होती. 2021 मध्येही त्या बहुविकलांगता (PwBD5) या प्रवर्गातून नागरी सेवा उत्तीर्ण झाल्या होत्या.
 
2022 मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांचा 821 वा क्रमांक होता. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे देखील महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी होते. तर त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथ बुधवंत वंजारी समाजातील पहिले सनदी अधिकारी होते.
Published By- Priya Dixit