शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (15:19 IST)

धक्कादायक! कौमार्य चाचणीचा व्हिडिओ प्रथमच आला समोर

कौमार्य चाचणीची कुप्रथा अद्यापही महाराष्ट्रात सुरूच असून या चाचणीचा व्हिडिओ पहिल्यांदाच समोर आला आहे विशेष म्हणजे, ज्या महिलेची ही चाचणी घेण्यात आली तिनेच हा व्हिडिओ तयार केला आहे. २०१८ मधील हा व्हिडिओ असून तो पुण्याचा असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हाती हा व्हिडिओ लागला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कौमार्य चाचणी विरोधात लढत आहे. समितीच्या प्रयत्नाने ही पाचशे वर्षांची कुप्रथा समाजा समोर आणली गेली आहे. परंतु त्याबाबत पुरावा मिळत नव्हता. तो पहिल्यांदाच समितीच्या हाती लागलेला आहे.हा व्हिडिओ या विवाहाशी संबधित नसला तरी अशा प्रकारची कुप्रथा चालत असल्याची ग्वाही देणारा आहे. पुणे येथील हा व्हिडिओ असल्याचे समजते.
लग्नाच्या रात्री एका हाॅटेलच्या एका खोलीत नववधू व नववर दाखविण्यात आले आहे. पांढर्या शुभ्र वस्त्रावर झोपल्यानंतरचा त्यावर पडलेला रक्ताचा लाल डाग दिसत आहे. तसे वस्त्र नववधू आपल्या हाताने दाखवत आहे. हा व्हिडिओ 2018 चा असला तरी जात पंचायतचे क्रौर्य व अमानुष कुप्रथा समोर आणणारा आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामध्ये सरकारने या कुप्रथेची गंभीर दखल घेऊन ती बंद करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी मागणी जात पंचायत मूठमाती अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.
चांदगुडे यांनी म्हटले आहे की,  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या नऊ वर्षापासून जात पंचायतच्या मनमानी विरोधात लढत आहे.त्यात जात पंचायतींच्या अनेक क्रुर शिक्षा समाजा समोर आल्या आहे. कौमार्य चाचणी त्यातील एक प्रकार आहे. ती कुप्रथा बंद करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.सरकारने याची दखल घेतली तरच अशा कुप्रथांना मूठमाती देणे शक्य होईल.